Friday, November 14, 2025

ॲमेझॉनमध्येही होणार नोकरकपात; ३७०० कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

ॲमेझॉनमध्येही होणार नोकरकपात; ३७०० कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : जगभरातील मोठ्या कंपन्यांमधील नोकर कपात थांबण्याचे नाव घेत नाही. मेटापाठोपाठ आता ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. त्याचा फटका अनेक कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आता ॲमेझॉन कंपनीनेही नोकर कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याशिवाय कंपनीने नवीन भरतीवरही तत्काळ बंदी घातली आहे. आर्थिक परिस्थितीचे कारण देत सध्या ॲमेझॉन कंपनीतील भरती थांबवण्यात आली आहे. तसेच ३७००हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात येणार आहे.

आर्थिक मंदीमुळे ॲमेझॉन कंपनीने तोट्यात असलेल्या प्रक्रिया बंद करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या आठवड्यातच हायरिंग फ्रीजची घोषणा केली. यानंतर आता कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याआधी मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि मेटा या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवले होते. आर्थिक नुकसानीमुळे या कंपन्यांनी हा निर्णय घेतला. फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने ११ हजार कर्मचारी हटवले. तर ट्विटरने निम्मे कर्मचारी कामावरून काढून टाकले. त्यानंतर आता अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉननेही नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment