कोई पास आया...

  101

ज्यांना गझला ऐकण्याची आवड आहे, त्यांना चार नावे हमखास माहीत असतात. जगजीत सिंग, चित्रा सिंग, गुलाम अली आणि मेहंदी हसन! एके काळी जगजीतसिंग, चित्रासिंग हे कलाकार युगुल देशभर लोकप्रिय होते. त्यांचे परदेशातले कार्यक्रमही तुफान गाजत.


जेव्हा गझल या काव्यप्रकारात पाकिस्तानी गायकांची मक्तेदारी होती, तेव्हा जगजीतसिंग यांनी तो स्वतः अंगीकारून देशभर लोकप्रिय केला! त्यांच्या लाँगप्ले रेकॉर्डस ऐकल्या नाहीत, असा रसिक सापडणे कठीण आहे. अतिशय आत्मविश्वासाने कार्यक्रमाला बसणाऱ्या या जोडीची मैफल श्रोत्यांना रात्ररात्र जागवायची.


जगजीतसिंग गायला लागले की श्रोत्यांच्या ‘वाह व्वा!’, ‘क्या बात हैं,’ अशा उद्गारांनी सभागृह दुमदुमत असे. मधेच एखादा चुटकुला सांगून ते श्रोत्यांकडून टाळ्यांचे एखादे आंतरपीकही घेऊन टाकत. त्यांच्या खर्जातल्या हिप्नॉटिक आवाजातून आलेली प्रत्येक ओळ थेट हृदयात उतरत असे. एखादे गाणे ब्लू टूथने आपल्या फोनमध्ये उतरवावे तसे त्या गझलेचे शब्द ते क्षणात श्रोत्यांच्या मनाच्या मदरबोर्डवर कायमचे सेव्ह करून टाकत!


खर्जातला संमोहन करणारा आवाज, गझलेच्या आशयाला अनुरूप रागांची नेमकी निवड आणि चित्राजींची साथ ही त्यांच्या यशाची महत्त्वाची कारणे होती तशीच गझलांची चोखंदळ निवड हेही त्यांच्या यशामागचे मोठे कारण होते. त्यांचा एक आवडता शायर म्हणजे सईद राही! राही यांच्या रचना सोप्या, सरळ आणि मनाला सैलावणाऱ्या असत. जणू काही जगातली सर्व घड्याळे तात्पुरती बंद केली आहेत आणि आपल्यावर वेळेचे कोणतेच बंधन नाही इतक्या निवांतपणे ऐकाव्यात अशा त्या रचना आहेत! गझलांचा आस्वाद घेताना मनाला अगदी मोकळे सोडून द्यायचे असते. कवीने ज्या मन:स्थितीत गझल लिहिली असते, त्यात श्रोता समरस झाला तरच गझलेचा आनंद घेता येतो!


एका शेरमध्ये सईद राही प्रेयसीला म्हणतात, ‘माझ्यासारखे प्रेमात आकंठ बुडून तर बघ, मग तुझेही मन दुसऱ्या कशात रमणार नाही, तुझीही अवस्था वेड लागल्यासारखी होईल’-


“मेरे जैसे बन जाओगे, जब इश्क़ तुम्हे हो जाएगा,
दीवारोंसे सर टकराओगे, जब इश्क़ तुम्हें हो जाएगा.”


या शायरचा पिंडच प्रत्येक अनुभव निवांतपणे घेणाऱ्या दर्दी रसिकांचा आहे. आपल्या टोकाच्या एकटेपणाचे वर्णन करतानाही तो म्हणतो -


तुम नहीं, ग़म नहीं, शराब नहीं!
ऐसी तन्हाईका जवाब नहीं!


प्रेयसीच्या अनुपस्थितीने आलेले केवढे विमनस्कपण! त्यातही राही यांच्या शायरीचे वेगळेपण पाहा. ते म्हणतात, तू नाहीस हे तर आहेच, पण तुला विसरायला साथ देणारी मदिराही नाही आणि कहर म्हणजे आज तर तुझ्या नसण्याने ज्या दु:खाची सवय झाली होती ते दु:खही नाही! केवढे असह्य एकटेपण!


पुढे प्रियेच्या कठोरपणाची तक्रार करताना कवी म्हणतो, ती इतकी भावनाशून्य आहे की चुकून तिने कधी माझे काही ऐकले, माझ्या मनासारखे केले तर लगेच बोटांवर मोजून ती त्याची नोंद ठेवते! मात्र तिचे केलेल्या माझ्या छळाचा तिच्याकडे काही
हिशोबच नसतो!


वो करम उँगलियोंपे गिनते हैं,
ज़ुल्मका जिनके कुछ हिसाब नही.


