Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीलाचखोर तहसीलदार मीनल दळवीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

लाचखोर तहसीलदार मीनल दळवीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

अलिबाग (वार्ताहर) : तालुक्यातील कोळगाव येथील जमिनीच्या बक्षीस पत्राच्या नोंदीसाठी दोन लाखांची लाच घेणाऱ्या अलिबागच्या तहसिलदार मीनल दळवी यांना शनिवारी विशेष सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागाने शुक्रवारी त्यांच्यावर कारवाई करीत त्यांना अटक केली होती. त्यानंतर शनिवारी एजंट राकेश चव्हाण याच्यासह मीनल दळवी यांना रुग्णालयातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. अलिबागमधील रोहन खोत यांच्या नातेवाईकांच्या कोळगाव येथील जमिनीच्या बक्षिस पत्राचे नोंदणी करण्याचे प्रकरण तहसीलदार कार्यालयाकडे दाखल झाले होते. या बक्षिस पत्राच्या नोंदीसाठी रोहन खोत यांच्याकडे तहसीलदार मीनल दळवी यांनी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती ठरविण्यात आलेल्या एजंट राकेश चव्हाण यांच्याकडे हे पैसे देण्यासाठी शुक्रवारी खोत यांच्याकडून दोन लाख रुपये स्वीकारताना पथकाने राकेश चव्हाण याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याने तहसीलदारांचे नाव सांगितल्याने पथकाने तहसीलदारांना गोंधळपाड्यातील निवासस्थानातून ताब्यात घेतले. या अचानकपणे घडलेल्या कारवाईने मीनल दळवी यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी मीनल दळवी यांना तिच्या साथीदारासोबत न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र सकाळपासून पुन्हा तब्येत बिघडल्याने दळवी यांना न्यायालयात हजर करण्यास उशीर झाला.

अखेर दुपारी दीड वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रुग्णालयातून अलिबाग पोलीस ठाण्यात दोघाही लाचखोरांना आणले. तिथे अटकेची नोंद केल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करीत न्यायालयात हजर करण्यात आले. शनिवारी सुट्टी असतानाही विशेष सत्र न्यायाधीश भिलारे यांच्या न्यायालयात त्यांच्या सुनावणी घेण्यात आली. यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी अधिक चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अशोक भिलारे यांनी दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, लाचखोर तहसीलदार मीनल दळवीच्या अलिबागमधील घराची लाचलुचपत पथकाने झडती घेतली असता, घरात सुमारे ४० हजारांची रोखड, ६० तोळे सोने, तर मुंबईतील विक्रोळीतील घराच्या झडतीत एक कोटीची रोखड सापडल्याचे समजते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -