मराठी चित्रपटसृष्टीला विनोदी चित्रपटांची लाभलेली परंपरा पाहता, हसून हसून पोट दुखले तरी काही चित्रपट एकदा नव्हे तर दहा वेळा पाहिले तरी समाधान होत नाही. अशा चित्रपटांची निर्मिती आजच्या पिढीसाठी होताना विनोद निर्मिती करताना अख्खंच्या अख्खं वऱ्हाड आणि वाजंत्री प्रेक्षकांच्या भेटीला आणून ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय पाटकर यांनी हास्य विनोदाची जंत्रीच या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या पिढीसमोर उभी केली. बरं हा लग्नसोहळा नुसता अक्षता टाकण्यास भाग पाडणारा नाही, तर तीन वेळा लग्न मोडून पुन्हा बोहल्यावर उभे राहण्याची मानसिकता असलेल्या नवरदेवाच्या सहनशीलतेलाही सलामी करणारा आहे.
यामध्ये विनोदवीर कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून आपापल्या भूमिकेतून समरसलेले पाहायला मिळतात. जे कलाकार आजवर आपण लहानपणापासून पाहत आलो, ज्यांच्या विनोदी अभिनयाने प्रभावित झालो त्याच कलाकारांनी नव्याने ‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या निमित्ताने जेव्हा प्रत्यक्ष संवाद साधला तेव्हाचा क्षण तर हास्याच्या लकेरीनेच दरवळला.
मराठी चित्रपटसृष्टीतला विनोद हा केवळ चित्रपट पाहून आपल्याला जेवढा हसवतो, तेवढाच तो त्या चित्रपटातील कलाकारांना भेटल्यावर, त्यांच्याशी केलेल्या गप्पाटप्पांतून आपल्याला पोट धरून हसवून विनोदाचं खरं मर्म उलगडवणारा ठरतो. चित्रपटाची निर्मिती कशी झाली? चित्रपटाची कथा काय आहे?, चित्रपट कसा असेल? काय असेल विनोदी बाणा? असे विविध प्रश्न मनात घोंगावणारे असतात. अजून एक प्रश्न असतो जो की, चित्रपटातील विनोद आणि कलाकार यांचं नातं. मुळात विनोदी चित्रपट करताना कलाकार हा विनोदी स्वभावाचा असेल यात तथ्य काहीच नसतं. कारण अभिनय साकारताना कलाकार त्या भूमिकेत शिरून वावरत असतो. मात्र इथे चित्र वेगळं दिसलं. वऱ्हाडी वाजंत्रीची टीम दैनिक प्रहारमध्ये दाखल झाली आणि हास्याचे कारंजे उडाले. वऱ्हाडी वाजंत्री या दोन शब्दातूनच उभं राहिलं चित्रं ते लग्नाच्या वऱ्हाडाचं. एका लग्न सोहळ्याचं. ज्यामध्ये गडबड, घाई, गोंधळ, हास्यविनोद आहे. त्यांचा अनोखा पेहराव, मुडावळ्या, लग्नातलं वऱ्हाड, यजमानी, सनई, मंगलाष्टका, अंतरपाट, दुमदुमणारं वाजंत्र आणि ते वाजवणारे वाजंत्री आणि एकदा सोडून अनेकदा लग्नाच्या बोहोल्यावर उभा राहणारा संपूर्ण वऱ्हाडी वाजंत्रीसमवेतचा नवरा मुलगाही आहे. इतकंच नाही तर या एवढ्या प्रसंगात कुणीही दमत नाही हे विशेष आहे.
