नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्जाच्या व्याजात जशी वाढ होत आहे, तशीच वाढ मुदत ठेवींवरील व्याजातही (Interest) होत असून, लवकरच मुदत ठेवीवरच्या व्याजात आणखी अर्धा ते पाऊण टक्का वाढ होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा मुदत ठेवीकडे वळू शकतात.
मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. या योजनेत लवकरच जादा व्याजदर मिळण्याची शक्यता बळावली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुदत ठेवीत गुंतवणूक करणाऱ्यांना व्याजदरात ०.५० ते ०.७५ टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामागे काही कारणे आहेत. परिणामी, बँका व्याजदर वाढवण्यासाठी तयार झाल्या आहेत. त्याचा फायदा बँकांनाही होणार आहे. बँकांकडे कर्ज मागणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
त्यासाठी बँकांना मोठ्या रकमेची, निधीची गरज पडणार आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी बँका मुदत ठेवीच्या व्याजदरात वाढ करण्याची योजना आखत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका येत्या काही दिवसांमध्ये व्याजदरात एक किंवा दोन वेळा वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणतीही जोखीम नसल्याने अनेक भारतीय ग्राहक या परंपरागत गुंतवणूक योजनेकडे आकर्षित होऊ शकतात.
कोरोनाच्या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात मोठी कपात केली होती. त्यानंतर बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात कमालीची कपात केली. निर्बंध हटवल्यानंतर महागाईची टांगती तलवार आहे. रिझर्व्ह बँकेने महागाई काबूत करण्यासाठी चौथ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात सातत्याने वाढ झाली आहे. आता डिसेंबर महिन्यात महागाई आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा पतधोरण समितीची बैठक होऊ घातली आहे. या सर्व घडामोडींमध्ये बँकांनी मुदत ठेवीवर व्याजदर वाढीचा निर्णय घेतला आहे.
काही बँकांनी मुदत ठेवींवर ७.६५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर आठ टक्क्यांवर पोहोचला आहे. बाजारातल्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ग्राहकांनी यामुळे लागलीच भुरळून जाऊ नये. त्यांनी दीर्घ मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू नये. गुंतवणूक करायची असल्यास गुंतवणूकदारांनी अल्पावधीच्या मुदत ठेव योजनेचा विचार करणे फायदेशीर ठरू शकेल.