नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आमच्या सुखात आम्ही सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही सुखी. त्यामुळेच स्वत:चा देश सुधारण्याकडे लक्ष नाही, असे सडेतोड प्रत्युत्तर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना दिले आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाची खिल्ली उडवली. त्यांच्या ट्विटला इरफान पठाणने सडेतोड उत्तर दिले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी टी-२० विश्वचषकातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी दोन सामन्यांतील धावसंख्येचा उल्लेख केला आहे. पहिली धावसंख्या म्हणजे, मागच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताविरुद्ध १५२ धावा करत १० विकेट्सने विजय मिळवला होता. दुसरी धावसंख्या म्हणजे, यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताविरुद्ध १७० धावा करत १० विकेट्सने सामना जिंकला.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या या ट्विटला उत्तर देताना इरफान पठाण यांनी लिहिले की, “तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आमच्या सुखात आम्ही सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही सुखी. त्यामुळेच स्वत:चा देश सुधारण्याकडे लक्ष नाही.” या ट्विटनंतर शाहबाज शरीफ यांना खूप ट्रोल व्हावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार बाबर आझम यांनाही पत्रकारांनी या मुद्द्यावर प्रश्न विचारला. यावर बाबर म्हणाला की, “आमच्यावर कोणताही दबाव नाही, पण मला या ट्विटबद्दल कोणतीही माहिती नसल्याने मी माफी मागतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की, आम्ही प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू.