संस्कार...!

रस्त्याच्या कडेला एक फुगेवाला उभा होता. सोबत त्याची ती गॅसची गाडी अन् डौलाने नाचणारे फुगे! ते रंगबेरंगी फुगे पाहून प्रत्येकाची नजर तिकडे वळायची. लहान मुलांची तर फुगे विकत घेण्यासाठी झुंबडच उडाली होती. अशा फुगेवाल्याकडे प्रिया अगदी टक लावून पाहत होती. काही लहान मुलांनी आई-बाबांकडे हट्ट करून आपल्या आवडीच्या रंगाचे फुगे विकत घेतले.


तेवढ्यात तिथे एक भिकाऱ्याचे पोर येऊन उभं राहिलं. विस्कटलेले केस, काळ्या सावळ्या रंगाचं, मळके कपडे घातलेलं ते पोरं अनेक दिवस अंघोळ न केलेलं वाटत होतं. आता ते फुगेवाल्याकडे हात पसरू लागलं. पण फुगेवाल्याचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो आपला फुगे विकण्यात दंग होता. प्रिया ते दृश्य एकटक बघत होती. बराच वेळ झाला तरी तो मुलगा तिथून हटला नाही. एवढ्या वेळात तीन चार वेळा तरी फुगेवाला त्या मुलावर ओरडला असेल. अगदी चालता हो असंही एकदा म्हणाला. पण तो मुलगाही बराच हट्टी होता. तो पैसे घेतल्याशिवाय तिथून हटणार नव्हता.


त्या मुलाचं ते केविलवाणं हात पसरून भीक मागणं प्रियाला पाहवेना. तिने झटपट स्वतः जवळचे पैसे मोजले. ते जवळपास दहा रुपये होते. त्यातले एक दोन रुपये त्या मुलाला द्यायला काहीच हरकत नाही, असा विचार करून प्रिया त्या मुलाजवळ गेली. त्याच्या चेहऱ्यावरची उदासी पाहून प्रियाला त्याची दया आली. पण त्याचा कळकटपणा तिला किळसवाणा वाटत होता. प्रियाने दुरूनच मोठ्या ऐटीत त्या मुलापुढे दोन रुपयांचं नाणं धरलं. पण काय आश्चर्य ते पैसे घेण्यास त्याने नकार दिला. ‘मग काय हवंय’ प्रिया म्हणाली. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, I Want Baloon. That Blue Baloon. त्याचं ते सफाईदार इंग्रजी ऐकून प्रिया तर उडालीच. आजूबाजूची मुलंदेखील चकीत झाली. एवढा कळकट मळकट कपडे घातलेला मुलगा इंग्रजी बोलतो हे पाहून प्रिया चांगलीच हादरली.


आता मात्र प्रिया पुढे आली अन् म्हणाली, ‘तुझं नाव काय रे मुला’ ‘मी सुशांत’ त्याचं बोलणं आणि त्याचा आत्मविश्वास प्रियाला भारीच वाटला. तो पुढे बोलू लागला. ‘माझी आई कॉलेजमध्ये शिकवते, तर वडील डॉक्टर आहेत. मी इयत्ता सहावीत शिकतो. एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये!’ आता मात्र प्रियाला वेड लागायची पाळी आली. प्रिया तर त्याचे खांदे गदगदा हलवून त्याला विचारू लागली, ‘अरे वेड्या मग असा भीक का मागतोस? घरातून पळून तर आला नाही ना? की हाकलून दिलंय तुला बाबांनी!’


प्रियाच्या प्रश्नांचा पाढा सुरूच होता. तेव्हा तो मुलगा म्हणाला, दीदी मला कुणी हाकललं नाही. की मी पळूनही आलो नाही. मी आजूबाजूच्या मुलांशी, लोकांशी नीट वागावं, गरिबांचं जीवन मला कळावं, त्यांना येणारे अनुभव ऐकावेत, अनुभवावेत. ते आपलं जीवन कसे जगतात हे मला कळावं म्हणून मुद्दामच बाबांनी मला एक दिवस भिकारी बनून राहायला सांगितलंय. एक चांगला नागरिक बनण्यासाठी! मला हा अनुभव खूप उपयोगी पडणार आहे. अन् तो घेण्यासाठीच मी इथं अशा वेषात आलोय! गेले तासभर मी इथं लोकांकडे पैसे मागतोय. कुणीच मला पैसे दिले नाही. फक्त तूच मला दोन रुपये देते आहेस. पण या एक तासाच्या बदल्यात लाखमोलाचा अनुभव मात्र मिळाला बरे!


त्या मुलाला अन् वेगळा विचार करणाऱ्या त्याच्या आई-बाबांना मनोमन सलाम करीत प्रिया सकाळचा प्रसंग आठवू लागली अन् तिची मान शरमेने खाली गेली. कारण आज प्रिया त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या वीणाताईंवर विनाकारण ओरडली होती. अन् त्याबद्दल आईने प्रियाला तिची माफी मागायला सांगितली होती. पण एका साध्या घरकाम करणाऱ्या बाईची काय माफी मागायची असं म्हणून तिने स्पष्ट नकारच दिला होता. आता मात्र सुशांत या मुलाची कहाणी ऐकून अन् पाहून आपणही घरकाम करणाऱ्या वीणाताईंची माफी मागायला हवी, असं प्रियाला मनोमन वाटू लागलं. मग ती तडक घरी निघाली... पण डोक्यात मात्र माफी... माफी यापेक्षा वेगळाच विषयच नव्हता!


- रमेश तांबे

Comments
Add Comment

आकाश रात्री काळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील आज शाळा सुटल्यांनतर घरी येताबरोबर सीता व नीता या दोघीही बहिणींनी “मावशी” म्हणून आनंदाने

मानवतावादी कलाकार...

कथा : रमेश तांबे बालमित्रांनो, ही गोष्ट आहे युरोपमधल्या एका प्रसिद्ध गायकाची आणि त्याच्या वागण्याची! एका देशात

रिॲलिटी शो

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘रिॲलिटी शो’ म्हणजे शुद्ध मराठीत वास्तविकतेचे दर्शन. म्हणजेच सत्य परिस्थिती

कपटाचं यश तात्पुरतं

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणूस यश मिळवण्यासाठी अनेक मार्ग अवलंबतो. काही जण प्रामाणिक परिश्रमाचा

कोणासाठी...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि माझी मैत्रीण रजनी मुलुंडला

माणूस बदलू शकतो

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती,