
मुंबई : एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही जितेंद्र आव्हाडांची स्टाइल आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी लगावला. आव्हाडांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
आव्हाडांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही जितेंद्र आव्हाडांची स्टाइल आहे. कुठल्याही गोष्टीचे उद्दातीकरण करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जाऊन थिएटरमध्ये जो तमाशा केला, मारहाण केली. त्यामुळे कारवाई झाली. कोणीही असे केले असते, तर असेच झाले असते. खूप काही तरी केल्याचा देखावा करण्याचा आव्हाडांना नाद. त्यातून असे प्रकार होतात, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
दरम्यान, अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण कारवाईबाबत फडणवीस म्हणाले की, निश्चितपणे आता पुन्हा तिथे अतिक्रमण होणार नाही, असा प्रयत्न केला जाईल. कुठलेही अतिक्रमण असेल, ते तिथून काढले जाईल.
पूर्ण गुजरात मोदींच्या पाठिमागे आहे. तिथे त्यांना अभूतपूर्व विजय मिळेल. पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ते काम करू. त्याचा आनंद आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.