Sunday, March 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यगोवरला रोखण्यासाठी पालिका किती सक्षम?

गोवरला रोखण्यासाठी पालिका किती सक्षम?

मुंबईने गेल्या दोन वर्षांत मुंबईने कोरोनाच्या रूपाने अनेक मोठी मोठी संकटे पाहिली. मात्र, या संकटातून मार्ग काढत मुंबई पुन्हा उभी राहिली ती म्हणजे मुंबई महापालिकेमुळे. झोपडपट्टी भागातील चाचण्या, तपासण्या असतील किंवा लसीकरण असेल, कोरोना झालेल्या रुग्णांचे विलीगीकरण असेल, अशा अनेक गोष्टी पालिकेने चांगल्या पद्धतीने हाताळल्या होत्या. धारावीसारख्या भागात तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले होते, धारावीच्या झोपडपट्टीत असलेल्या अरुंद गल्ल्या, लहान लहान एकमेकांना चिटकलेली घरे, सार्वजनिक शौचालयाचा वापर या सगळ्यांमुळे धारावीत कोरोनाची वाढती रुग्ण संख्या रोखणे कठीण होते, मात्र तरीही पालिकेच्या अनेक उपाय योजना आणि प्रयत्नांमुळे अखेर धारावीत शून्य कोरोना रुग्ण करण्यास पालिकेला यश आले. अशीच समस्या वरळी कोळीवाड्यात ही उद्भवली होती. तिथे ही पालिकेने अशाच पद्धतीने लढत कोरोना हद्दपार केला. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि पालिका प्रशासनाचे जगभर कौतुक केले. कोरोना हटविण्यात पालिका यशस्वी झाली, मात्र आता मुंबई महापालिकेसमोर नवीन संकट येऊन उभे राहिले आहे. मुंबईला गोवरचा विळखा बसला असून यातूनही मार्ग काढण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पालिका किती सक्षम आहे आणि फोफावणारे गोवर पालिकेला रोखता येईल का? याचे पालिकेसमोर आव्हान असणार आहे.

सध्या मुंबईत वाढणारी गोवरची संख्या ही गेल्या वर्षीच्या तुलनेत फार मोठी आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबईत गोवर चांगलेच आटोक्यात होते. मात्र, यंदा मुबंईतील झोपडपट्टी परिसरात आणि इतर भागात गोवर पसरत आहे. मात्र, गोवरवर नक्की उपचार नसल्याने पालिका लसीकरणावर भर देत आहे. यासाठी केंद्रीय पाहणी पथक देखील मुंबईत दाखल झाले आहे. सगळ्यात जास्त गोवर रुग्ण पालिकेच्या एम. पूर्व या विभागात आहे. म्हणजेच देवनार, गोवंडी या परिसरात हा परिसर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर आहे. येथे केंद्रीय पाहणी पथक सध्या आढावा घेत आहे, तर पालिकेकडून देखील सर्वेक्षण सुरू आहे. यात संशयित रुग्ण ओळखण्यात येत आहेत, बालकांच्या लसीकरणाविषयी माहिती घेतली जाते, तर केंद्रीय पाहणी पथक आढावा घेऊन काय उपाय योजना कराव्यात, याबाबत अहवाल करणार आहेत.

दरम्यान सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यात ८४ गोवरचे रुग्ण आढळले आहेत, तर जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत १०९ गोवर रुग्ण आढळले आहेत, ही रुग्ण संख्या गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत मोठी आहे, २०२१ मध्ये मुंबईत केवळ १० गोवरच्या रुग्णांची नोंद झाली होती, तर २०२० मध्ये २९ आणि २०१९ मध्ये ३७ एवढी होती. मात्र, आता असलेली संख्या ही जास्त प्रमाणात असून संप्टेंबर महिन्यापासून गोवरची रुग्णसंख्या वाढायला लागली. जानेवारी महिन्यात एकही रुग्ण नव्हते, नंतर एक दोन असे रुग्ण होते. मात्र, सप्टेंबरमध्ये २४ आणि ऑक्टोबरमध्ये ६० गोवर रुग्णांची नोंद झाली, तर आता ही वाढणारी रुग्णसंख्या ही एम. पूर्व विभागात आहे. म्हणून पालिकेकडून संपूर्ण मुंबईसह एम. पूर्व भागात जास्त लक्ष दिले जात आहे.

महापालिका अतिरिक्त लसीकरण उपक्रम देखील राबवत आहे. यात आतापर्यंत एम. पूर्व भागात गरोदर महिला आणि बालकांनी १२१० हून अधिक तर संपूर्ण मुंबईत ५६४८ हून अधिक लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून सगळ्या भागातील घराघरात सर्वेक्षण केले जात आहे. कोणाला ताप अथवा इतर आजार, गोवरची लक्षणे आहेत का? हे तपासले जात आहे. सध्यापर्यंत ९१६११९ हून अधिक सर्वेक्षण केले आहे. एम पूर्व विभागात फक्त ८०६०३ हून ५ अधिक घरात स्वर्वेक्षण केले आहे. ही संख्या वाढत असून सध्या संपूर्ण मुंबईत ६१७ एवढे संशयित रुग्ण आहेत, तर ही संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान संशयितांना गरज लागल्यास उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, तर अ जीवनसत्वच्या गोळ्या देखील देण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे पालिकेकडून सगळेच प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे केंद्रीय पाहणी पथक देखील आढावा घेत आहे. त्यामुळे आता पालिका गोवर पसरण्यापासून कसे रोखू शकते हे पाहावे लागणार आहे. एकीकडे पालिका लसीकरणाचा डोस देत असेल तरी दुसऱ्या बाजूला पालिकेकडून जनजागृती देखील केली जात आहे. गोवरचा संसर्ग कोरोनापेक्षाही वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. तर गोवर लहान बालकानाच नाही, तर प्रौढांना देखील होण्याची शक्यता आहे. यासाठी पालिका जनजागृती करत असून बालकांना लसीकरणाचा पहिला डोस ९ आणि दुसरा डोस १६व्या महिन्यात घेण्याचे आवाहन करत आहे. तसेच पालिकेच्या रुग्णालयात देखील मोफत लसीकरण सुरू आहे. मोठ्यांनाही कोणतीही लक्षणे दिसल्यास उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. आता कोरोनानंतर पालिकेकडे गोवरला हद्दपार करण्याचे मोठे आव्हान आहे.

-सीमा दाते

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -