
बालदोस्तांनो हाय! बालदिनाच्या शुभेच्छा! १४ नोव्हेंबर, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती, भारतभर बालदिन म्हणून साजरी केली जाते.
बालपण विकसित होते निरपेक्ष मैत्रीमुळे. ही मैत्री सांघिक असते. विशेषतः बालपणाच्या आठवणी शालेय जीवनाशी जोडलेल्या असतात. मैत्रीत केलेल्या नाना उचापती, गंमती जंमती, एकमेकांच्या काढलेल्या खोड्या, केलेली फजिती, एकत्र बसून डबा खाणे, शालेय वस्तू शेअर करणे याचबरोबर अडचणीच्या प्रसंगी आपल्या मित्राला आधारही देणे, इतकचं नव्हे वर्गात काही अयोग्य घडल्यास कुणाचेही नाव न सांगता अशावेळी पूर्ण वर्ग शिक्षा भोगतो. हेच बालपणीच्या मैत्रीचे सांघिक यश.
सहल, सहशालेय कार्यक्रमाने मुलांमध्ये संघभावना वाढीस लागते. शालेय स्पर्धेत मित्राला, वर्गाला, आपल्या शाळेच्या संघाला चिअरअप करताना आपल्या मनात येणारे प्रेमभाव, बांधिलकी हीच संघभावना (टीम स्पिरिट) होय. न शिकविता जोपासली जाणारी बालवयातील ही बालकांमधील संघभावना भविष्यात खूप महत्त्वाची ठरते. बालदिनानिमित्ताने वाचलेल्या गोष्टीतून याच संघभावनेचे महत्त्व अधोरेखित करते.
प्रोफेसर रॅडी पॉश! हे कार्नेज मेलन युनिव्हर्सिटीत संगणक तज्ज्ञ म्हणून काम करीत होते. त्यांच्या ‘लास्ट लेक्चर’ पुस्तकातील प्रसिद्ध व्याख्यान ‘बालपणीचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे.’ मी रॅडी पॉश! स्वतः कायम एक फुटबाॅलपटू होण्याचे स्वप्न पहिले. शाळेतील फुटबाॅल खेळाच्या पाहिल्या दिवशी, हातात फुटबाॅल न घेता एक सुदृढ व्यक्ती, प्रशिक्षक आमच्यासमोर आले. हातात फुटबाॅल दिसत नसल्याने आम्ही मुले अस्वस्थ झालो. प्रशिक्षकाने विचारले, फुटबाॅलच्या मैदानावर किती खेळाडू असतात? ‘बावीस ’ आणि किती फुटबाॅल असतात? ‘एक’ मुलांनी कोरस उत्तर दिले. ‘बरोबर! म्हणजेच मैदानात फक्त एकाकडे फुटबाॅल असतो. उरलेले एकवीसजण त्यावेळी काय करतात हेच आज आपण शिकणार आहोत. नव्हे तेच शिकणे गरजेचे आहे. जर प्रत्येकाने बॉल स्वतःकडे ओढून घ्यायचा प्रयत्न केला, तर संघ कधीच जिंकू शकणार नाही. जेव्हा सर्वांच्या नजरा त्या बॉल असणाऱ्या खेळाडूवर केंद्रित होतात त्याचवेळी उरलेल्या एकवीसजणांच्या हालचालींवर खेळाचे भवितव्य अवलंबून असते. प्रत्येकाला अनन्यसाधारण महत्त्व असते. सगळेजण एकसध म्हणून खेळतात. आपले जीवनही खेळासारखेच आहे. दुसऱ्याकडे बॉल असताना तुम्ही काय करता ही संघभावना महत्त्वाची!
संघभावनेचे उत्कृष्ट उदा. गोकुळाष्टमीची दहीहंडी! श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना गोळा करून मनोरा रचत त्यावर स्वतः चढून हंडी फोडत असे. स्वतःबरोबर सवंगडीही लोणी खात असत. असा हा संघाच्या एकत्रित कामगिरीचा उत्सव दहीहंडी! चैतन्याने सळसळलेले उत्साही तरुण, गोविंदा! प्रत्येक गोविंदाचे कौशल्य वेगळे; परंतु परस्परपुरक असते. उंच, बुटके, शरीरयष्टी कमावलेले तर काही चपळ! किती उंचीपर्यंत जायचे हे ठरवून मनोऱ्याच्या थर ठरवितात. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय मिळवायचे (उंची) ते प्रथम ठरवा. पथकाचे नाव आणि एकाच रंगाचा बनियन हीच प्रत्येक गोविंदाची ओळख. तळाशी राहणारे, मधले आणि टोकाशी चढणारे सारे एकत्रच प्रवास करतात, एकत्रच जेवतात. संघभावनेमुळेच तो गट अजिंक्य ठरतो. यश सांघिक असते. मुलांनो! दहीहंडी हेही शिकविते, तुम्ही कितीही उंच गेलात तरी तुम्हाला आधार देणारे खांदे विसरू नका. खऱ्या आयुष्यातही जिंकण्यासाठी गट असावा लागतो.
देशासाठी खेळताना सगळ्यात प्रथम देशाप्रती भावना महत्त्वाची. ‘चक दे’ चित्रपट. सांघिक खेळात वैयक्तिक विक्रमापेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा. मी त्या विजेत्या संघाचा एक सदस्य आहे, ही संघभावना महत्त्वाची.
आज अवकाश शास्त्रांत भारताने जी प्रगती साधली त्यामागे वरिष्ठ शास्त्रज्ञानपासून त्यांच्याखाली काम कारणारे हजारो शास्त्रज्ञ, अभियंते, टीमसोबत कमी करणाऱ्या साऱ्यांच्या एकत्रित स्वप्नामुळे त्याच्या मानसिक गुंतवणुकीमुळे यश मिळत आहे.
१. चित्रपट संपल्यावर लगेच चित्रपटगृह खाली होते. चित्रपट बनविताना त्यात सहभाग असणाऱ्या अनेक संबंधितांची नामावली शेवटपर्यंत कधी वाचता का? प्रत्येक छोटे छोटे काम महत्त्वाचे असते.
२. राजकारणात खरे नेते आपल्या कार्यकर्त्यांचे महत्त्व जाणतात. कार्यकर्त्यांसोबत काम करताना स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवत त्यांच्यात विश्वास निर्माण करतात.
३. व्यवसायातही कोणतेही यश साजरे करताना वॉचमन, ऑफिसची झाडलोट करणाऱ्या शिपायापासून उच्चपदस्थांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो.
४. आमच्या मुख्याध्यापक परुळेकर मॅडम शाळेच्या एकत्रित कामाला जगन्नाथाचा रथ म्हणत. जो सर्वांच्या सहकाऱ्यांनी पुढे न्यायचा असतो.
संघभावनेत नेतृत्वाची खरी परीक्षा असते. स्वतःचा संघ जाणून घेणं, त्या प्रत्येकामध्ये रुची दाखवत त्यांची काळजी घेणं. प्रत्येक विजयामागे अनेकांचा सहभाग असतो तो विजय संघभावनेचा असतो.
जसे देशावर संकट आले की, आपण सारे एक होतो. कोरोनाच्या महामारीत शासनापासून डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवा पुरविणारे अशा अनेकांच्या सांघिक कामामुळे आज आपण कोरोनावर नियंत्रण ठेवू शकलो.
मिशेल ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये येताच कार्यकारी लोकांची सभा घेतली. आपल्या सल्लागार आणि तज्ज्ञ मंडळींना व्हाईट हाऊसमधील आणि त्यांचा स्वतःच्या संघातील स्वयंपाकी, मोलकरीण, माळी, इलेक्ट्रिशन तत्सम साऱ्या कर्मचाऱ्यांशी आपसात ओळख करून दिली. पुढे असेही म्हणाल्या, एक वर्षानंतर तुम्हाला एकमेकांची नांवे लक्षांत हवी. ही संघभावनेची दुसरी बाजू लोकसंपादन.
बालदोस्तांनो! घराचा उंबरठा ओलंडताच विविध भाषिक, प्रांतिक मित्र भेटतील. देशात, देशाबाहेर गेल्यावर फक्त आपल्या स्वतःचा विचार न करता आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांना समजून घेणे हीच संघभावना किंवा लोकसंपादन होय. माणसे जोडणे, दुसऱ्याला साथ देणे, स्थान देणे, हे पुढे जाण्यासाठी महत्त्वाचे आहे.
लोकसंपादनातील गुरू डेल कार्नेजीच्या मते, स्वतःचीच टिमकी वाजवत राहिल्यास हाती काही येणार नाही, याउलट स्वतःपेक्षा इतरांना केंद्रस्थानी ठेवा. इतरांमध्ये रस दाखवून मित्र मिळवा.शेवटी दोस्तांनो! तुमचे ध्येय कुठलेही असू दे, ते साध्य होण्यासाठी तुम्हाला एक पथक किंवा एक संघ किंवा माणसाच्या आधाराची गरज असते. ते काम संघभावना करते.
-मृणालिनी कुलकर्णी