
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) आपल्या संघात घेण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश आले आहे. दिल्लीने शार्दूलला रिलीज केले असून केकेआर संघाने त्याला आपल्यासोबत जोडल्याची माहिती एका इंग्रजी क्रीडा वृत्तवाहिनीने दिली आहे. आयपीएलसाठीचा लिलाव २३ डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे.
या भव्य स्पर्धेसाठी यंदा मिनी ऑक्शन होणार असून यावेळी संघामध्ये काही बदल नक्कीच पाहायला मिळतील. दरम्यान सध्या या ऑक्शनपूर्वी सर्व संघाना त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करायची आहेत.
दरम्यान ऑक्शनसाठी आपल्या पर्समध्ये अधिक पैसे शिल्लक ठेवण्यासाठी संघ काही खेळाडूंना रिलीज करत आहेत. मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दूलला ट्रेड केले आहे. केकेआरने आयपीएल २०२३ साठीची ट्रेडिंग विंडो बंद होण्यापूर्वी ही खेळी खेळली.
शार्दुलला आपल्या संघात सामील करण्यासाठी त्याचा जुना संघ एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेते गुजरात टाययन्स देखील इच्छुक होते. पंजाब किंग्जने देखील प्रयत्न केले होते. मात्र शार्दुल श्रेयसच्या गळाला लागल्याचे समजते.