मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा थरार उद्या रविवारी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’च्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या यादीत भारताची रन मशीन विराट कोहली आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव यांना स्थान मिळाले आहे. या यादीत पाकिस्तानचे दोन आणि अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या इंग्लंडच्या तीन खेळाडूंचाही समावेश आहे.
या यादीत न्यूझीलंडचा एकही खेळाडू स्थान मिळवू शकलेला नाही. या यादीत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरशिवाय सलामीवीर एलेक्स हेल्स आणि अष्टपैलू सॅम करन यांचाही समावेश आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खान आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीपर्यंत पोहचण्यासाठी विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळी खेळली आहे. विराट कोहलीने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, तर सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी खेळली आहे. त्यामुळेच हे दोन्ही खेळाडू ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’च्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत आहेत.