शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहिरांच्या जीवनपटामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण नाव जोडले गेले आहे. या चित्रपटात ‘संगीत देवबाभळी’मधील ‘आवली’, शुभांगी सदावर्ते ही गुणी अभिनेत्री शाहीर साबळे यांची आई लक्ष्मीबाई गणपतराव साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे.
पुढील वर्षी २८ एप्रिल २०२३ मध्ये चित्रपट प्रदर्शित होत असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या वाई, भोर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. आता शुभांगी या चित्रीकरणात सहभागी झाली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’शी अनेक रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’बद्दल आणखी एक नवीन आणि अभिमानास्पद गोष्ट घडली ती म्हणजे या चित्रपटातील छोट्या शाहीर साबळेना आवाज देण्यासाठी निर्माते, संगीतकारांनी चक्क समाज माध्यमांवर ‘चंद्रा’ गाण्याने लोकप्रिय झालेल्या जयेश खरेला करारबद्ध केले आहे. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे, तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुढे येतील.
शुभांगी सदावर्तेच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, ‘माझे आजोबा म्हणजे शाहीर साबळेंच्या आयुष्यात आणि यशात त्यांची पत्नी माझी आजी भानुमती यांचे जसे योगदान होते तसेच त्यांची आई लक्ष्मीबाई यांचाही मोलाचा वाटा होता. त्यांच्या उत्तम संस्कारात शाहीर वाढले आणि त्यांना कलेची आवड निर्माण झाली. शुभांगी ही गुणी अभिनेत्री या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या सहज वावरातून ही व्यक्तिरेखा विशेष उठून दिसणार आहे’.
आपल्या जिवंत अभिनयाने सर्वांनाच खिळवून ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर होते. पण आता नाना पाटेकर हे प्रकाश झा यांच्या आगामी सीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत.
झा यांच्या आगामी ‘लाल बत्ती’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणारी ही वेबसीरिज असून या वेबसीरिजच्या माध्यमातून राजकारणातील काही काळी कृत्ये उघडकीस येणार आहेत. ‘लाल बत्ती’ या वेबसीरिजमध्ये नाना काळा कोट चढवून वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर या वेबसीरिजमध्ये नाना पाटेकर यांच्या पत्नीची भूमिका मेघना मलिक साकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘मिर्झापूर’, ‘अरण्यक’ आणि ‘बंदिश डाकू’ या वेबसीरिजच्या माध्यमातून आणि अनेक सिनेमांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
तसेच या वेबसीरिजद्वारे ते ओटीटी विश्वात पुनरागमन करणार आहेत. प्रकाश झा आणि नाना पाटेकर दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी दोघांनी ‘राजनीती’ या सिनेमात एकत्र काम केले होते. ‘लाल बत्ती’ वेबसीरिजमध्ये नानांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
नाना पाटेकरांनी अनेक हिंदी-मराठी सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. त्यांच्या काही डायलॉगवर आजही चाहते मिमिक्री करतात. नाना केवळ अभिनेतेच नाहीत तर लेखक आणि निर्मातेही आहेत. आपल्या खास संवाद शैलीमुळे ते विशेष ओळखले जातात. मनोरंजनसृष्टीत काम करण्यासोबत नानांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला आहे.
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिका पुन्हा प्रेक्षकांना खिळवून ठेवते आहे. या मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. एकीकडे अरुंधती मालिकेतून गायब आहे, तर दुसरीकडे आप्पाही घरातून अचानक निघून गेल्याने सगळेच चिंतेत आहेत. खायची पानं आणण्यासाठी गेलेले आप्पा घरी न परतल्याने सर्वजण त्यांना शोधत आहेत. त्यातच एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने तो आप्पांचा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यातच आता प्रेक्षक अरुंधतीची आतुरतेने वाट पाहत आहेत व अरुंधती लवकरच मालिकेत परतणार आहे.
गेला बराच काळ अरुंधती मालिकेतून गायब आहे. ती महाराष्ट्रभर गाण्याचा दौरा करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र घरी इतके काही घडल्यानंतरही अरुंधती परत कशी आली नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र आता अरुंधती परतणार आहे. त्यामुळे मालिकेत यापुढे काय काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अरुंधती मालिकेत जरी दौऱ्यावर जाताना दाखवण्यात आली असली तरी अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने वैयक्तिक कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. मधुराणीची छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याने तिने आरामासाठी निर्मात्यांकडून सुट्ट्या मागून घेतल्या होत्या. मात्र आता ती मालिकेत पुन्हा दिसणार आहे. त्यामुळे नेटकरीही खूश झाले आहेत.
-दीपक परब
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…