यंदाचे साहित्य संमेलन वर्धा येथे होत आहे. वर्धा-सेवाग्राम-पवनार ही गांधी-विनोबांची कर्मभूमी असल्याने संमेलनासाठी गांधी विचारांवर लेखन करणाऱ्या लेखकाची अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, असा एक मतप्रवाह होता. त्यानुसार संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. महामंडळाच्या इतर घटक संस्थांनीही द्वादशीवारांच्या नावाला समर्थन दिले. त्यामुळे द्वादशीवार यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच अध्यक्ष निवडीसाठीच्या बैठकीच्या काही तासांआधी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगितले जाते. द्वादशीवार जसे गांधी विचारांचे आहेत तसेच ते भाजपचे कठोर टीकाकार आहेत. साहित्याच्या प्रांतात राजकीय हस्तक्षेप नसतो, असे सांगितले जात असले, तरी पडद्याआडून वेगळ्या हालचाली होत असतात.
न्या. चपळगावकर यांच्या गळ्यात कोणत्याही कारणाने का होईना, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पडली असली, तरी त्यांच्या निवडीमुळे एका नि:स्पृह माजी न्यायमूर्तींचा आणि त्यांच्या वैचारिक लेखनाचा सन्मान झाला आहे, असे मानायला हरकत नाही. द्वादशीवार यांचे नाव निश्चित झाले, तर संमेलनासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नका, असा सूचक इशारा देण्यात आला होता, असे ऐकायला मिळते. त्यामुळे चपळगावकर यांची निवड झाली. न्या. चपळगावकर हे गांधी विचारांचे असून, त्यांनीही प्रतिगामित्वावर अनेकदा आसूड ओढले आहेत. पत्रकार, संपादकांपेक्षा विचारवंत परवडला, असा विचार कदाचित संबंधितांनी केला असावा.
नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून, वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील आणि सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते १९६१-६२ मध्ये लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. अनंत भालेराव, नरहर कुरुंदकर, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यांशी त्यांची वैचारिक नाळ जुळलेली होती. ते नरहर कुरुंदकर न्यासाचे विश्वस्तही आहेत. अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व – आठवणीतले दिवस, कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचं चरित्र), कायदा आणि माणूस, कहाणी हैदराबाद लढ्याची, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, तुमच्या माझ्या मनातलं (ललित), त्यांना समजून घेताना (ललित), दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा), नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज, नामदार गोखल्यांचं शहाणपण, न्यायमूर्ती केशवराव कोरटकर, न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा), मनातली माणसं (व्यक्तिचित्रणं), महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना, राज्यघटनेचे अर्धशतक, विधिमंडळे आणि न्यायसंस्था, संघर्षाचे सहजीवन, संघर्ष आणि शहाणपण, समाज आणि संस्कृती, संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे), सावलीचा शोध (सामाजिक) – हरवलेले स्नेहबंध आदी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांत वैचारिक लेखन केलं आहे.
२०१२ मध्ये पुण्यात झालेल्या तेराव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. २००३ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. त्यांना भैरुरतन दमाणी पुरस्कार (२०११), प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान मिळाला आहे. औरंगाबादमध्ये २०१४ मध्ये झालेल्या जलसाहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. वैचारिक लेखन करणारे लेखक म्हणून मराठी साहित्यविश्वात न्या. चपळगावकर यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांनी मराठी आणि कायदा या विषयाचं अध्यापन केल्यानंतर २७ वर्षं वकिली केली. ते नऊ वर्षं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ते गुणश्री प्राध्यापक होते. तसंच आय. एल. एस. विधी महाविद्यालयात ते फोर्ड अध्यासनाचे मानद प्राध्यापक होते.