ज्या कलाकारांना आपण विनोदाच्या जंत्रीमध्ये लहानपणापासून टीव्ही पडद्यावर पाहत आलो. ते ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपटाचे निर्माते विजय पाटकर, अनेक चित्रपटांतून विनोदी भूमिकेत समरसलेले विजय कदम, गंगूबाई नॉनमॅट्रिक फेम तसेच हास्यजत्रा, फू बाई फू, विविध चित्रपट, नाटकांतून विनोदी भूमिका अंगीकारलेले पंढरीनाथ (पॅडी) कांबळे, तर मराठी, हिंदी भूमिका साकारलेले, चित्रपट मालिकांतून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेले जयवंत वाडकर असे मराठी चित्रपटसृष्टीतले तारे केवळ अभिनयच नव्हे तर आपल्या मूळ विनोदी स्वभावाने म्हणा, हजरजबाबीपणामुळे म्हणा जिथे प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतात. तिथे विनोदाचे खरे मर्म ठरते आणि ठरले. प्रहारमधील गप्पाटप्पांतून वऱ्हाडी वाजंत्रीचा उलगडलेला प्रवास चित्रपटाच्या भूमिकेपासून प्रत्येक कलाकाराच्या जीवन प्रवासांची मर्म सांगणारा ठरला आहे. घराघरात पोहोचलेल्या कलाकारांनी संवादाच्या माध्यमातून ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपट उलगडवला. दैनिक प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे यांनी अनेक वेगवेगळ्या प्रश्नांतून, गप्पांतून, चित्रपटाच्या कथानक विनोदापासून झालेल्या चर्चेतून कलाकारांना बोलते करत हास्य गप्पाटप्पांच्या माध्यमातून कलाकारांचा अचूक प्रवास उलगडवला. यावेळी दै. प्रहारचे मुख्य लेखा व्यवस्थापक ज्ञानेश सावंत तसेच प्रहारची टीम उपस्थित होती.
‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्यासमवेतचा अनुभव साऱ्यांनीच कथन केला. या विनोदी हास्यातून एक शिस्तीचा नजाराही पाहावयास मिळाला. सिनेमा, तसेच घरच्या कार्यक्रमातही परफेक्ट राहणारे दिग्दर्शक विजय पाटकर सिनेमाच्या शूटिंगवेळी वेळेच्या बाबतीत खूपच स्ट्रीक्ट असल्याचे दिसून आले. सूर बिघडला की सारे शेड्यूल बिघडते या विजय कदम यांच्या वाक्यातून जीवनातील शिस्त कशी असावी याचा प्रत्यय आला. विजय पाटकर यांच्यासोबत काम करताना हसत खेळत का होईना पण त्यातही एक शिस्त असल्याचे पॅडीने सांगत विजय पाटकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.
‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटात पॅडी कांबळे हे नवरदेवाच्या भूमिकेतील अफलातून विनोदी व्यक्तिमत्त्व रसिकांवर जादू निर्माण करते. खरं तर आपण नेहमी कुणाच्या ना कुणाच्या लग्नाला जातो. पण हे लग्न काही एकदा नव्हे तर तीनदा मोडते. यावेळी नवऱ्याचे मामा, आप्तेष्ट, नातेवाईक, मंडपवाला, वऱ्हाडी वाजंत्री असे सारेचजण आपापल्या भूमिकेचे वैशिष्ट्य जपणारे ठरतात.
या सगळ्यात मुलाचे मामा, मेहुणे, दोन बायका, त्यातील संवादफेक विनोदाचा जपलेला सूर या चित्रपटातून उलगडत जातो. आचारी, बँडवाला, मांडववाला हे सारे या चित्रपटातून विनोदाचा अर्क जोपासतात. लोकांच्या लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा रंग भरण्यास मदत करतात. अगदी विनीत भोंडेलाही एक अनोखी व्यक्तिरेखा देण्यास निर्माता विजय पाटकर हे सक्षम ठरले आहेत. चर्चा, गप्पांतून मंगलाष्टकाचा घुमणारा सूर, लग्न ठरल्यापासून मंडपात होणाऱ्या विनोदी घडामोडींचा उलगडा या चित्रपटातून झाल्याचे समजले. या गप्पांतून रंगताना ‘वऱ्हाडी वाजंत्री’चा टेम्पो थेट लग्नसोहळ्यात नेणार ठरला. पॅडी असो किंवा असो दिग्दर्शक विजय पाटकर, विजय कदम असो किंवा असोत जयवंत वाडकर प्रत्येकाची विनोदी शैली त्यांच्या आजवरच्या अनुभवाचे सार सांगणारी ठरली. घटनांचा वेध घेऊन अनेक बारकावे न्याहाळताना ‘शुभमंगल सावधान…’च्या सुरात श्रीराम जय राम जय जय राम…चा सूर अगदीच हास्याच्या खळखळाट करणारा ठरला. खरं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाहण्याजोगा असा ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा नाही का?
-प्रियानी पाटील