संजय मांजरेकर
श्रीवर्धन : राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच सातासमुद्रा पलीकडे देश – विदेशातही भक्तगण असणाऱ्या व नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध दिवेआगर सुवर्णगणेश प्रकटदिनाचे आयोजन गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट दिवेआगरच्या वतीने करण्यात आले आहे. २५ व्या ह्या प्रकट दिनानिमित्त शनिवार १२, रविवार १३ व सोमवार १४ नोव्हेंबर ह्या तीन दिवसांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष महेश पिळणकर यांनी ‘प्रहार’शी बोलताना दिली.
दिवेआगर येथे १७ नोव्हेंबर १९९७ ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कै. द्रौपदीबाई धर्मा पाटील यांच्या नारळसुपारीच्या बागेमध्ये झाडांना पाणी देण्यासाठी खोदकाम करताना सुवर्ण गणेश सापडले. सुवर्ण गणेशासोबत त्या पेटीमध्ये रत्नजडत अलंकार देखील सापडले. त्यानंतर खऱ्या अर्थाने पर्यटनाला बहार आली. त्यानंतर २०१४ मध्ये सुवर्ण गणेशावर दरोडा पडला व दरोडेखोरांनी सुवर्णगणेश व दागिन्यांची चोरी केली. पोलिसांनी सर्व ताकदीनिशी या दरोड्याचा छडा लावला व मागील वर्षीच पुन्हा तयार केलेल्या आधीच्या प्रतिमेप्रमाणे सुवर्णगणेशाची पुनर्स्थापना करण्यात आली व पुन्हा सुवर्णगणेशाच्या आगमनाने पर्यटनाला बहार आली. दिनांक १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान २५ व्या प्रकटदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर संकष्टी चतुर्थीला सकाळी ८ वा. ब्रम्हवृदांची आवर्तने, १०.३०वा. श्रीपाद बुवा अभ्यंकर यांचे कीर्तन, १२ वा. सुवर्ण गणेश प्रकट सोहळा, तर रात्रौ ९वा विघ्नेश जोशी व निरंजन लेले यांच्या ‘शब्द सुरांचे लेणे’ हा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री ८ ते ११वा. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, सोमवार १४ नोव्हेंबर सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. श्रींचा महाप्रसाद, रात्री १० वा. ऑर्केस्ट्रा – आनंदी प्रस्तुत ‘सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर तसेच तहयात विश्वस्त बाळकृष्ण तथा उदय गणेश बापट व त्यांच्या विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.