कायदा, समाजव्यवस्था आणि साहित्य या विषयात त्यांना रस असून याविषयी विपुल लेखन केलं आहे. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषद, राजवाडे संशोधन मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, प्राज्ञपाठशाळा मंडळ अशा विविध संस्थांची मानाची पदं भूषवली आहेत. त्यांना अनेक महत्त्वाच्या मानसन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चपळगावकर म्हणले, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हा मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांच्याबद्दल आपलं मत मांडण्याची मोठी संधी आहे, असं मी मानतो.’ आजवर साहित्य संमेलनाला लेखक, कवी अध्यक्ष म्हणून लाभले; पण या वेळी चपळगावकर यांच्या रूपाने विचारवंत लेखक तसंच तर्कनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ भूमिका घेणारे साहित्यिक संमेलनाध्यक्ष झाले आहेत. न्या. चपळगावकर हे महाराष्ट्रात लोकशिक्षण करणाऱ्या विचारवंतांच्या मालिकेतले एक प्रमुख विचारवंत आहेत. त्यांचे वडील हे बीडमधले एक नावाजलेले वकील होते.
न्या. चपळगावकर यांनी एकाच वेळी कायदा आणि मराठी या दोन विषयांमध्ये पहिल्या वर्गात एम. ए. पूर्ण केलं. त्यानंतर ते लातूरला मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. वर्षभरानंतर ते वडिलांना वकिलीत मदत करण्यासाठी बीडला गेले. हळूहळू त्यांच्या वकिलीचा विस्तार वाढला. आपण समाजाचं देणं लागतो, याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. गरीब, दीनदुबळे, मजूर, शाळामास्तर अशा वर्गांचे खटले ते पैसे न घेता चालवत असत. पुढे ते मुंबई उच्च न्यायालयातही वकील म्हणून यशस्वी झाले. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्यावरही ते आपलं सामाजिक दायित्व विसरले नाहीत. वकिलीबरोबरच त्यांनी लेखनाच्या क्षेत्रातही भरीव कार्य केलं आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अतिशय मौलिक कार्य करणाऱ्यांच्या कार्याचा परिचय करून देण्याच्या हेतूने त्यांनी सप्रमाण लेखन करून नेहरू, पटेल, राजाजी, राजेंद्रप्रसाद, सुभाषचंद्र बोस इत्यादींवर ‘त्यांना समजून घेताना’ हे पुस्तक लिहिलं. पंडित नेहरू यांच्यावर लिहिलेलं त्यांचं पुस्तक येऊ घातलं आहे. वैचारिक आणि अतिशय वाचनीय लेखन, सोपी पण अर्थसमृद्ध शैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यं आहेत. त्यांचं लेखन कधीही सत्याला सोडून दिसत नाही. अशा या लेखनाचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोल फार मोठं आहे.
नरेंद्र चपळगावकर यांनी एका भाषणात मातृभाषेतल्या शिक्षणाचं महत्त्व विषद केलं होतं. ‘आपली मातृभाषा आपण बोललो तरच वाढेल. यासाठी आपण सर्वांनी आग्रह धरणं आवश्यक असून मराठी शाळांना आवश्यक साधनसामग्री द्यावी. यासाठी शासनाबरोबर पालकांचाही पाठिंबा आवश्यक आहे,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. ‘राज्यघटनेने आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवून आपलं शिक्षण, राज्यकारभार मराठीत झाला पाहिजे. कायद्याची पुस्तकं मराठीत आली आहेत. आपल्या व्यवहाराची भाषाही मराठी असावी,’ असा त्यांचा आग्रह होता. लेखकाला लेखनाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, असं सांगताना राजसत्ता आणि जनता यांच्यात एक तिसरी शक्ती आहे. या तिसऱ्या शक्तीमुळे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहतं, असं मत त्यांनी मांडलं होतं. औरंगाबादमध्ये न्या. चपळगावकर यांच्यासह अनेकांनी ‘संडे क्लब’ स्थापन केला असून, त्यात वैचारिक मंथन होतं. शिक्षणपद्धती पूर्वीसारखी राहिलेली नाही, ती खूप बदलली आहे. शिक्षणाच्या सोयी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्याच्या गुणवत्तेबद्दल नंतर विचार करू; पण अगदी लहान लहान खेड्यांमध्येही महाविद्यालयं स्थापन झाली आहेत. अनेक मुलं शिकली, त्यांना अभ्यासक्रमातून काय मिळालं हा एक भाग महत्त्वाचा आहेच; पण त्यांचा आत्मविश्वास वाढला ही बाब जास्त महत्त्वाची आहे, या शब्दांमध्ये त्यांनी बदलाचं स्वागत
केलं आहे.
-डॉ. संजय कळमकर