
खेड (प्रतिनिधी) : मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मस्जीद रेल्वे स्थानकादरम्यान असलेला रोड ओव्हर ब्रिज हटवण्याच्या कामासाठी रेल्वेने ट्राफिक तसेच पावर ब्लॉक घेतला आहे. या कामामुळे मुंबई बाहेरील शहरांमधून सीएसएमटीकडे येणाऱ्या ११ एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.
रेल्वे मार्गावरील जुना पूल तोडण्याचे काम १९ व २० नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या ११ गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होणार आहे. कामासाठी मध्य रेल्वेने ब्लॉक घेतल्यामुळे मडगाव-मुंबई-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसचा १९ व २० नोव्हेंबर रोजीचा प्रवास दादर स्थानकातच संपणार आहे. याचबरोबर मडगाव-मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा प्रवासदेखील १९, २० नोव्हेंबर रोजी दादर स्थानकातच संपणार आहे. रेल्वे मार्गावरील या कामामुळे १९ नोव्हेंबर रोजी सुटणारी मडगाव- सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस या गाडीचा दिनांक १९ नोव्हेंबर रोजीचा प्रवास पनवेल स्थानकात संपणार आहे.
१९ नोव्हेंबर रोजी सुटणारी मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस ही गाडी देखील मडगाव होऊन मुंबईला येताना पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहे. १९ नोव्हेंबर रोजीची मंगळूर जंक्शन ते मुंबई सीएसएमटी स्थानकादरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी आपला प्रवास पनवेल स्थानकातच संपवणार आहे.
रेल्वे ब्लॉकमुळे २० नोव्हेंबर रोजीची मडगाव-मुंबई सीएसएमटी ही गाडी देखील मुंबईच्या दिशेने येताना सीएसएमटी ऐवजी पनवेल स्थानकातच विसावणार आहे. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या पाच गाड्यांच्या सुटण्याच्या ठिकाणांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २० नोव्हेंबर रोजीची मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकातूनच कोकण रेल्वेसाठी रवाना होणार आहे. २० नोव्हेंबर रोजीची मुंबई सीएसएमटी ते मडगाव दादर स्थानकावरूनच सुटणार आहे.
२० नोव्हेंबर रोजी मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान मांडवी एक्स्प्रेस पनवेल स्थानकामधून कोकण रेल्वेसाठी रवाना होणार आहे. २० नोव्हेंबर रोजीची मुंबई-सीएसएमटी ते मंगळूर दरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस देखील सीएसएमटी ऐवजी पनवेल स्थानकातूनच मंगळवारीसाठी सुटणार आहे. मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी कोकण कन्या एक्स्प्रेस १९ व २० नोव्हेंबर रोजी सीएसएमटीऐवजी पनवेल स्थानकातूनच मडगावला जाण्यासाठी रवाना होणार आहे.