Friday, May 9, 2025

कोलाज

शिस्त

शिस्त

नीता इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी. शाळेतून घरी येते. चप्पल एका कोपऱ्यात भिरकावते. टाय, कपडे काढून खुर्चीत फेकते. आजी जोराने ओरडते ‘एवढी मोठी झालीस! तुला तुझे कपडे ठेवता येत नाहीत.’ नीताही चिडते आणि आजीला म्हणते, ‘तुझं काम काय?’


पालकहो, पाहिलंत आजची मुलं बेफिकीर, बेशिस्त झालीत. त्यांना शिस्तच नाही. असे घराघरातून सूर ऐकू येतात. पूर्वीच्या काळाचं ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ हे गीत आजच्या काळात लयाला गेलेलं दिसतंय.


आपल्याला असणारा कमी वेळ. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता जणू काही आपण त्यांच्या अधीन झालेलो आहोत. समस्या अधिक वाढते. अयोग्य कृती घडते. रागाचा स्फोट होऊन हात उगारला जातो आणि घरातील वातावरण दूषित होऊन जाते. या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी काही शिस्तविषयक नियम आपणही लक्षात घेतले पाहिजेत.


वरील उदाहरणांमध्ये आजी नातीला जवळ घेऊन म्हणाली असती की, ‘माझी राणी किती दमून आली. अगं मला काम जमत नाही. चल तर आपण दोघे मिळून कपडे घडी करून ठेवूया.’ यावर नात विचार करेल आणि आजीला म्हणेल. ‘तू बस मी करते.’


आजच्या मुलांना दीर्घोत्तरी उत्तर अपेक्षित नाहीत, एका वाक्यात नव्हे तर एकाच शब्दात आपण त्यांच्याशी बोलूया. आमच्या वेळी असं काही नव्हतं हे मुलाला आपण नेहमी ऐकवत असतो हे सुद्धा बहुतेक वेळा चुकीचं ठरू शकतं.


आपल्याला आवडणारी स्वच्छता, नीटनेटकेपणा आपल्या मुलांकडून अपेक्षित असेल, तर आपण आणि मुले मिळून दोघांनीही ती सुरुवात करूया म्हणजे मुलेसुद्धा आपल्या वस्तू जागेवर ठेवतील. शोधाशोध होणार नाही आणि वेळही वाचेल.


मुलांच्या चुकीबद्दल आपल्यामध्ये सहनशीलता असणे आवश्यक आहे. तो त्या वेळेस असा का वागला हे आपण नम्रतापूर्वक समजून घेणं महत्त्वाचं आहे.


काही प्रसंगी आपण मत वर्चस्व न गाजवता मुलांच्या तत्त्वांचा आणि इच्छाशक्तीचा विचार करायला हवा. शिस्त लावताना आई-बाबांमध्ये दुमत नसावं. एकाने शिस्त लावताना दुसऱ्याने विरोध करू नये. शिस्तीबाबत नियम ठरविताना मुलांशी बोलून नियम ठरवूया. शिस्त लावताना केलेले नियम मुलाच्या किती हिताचे आहेत, हे त्याला समजवून सांगूया. शिस्तीचा अतिरेक न करता आपण आपला सहवास देऊन त्यांच्या भावनांची पूर्तता करूया. त्यामुळे आपण आणि आपली मुलं यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही. पुढील गोष्टींतून शिस्तीविषयी दृष्टिकोन अधिक स्पष्ट करूया,


एक मुलगा बाबांसोबत पतंग उडवित होता. बाबा, ‘पतंग आकाशात कशामुळे वर उडत जातो? बाबा म्हणाले, ‘दोऱ्यामुळे’
नंतर मुलगा म्हणाला, बाबा, दोरा पतंगाला खाली धरून ठेवतो, बाबांनी दोरा तोडला... आणि म्हणाले, ‘आता काय होतंय ते सांग.’ मुलगा म्हणाला, पतंग खाली आला. बाबा म्हणाले, ‘बेटा जी गोष्ट आपणास खाली ओढते असं वाटतं तीच गोष्ट आपल्याला भरारी मारायला सुद्धा मदत करते ती गोष्ट म्हणजे शिस्त.’


-पूनम राणे

Comments
Add Comment