धोंड्या

  224

मुलं होऊनही ती जगत नसली, तर पूर्वी दगडू, धोंडू, धोंड्या, भिकू वगैरे त्यांची नावं पाळण्यात असताना ठेवली जात आणि बिचाऱ्यांना जन्माची ती चिकटत. या मुलांना समजू लागलं की, सगळीजणं मग त्याला धोंड्यापांड्या किंवा नुसतंच शाळेतले मास्तरही ‘नावाप्रमाणेच धोंड्या आहेस रे नुसता! अगदी दगड!’ असं जेव्हा हेटाळणीने बोलत असतील, तेव्हा त्या कोवळ्या जीवाला काय वाटत असेल? कदाचित हा धोंड्या ‘धोंडोपंत’ म्हणून आदरही मिळवत असेल, नव्हे तसा तो कित्येकांनी मिळवलायही! बघा आठवून! त्यांचं नाव त्यांच्या कर्तृत्वाच्या आड कधीच आलं नाही. अशा दोन्ही बाजूही समाजात पाहायला मिळतात. नाहीतरी शेक्सपिअरने म्हटलंच आहे, ‘नावात काय आहे?’ तेही खरंच आहे. ठेवलेल्या नावाला साजेसं कर्तृत्व असेल, तर सोन्याहून पिवळं, पण जी गोष्ट त्या व्यक्तीच्या हातात कधीच नसते, तरीही त्या नावावरून त्याला हिणवलं जातं किंवा नावाजलं जातं ते सर्वस्वी आजूबाजूच्या परिस्थितीवर, माणसांवर आणि काही प्रमाणात त्या व्यक्तीच्या गुणदोषांवर अवलंबून असतं, असं निदान मला वाटतं!


धोंड्याचा विषय निघाला की, मला प्रथम आठवतो विंदांचा अजरामर ‘धोंड्या न्हावी!’ त्यांनी जे कवितेतून शब्दचित्र जबरदस्त उभं केलंय त्याला तोड नाही! विंदांनी त्याचं केलेलं वर्णन आपल्या डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं राहतं.


आमच्या ओळखीत पण एक धोंड्या होता. आडदांड अंगकाठी, सावळा वर्ण, फटकळ आणि थोडा विनोदीही. एका गावात आमच्या वडिलांच्या ओळखीने मी त्यांच्या बरोबरच त्यांच्या मित्राच्या म्हणजे एका काकांच्या घरी गेले होते. तिथे कोणत्या तरी ग्रामदैवताच्या देवळात मोठा उत्सव होता. दोन-तीन दिवस चालायचा. त्या काकांकडे त्यांचे मुंबईचे सारे नातेवाईक आलेले होते. शेजार-पाजारचेही मुंबईकर खास उत्सवासाठी आलेले होते. त्यामुळे उत्साहाचं वातावरण होतं. काकांच्या घरचा खास मान असल्याने त्यांच्याकडची लोकं घरचं सगळं आटपून आलटून पालटून देवळातच व्यवस्था पाहायला जायची. तिथेच आमची या धोंड्याशी ओळख झाली.


तिथे धोंड्या एकदमच फेमस होता वाटतं! कोणतंही काम असो, प्रत्येकजण धोंड्याला हाक मारायचा. लगेच धोंड्या ते काम करायला पळायचा. मग ते चहाचं आधण ठेवणं असो, लाकडाच्या भाऱ्या आणणं असो, एखादा बल्ब कुठेतरी लावणं असो की, एखादा निरोप सांगून येणं असो. धोंड्या ते काम हमखास करणार! पण बोलता बोलता एखादी शाब्दिक कोटी केल्याशिवाय राहायचा नाही! की आजूबाजूचे सारे हसायचे. त्याला मुलांचाही फार लळा होता. आपली भाचवंडं, पुतणी यांचंही तो सारं प्रेमाने करायचा. त्याच्याकडे बघून मला पुलंच्या ‘नारायण’ची आठवण येत होती. खरं तर आमची त्याच्याशी काहीच ओळख नव्हती, पण काकांचे आम्ही पाहुणे म्हटल्यावर, तो आमच्याकडेही त्यांच्या माणसांसारखं लक्ष पुरवत होता. आम्हाला तिथली माहिती देत होता.


तो फार शिकलेला नव्हता. मुंबईत कुठे तरी किरकोळ कामाला होता. कुठच्या तरी गुन्ह्यात अडकून जेलची वर्ष-दोन वर्षं राहून बाहेर आला होता. त्याच्या पायांना म्हणे नालही ठोकले होते. घरातलेही त्याच्याशी फटकून वागत. त्याचा मोठ्या भावाने घरात आसरा दिला होता. पण फार मान मिळत नव्हता. तर असा हा धोंड्या काकांच्या ओळखीने आमच्याही ओळखीचा झाला. आम्ही साऱ्या बहिणीच. एकदा भाऊबीजेला त्याला आम्ही ओवाळले होते. त्याने त्याच्या ऐपतीप्रमाणे सगळ्यांसाठी म्हणून पाच रुपये तबकात टाकले. आमच्याकडे अगदी आमटी-भातही तो आनंदाने खायचा.


रात्री ओटीवर बसून आमच्या गप्पागोष्टी, गाण्यांच्या भेंड्या वगैरे चालायच्या. ‘मेरी, तुझे केस लांब लांब लांब| पापा बघतात तुझे पापा बघतात’ या मेरीच्या केसांना काय काय जोडून लांबलचक गाणं तो म्हणायचा.


एकदा देवाच्या उत्सवात देवळाभोवती प्रदक्षिणा घालताना ‘भोवत्या’ कशा घालतात ते शिकवलं होतं. ‘ज्या मंत्राने वाल्याकोळी तरला रे| तो मंत्र मुखाने बोला रे, बोला श्रीराम जय राम जय जय राम||’ हे गाणं शिकवलं.


आमच्याकडे एकदा तो आला. आमची धाकटी बहीण तेव्हा पहिली-दुसरीत होती. काही तरी अभ्यास करीत होती. हा हळूच तिथे जाऊन तिची खोडी काढू लागला. तिची पट्टी लपवली. एकेक वस्तू तो लपवू लागला. तिला ते समजलं. ती रडकुंडीला आली. आम्ही सगळ्या बहिणींनी त्याला तिचं दप्तर देऊन टाकायचा आग्रह केला. त्याने दिलं नाही. माझे वडीलही हे सर्व तिथे झोपाळ्यावर बसून बघत होते. रात्रीची वेळ होती. त्यांना झोप येत होती. ते तापटही होते. तिथेच पडलेली एक छोटी काठी धोंड्याच्या दिशेने भिरकावली. ती धोंड्याला लागण्याऐवजी बहिणीच्या पायाला लागली. ती रडू लागली. आम्ही बहिणींनी तिला जवळ ओढली. तिला आत नेऊन डोळे पुसले. तिच्या पायाला तेल लावलं. त्याचवेळी धोंड्याकडे सगळ्यांनी जळजळीत नजरेने बघितले. तसा धोंड्या कानकोंडा होऊन चालता झाला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी दिसला तो एका मंगल कार्यालयात आचारी म्हणून. मला हाक मारून माझी आणि घरच्यांची प्रेमाने चौकशी केली. पण, त्याच्या मनात मस्करीचा प्रसंग लक्षात होता. त्याबद्दल त्याने माफी मागितली. नंतर कोणाकडून तरी उडत बातम्या कळायच्या, ‘धोंड्या मुंबईला गेला... धोंड्या आजारी आहे... धोंड्या आजारपणात गे...ला’. धोंड्याचा ‘दी एन्ड’ झाला. खरंतर त्याच्याबद्दल तेव्हा वाईट वाटलं होतं. त्याला समजून घेणारं त्याच्या आयुष्यात त्याला कुणीच भेटलं नाही? तसं कुणी असतं तर धोंड्या कोणीतरी वेगळा झाला असता का? अनेक प्रश्न मनाला पडतात! अशा या धोंड्याचं खरं नाव ‘प्रकाश’ होतं, हे मला खूप उशिरा कळलं!


-अनुराधा दीक्षित

Comments
Add Comment

गोष्ट एका उंदराची!

कथा : रमेश तांबे एक होता उंदीर. तो एका घरात राहायचा. घरभर फिरायचा. मि

सूर्य चालताना का दिसतो?

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यची त्याच्यासारख्याच एका हुशार पण गरीब मुलासोबत आता चांगली ओळख झाली होती. तो मुलगा

इलो मिरग

वैष्णवी भोगले खरंच कोकणातल्या मिरगाच्या पावसाची एक वेगळीच मज्जा असते. कोकण तसं वर्षभर सुंदर दिसलं तरी अधिक

सिडनीमध्ये मुंबईचा वडा-पाव

अजित राऊत आम्ही ऑस्ट्रेलियात अनेक प्रेक्षणीय ठिकाणी फिरलो. त्यातील प्रमुख म्हणजे सुप्रसिद्ध ऑपेरा हाऊस, तसेच

काव्यकोडी

एकनाथ आव्हाड गुरुजी गुरुजी आमचे रोजच फळ्यावर लिहायचे सुविचार म्हणायचे सुविचारासारखा

मेरी बात और हैं...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे साहिर म्हणजे तरल शायरीचा हॉलमार्क! हळव्या, उत्कट भावना तळहातावर घेऊन तुमच्या