Friday, July 11, 2025

लोकसंख्या वाढीत भारत अग्रेसर!

लोकसंख्या वाढीत भारत अग्रेसर!

नवी दिल्ली : जागतिक लोकसंख्येच्या वाढीचा दर २०२० पासून एक टक्क्याने घसरला असला तरी, संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, २०८० मध्ये जगाची लोकसंख्या शिखरावर पोहोचेल. २०२३ मध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होईल आणि भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल, असेही संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.


युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने शुक्रवारी जारी केलेल्या अहवालानुसार, १५ नोव्हेंबरला जगातील आठ अब्जव्या मुलाचा जन्म होईल, त्यामुळे जगाची लोकसंख्या आठ अब्ज होणार आहे. लोकसंख्या वाढीच्या वेगाला ब्रेक लागला असला तरी तो अजूनही वाढत आहे. वास्तविक, जगाची लोकसंख्या ७ ते ८ अब्ज होण्यासाठी १२ वर्षे लागली आहेत. परंतु, ९ अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी १५ वर्षे लागतील. २०३७ पर्यंत जगाची लोकसंख्या ९ अब्ज होईल.


अहवालात म्हटले आहे की, जगात १९५० नंतर प्रथमच लोकसंख्येच्या वाढीचा दर एक टक्क्याने कमी झाला आहे. भारत, चीनसह उच्च आणि मध्यम उत्पन्न असलेल्या ६१ मोठ्या देशांमध्ये लोकसंख्येच्या वेगाला ब्रेक लागला आहे. या देशांची लोकसंख्याशास्त्रीय रचना अशी बनली आहे की, त्यात प्रजननक्षम वयोगटाची लोकसंख्या मोठी आहे. आगामी काळात उच्च आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या अधिक तरुणांमुळेच वाढेल. तर, दुसरीकडे २०५० पर्यंत ४६ कमी उत्पन्न असलेल्या देशांची लोकसंख्या वेगाने दुप्पट होईल. सध्या जगात प्रति महिला प्रजनन दर २.३ आहे. १९५० मध्ये हा दर पाच होता. परंतु, लोकसंख्या स्थिर करण्यासाठी हा दर २.१ पर्यंत खाली आला पाहिजे. हे लक्ष्य २०५० पर्यंतच गाठले जाईल. त्याचप्रमाणे २०५० मध्ये मुलांपेक्षा दुप्पट वृद्ध लोक असतील. म्हणजेच, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या पाच वर्षांखालील मुलांच्या संख्येच्या दुप्पट असेल.


अहवालात म्हटले आहे की, २०५० मध्ये भारताची एकूण लोकसंख्या १.६८ अब्ज होईल आणि त्यानंतर चीनची लोकसंख्या १.३३ अब्ज होईल. तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश अजूनही अमेरिका आहे, ज्याची लोकसंख्या ३३.७ दशलक्ष आहे. त्याची लोकसंख्या २०५० मध्ये ३७.५ दशलक्ष असण्याचा अंदाज आहे. जगाची लोकसंख्या २०३० मध्ये ८.५ अब्ज, २०५० मध्ये ९.७ अब्ज आणि २१०० मध्ये १०.४ अब्ज होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा