प्रामाणिकपणा हा गुण माणसांमध्ये शिल्लक आहे की नाही, हा प्रश्न फक्त उरलाय. प्रामाणिकपणा हा शब्द शिल्लक आहे. पण त्यातील अर्थ मात्र शिल्लक राहिलेला नाही. मोठमोठे उद्योगधंदे, व्यवसाय, कंपन्या हे सर्व तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणांवर चालत असतात व भरभराटीस येत असतात. हा प्रामाणिकपणा जर कर्मचाऱ्यांमध्ये राहिला नाही, तर ती कंपनी, व्यवसाय रसातळाला जाऊन पोहोचतो. अप्रामाणिक कर्मचारी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणची बरबादी केल्याशिवाय राहू शकत नाही.
शहरामध्ये नावारूपाला आलेली बँक तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे अनेक खातेदारांनी त्या बँकेत आपली खाती उघडलेली होती. सर्वात जास्त मेंबर त्या बँकेत होते. विश्वासाची बँक अशी ती बँक नावारूपालाही थोड्याच अवधीत आली होती. त्या बँकेमध्ये एक नवीन मॅनेजर आले आणि सर्व व्यवहार पुन्हा नव्याने बघू लागले. या सर्व गोष्टी बँकेत तपासताना हाताळताना त्यांना थोडा अवधी लागला. मग एक गोष्ट त्यांच्या सतत लक्षात येऊ लागली की एका अकाऊंट नंबरमध्ये बँकेचे पैसे जमा होत होते आणि ते काढले जात होते.
त्याचा हिशोब मात्र त्यांना लागत नव्हता. त्यांनी बँकेत येणारे आणि जाणारे चेक जी व्यक्ती हाताळत होती, त्यांच्याशी त्यांनी विचारणा केली, तेव्हा ती व्यक्ती सरळ काही उत्तर मॅनेजरना देईना. त्यावेळी नवीन मॅनेजर यांना त्या व्यक्तीवर संशय आला. मॅनेजर यांनी कमिटीतील मेंबर यांची मीटिंग घेऊन सरळ पोलीस कम्प्ंलेट केली. त्यावेळी झालेला प्रकार बँकेतील कमिटीच्या समोर आला. प्रकार असा होता की, त्याच बँकेमध्ये काम करणारा शिपाई आणि नवीन मॅनेजर येण्याअगोदरचे जुने मॅनेजर व चेकचा देवाण-घेवाण करणारा अधिकारी या तिघांनी मिळून, हा गैरव्यवहार केलेला होता.
त्यासाठी त्यांनी हाताशी एका व्यावसायिकाला पकडलेलं होतं आणि तो व्यावसायिक होता दूध व्यावसायिक. या दूध व्यावसायिकाचे त्या बँकेमध्ये सेव्हिंग खाते होते. त्याचप्रमाणे त्या बँकेतील शिपाई यांनी आपलं खातं त्याच बँकेत उघडलेलं होतं. हा दूध व्यावसायिक दर महिन्याला चेक द्यायचा. तो चेक बँकेत वटला जाऊन शिपायाच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे. जो दूध व्यावसायिक होता, त्याच्या दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये काही शिल्लक नसायचे. ज्यावेळी दूध व्यवसायिक शिपायाच्या नावाने चेक देत होता व शिपाई त्या बँकेमध्ये चेक टाकत होता. त्यावेळी हा शिपाई जेवढे बँकेत चेक येत असत ते सर्व घेऊन त्या त्या बँकेमध्ये जायचा. त्यावेळेस ज्यांचे चेक आहेत त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा आहेत की नाही, हे चेक केले जायचे. त्यावेळी नेमके शिपाई दूध व्यावसायिकाचा चेक बाजूला करत असे आणि आपल्या बँकेत आल्यावर तो चेक परत इतर चेक बरोबर ठेवला जात होता.
साहजिकच इथल्या कर्मचाऱ्यांना तोच एक पास होऊन आलेला चेक आहे, असं वाटायचं आणि शिपायाच्या खात्यामध्ये ही बँक पैसे ट्रान्स्फर करत होती आणि जुना मॅनेजर ज्याच्याकडे चेक जात होते, तो अधिकारी आणि शिपाई यांच्या संगनमताने सर्व होत होतं आणि गेली अनेक वर्षं हे असंच चालू होतं आणि कितीतरी लाखो रुपये या तिघांनी बँकेचे लुटलेले होते. त्याची जराही कल्पना बँकेच्या कमिटी मेंबरला मॅनेजरने होऊ दिली नव्हती. ज्यावेळी नवीन मॅनेजर आली त्यावेळी सर्व गोष्ट उघड झाली. पोलिसांनी शिपाई, जुने मॅनेजर व चेक ज्यांच्याकडे येत होते त्या अधिकाऱ्यांना अटक केली आणि ती केस आता कोर्टात चालू आहे.
या तिघांच्या अप्रामाणिकपणामुळे आज बँक डगमगायला आलेली आहे. जी बँक विश्वसनीय बँक म्हणून ओळखली जात होती, तिथेच आता खातेदारांना अविश्वास निर्माण झालेला आहे.
बँकेतील कर्मचारी जर अविश्वसनीय असतील, तर तिथे खातेदारांचे कष्टाचे पैसे सुरक्षित राहतील याची कोणतीही शाश्वती दिली जाऊ शकत नाही.
(सत्य घटनेवर आधारित)
-अॅड. रिया करंजकर