Sunday, October 19, 2025
Happy Diwali

हसवा-फसवी

हसवा-फसवी

प्रोफेसर सुखात्मे कॉलेजातून परतले तेव्हा एक टेबलवर चिठ्ठी दिसली. “मयुरा’ ‘कोणाची’ चिठ्ठीय गं?” “तुमचं नाव आहे त्यावर, मला काय हो ठाऊक?” “प्रोफेसर सुखात्मे असं नाव असलं तर एरवी तू चिठ्ठ्या उघडत नाहीस का मयुरा?” “पण ‘ही’ उघडली नाही कारण विचारा?” “का? कारण काय?” “गुलाबी पाकीट.” “अरे... माझ्या लक्षातच नाही आलं.” “प्रोफेसर साहेब, उघडा ते पाकीट. वाचा! न सांगण्याजोगा मजकूर असेल तर जरूर मोठ्याने वाचा. मलाही समजेल नं! या वयात कोण लिहितं? काय लिहितं? ताळतंत्र किती सोडतं? प्रोफेसर साहेबांनी चिठ्ठी उलगडली. ‘लक्ष्या पिवळ्या शर्टात तू अज्जून रुबाबदार दिसतोस रे. आय लव्ह यू इन यल्लो गुड्ड फेल्लो.’ प्रोफेसर साहेब लाजले. विवाहित पुरुष पण प्रेमपत्राने बिथरतात ना? तसे जरासे बिथरले सुद्धा. चिठ्ठी रेवतीची, मयुराच्या घट्ट पट्ट मैत्रिणीची होती आणि तिने भेटायला बोलावले होते. मनात नका वाचू. मोठ्याने वाचा. मला समजलं पाहिजे की उसके मन में क्या क्या चल रहा है, मेरे मरदके बारे में. “अगं, काहीतरीच काय?” प्रोफेसर ओशाळले. “तिने भेटायला बोलावले आहे. गुरुप्रसाद हॉटेलात फॅमिली रूम नं. ११ बुक केलीये, काय बाई आहे.” “खरंच काय बाई आहे गं ही!” पण मनातल्या मनात खुश्मे खूश! कोणाला परस्त्रीकडून स्तुती आवडणार नाही हो? सगळं वरवर कसं एक्स्प्रेस करणार? निषेध केला पाहिजे. “हे बरोबर नाही.” “पुढे काय काय लिहिलंय?” “संकोच वाटतो गं.” “तिला लिहिताना वाटत नाही. मग वाचताना तुम्हाला कशाला वाटायला हवा संकोच? मी म्हणते वाचा.” “वाचतो.” प्रोफेसर साहेबांनी आवंढा गिळला. “पिवळा शर्ट घालून ये हं प्रोफेसरा. जाम खुलतो तुला!” “अरे वा! जामच पिसाटली ही!” “हं. जरा जास्तच वाटतंय.” प्रोफेसर साहेबांनी जड आवाज केला. आतून मात्र फुल्लारले होते. स्वस्तुती कोणाला आवडत नाही? कोण फुशारत नाही? तेही फुशारले होते. “मग?” “मग काय?” मी नाही जाणार. पिवळा शर्ट घालून तर मुळ्ळीच नाही.” बायकोवर इंपं मारीत प्रोफेसर साहेब बोलले त्वेषाने. बायकोवर वचक प्रदर्शित करीत. “मला वाटतं तुम्ही जावं. पिवळा शर्ट घालून जा.” “हॅ... काहीतरीच काय?” “अहो जा ना!” “नको गं. मला जमणार नाही. फ्लर्ट करणं, चेष्टा मस्करीसुद्धा मला जमायचं नाही. शंभर नंबरी शुद्ध सज्जन नवरा आहे मी!” मयुरा प्रोफेसर साहेबांच्या बोलण्याने सुखावली. पण वरवर मात्र म्हणाली, “ते काही नाही. तुम्हाला चहापानासाठी गुरुप्रसादला जावंच लागेल. नि तेही यल्लो शर्ट घालून कॅडॅक दिसत. माझी मैत्रीण खूश झाली पाहिजे.” “मला तर आत्ताच घाम सुटलाय. पाय थरथरतायत.” “सवय नाही ना! जमेल हळूहळू.” “अगं, असं काय?” “नवऱ्या फ्लर्ट करणं म्हणजे काय? मला सुद्धा ठाऊक नाही. एक्सपिरियन्स घेऊन पाहू. मी येईन तुझ्याबरोबर.” “नक्की?” “नक्की!” “सुटलो बुवा. सौ टक्का येशीन नं?” “मागे मागे राहीन.” आणि प्रोफेसर साहेब यल्लो यल्लो शर्ट घालून गेले. हॉटेल गुरुप्रसादमध्ये. हॉटेलच्या पायरीवर ठाम उभे. “साथी रे, तेरे बीना भी क्या जीना?” गाणे गात. मयुरा हसत होती. लक्ष्या बिचकत होता. दोघी मैत्रिणी हातीहात घेऊन उभ्या! कछं फछवलं!...

-डॉ. विजया वाड

Comments
Add Comment