याच गझलेत कवीला प्रेयसीला सल्ला द्यायची हुक्की येते. तो म्हणतो, ‘प्रिये, तू तुझ्या मनाच्या खेळांकडे वारंवार लक्ष देत जा, मनाला वाचत जा. कारण मनापेक्षा अधिक सुंदर असे दुसरे पुस्तकच या जगात नाही -


गाहे गाहे इसे पढ़ा कीजिए,
दिलसे बेहतर कोई किताब नही.


दुसऱ्या एका गझलेत सईद राही आपल्या प्रियेला आव्हान देतात. त्यांना आपल्या प्रेमाच्या प्रभावावर एवढा विश्वास आहे की ते म्हणतात -


ये हक़ीक़त है कि होता है असर
बातों में,
तुम भी खुल जाओगे दो चार
मुलाकातों में.


राही यांची अशीच एक गझल जगजीतसिंग यांनी त्यांच्या खास आवाजात आणि आगळ्या शैलीत गावून अनेकांच्या मनावर कायमची कोरून टाकली आहे. तिचे स्वरूप मात्र एका चिंतनशील मनाने स्वत:शीच केलेले गुज असे आहे. या गाण्यासाठी त्यांनी सकाळी गायल्या जाणाऱ्या ललत रागाचा उपयोग केला आहे. गझलेची पहिली ओळच सकाळच्या प्रसन्न वेळेचे वातावरण तयार करते.


कोई पास आया सवेरे सवेरे,
मुझे आज़माया सवेरे सवेरे...


यातला कवीला पहाटे पहाटे भेट देणारा. हा ‘कोई’ म्हणजे कवीचे अंतर्मन आहे. सकाळी मला खूप लवकर जाग आली आणि मीच माझ्या जीवनाबद्दलच्या विचारात मग्न झालो. तेव्हा माझी दुर्बलता मला प्रकर्षाने जाणवली! जणू मीच माझी परीक्षा घेतली. माझाच जीवनपट डोळ्यांसमोर उभा राहिला. मनाने माझीच कथा मला पुन्हा ऐकवली -


मेरी दास्ताँ को जरासा बदलकर
मुझे ही सुनाया सवेरे सवेरे...


पुढच्या ओळीत मात्र कवी मानवी स्वभावाबद्दलचे एक निरीक्षण नोंदवतो. तो म्हणतो, जो कालपर्यंत सांगत होता, ‘अरे, जरा सांभाळून, जीवनाच्या वाटेवर अनेक वळणे येणार आहेत, सांभाळून चल! आज पाहतो तर तो स्वत:च अडखळतो आहे. त्याचे पाय लटपटत आहेत.


जो कहता था कल शब,
संभलना संभलना
वही लड़खड़ाया सवेरे सवेरे...


पुन्हा कवी अंतर्मुख होऊन स्वत:बद्दलची कैफियत स्वत:शीच मांडताना म्हणतो,
‘अरेरे! काल मी सगळी रात्रच मदिरालयात घालवली! पण शेवटी पहाट झाली, तेव्हा पहिली आठवण त्या निर्माणकर्त्या परमेश्वराची झाली आणि मी ओशाळलो!


कटी रात सारी मेरी मयकदेमें
ख़ुदा याद आया सवेरे सवेरे...


ही गझल कुणालाही अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. रात्री उशिरा ती ऐकणे हा एक अनुभव आहे. फक्त कवीच्या मनस्वी अभिव्यक्तीत समरस होण्याइतके तरल मन आणि उत्कट जाणीव आपण ताजीतवानी ठेवायला हवी. शेवटी कोणत्याही कलेचा खरा आस्वाद घेण्याची तीच तर पहिली अट असते ना!
-श्रीनिवास बेलसरे

Comments
Add Comment

Bigg Boss 19 Update : प्रणित मोरेवर सलमानचा घणाघाती प्रहार! प्रणित मोरेला सलमान खानने दाखवला आरसा, म्हणाला... मर्यादा ओलांडलीस

मुंबई : ‘बिग बॉस १९’चा पहिला आठवडा प्रेक्षकांसाठी जबरदस्त मसालेदार ठरला आहे. घरात रोज कुठेतरी वाद, भांडणं आणि

गोविंदा फक्त माझाच! घटस्फोटाच्या चर्चांना सुनीता आहूजा यांनी दिला पूर्णविराम

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची

Swwapnil Joshi: मिठाईऐवजी अर्धा किलो तांदूळ आणा...घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी स्वप्नील जोशीचं आवाहन

मुंबई: आजपासून दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2025) धामधूम पाहायला मिळणार आहे, घराघरात आणि विविध सार्वजनिक

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

गोडवा आणि तिखटपणाची मेजवानी – ‘वडापाव’ चित्रपटाचा चविष्ट टीझर प्रदर्शित!

मुंबई : मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीत वडापावचं स्थान खास आहे . वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक