Friday, June 20, 2025

प्रतापगडपाठोपाठ संग्रामदुर्गावरील अतिक्रमणही हटवले!

प्रतापगडपाठोपाठ संग्रामदुर्गावरील अतिक्रमणही हटवले!

पुणे : पुण्यातल्या चाकणजवळच्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरचे अतिक्रमणही हटवण्यात आले आहे. प्रतापगडापाठोपाठ या किल्ल्यावरही ही कार्यवाही करण्यात आली. पोलिसांच्या मदतीने पुरातत्व विभागाने हे बांधकाम हटवले.


पुण्यातल्या चाकणजवळ हा संग्रामदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यावरचे बांधकाम हटवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून चार वेळा नोटीस देण्यात आली होती. मात्र हे बांधकाम हटवले जात नव्हते. अखेर पोलिसांच्या मदतीने पुरातत्व विभागाने हे अतिक्रमण बुधवारी हटवले आहे.


या किल्ल्यावर पत्राशेड टाकण्यात आले होते. हे किल्ल्याच्या वास्तूला बाधा पोहचवली जात होती. किल्ले संरक्षणासाठी काम करणाऱ्या काही संघटनांनी याविषयी तक्रार दिली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाने ही कारवाई केली आहे. कालच प्रतापगडावरच्या अफजल खानच्या कबरीजवळचे अतिक्रमणही हटवण्यात आले आहे.


किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान (चाकण, ता. खेड ) यांनी संग्राम दुर्ग किल्ला या स्मारकातील पश्चिम बाजूकडील दक्षिण कोपऱ्यातील एका मशिदीच्या समोर बांधलेले शौचालय व पत्रा शेड हे अनधिकृत असून ते काढण्याबाबतचे आदेश संबंधितांना द्यावे अशी मागणी पुरातत्त्व विभागाकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे पुणे विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी चाकण नगर परिषदेला पत्र देऊन सदरचे शौचालय व पत्रा शेड निष्कासित करण्याचे आदेश दिले होते.


पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने सदरचे मशिदीच्या समोरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. संबंधितांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांनी स्वतः हे अतिक्रमण काढून घेऊ असे लेखी पत्राद्वारे कळवले होते. मात्र त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे सहाय्यक संचालक पुणे यांनी चाकण नगरपरिषदेला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सदरची कार्यवाही करण्यात आली.


अतिक्रमण पाडण्याच्या कारवाई वेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी, चाकण पालिकेचे अधिकारी, चाकण पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी ठाण मांडून होता. दरम्यान या बाबत शाही मस्जिद किल्ला संस्थेचे विश्वस्त नसरुद्दिन इनामदार यांनी सांगितले कि, प्रशासनाने कुठलीही पूर्व सूचना न देता सदरची कारवाई केली आहे. तर किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. किरण झिंजुरके, राहुल वाडेकर यांनी सांगितले कि, मागील चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने नियमानुसार अतिक्रमण काढण्याची कारवाई केल्याचे सांगितले.

Comments

Sunny    November 11, 2022 11:27 AM

निलेश राणे साहेब, नितेश राणे साहेब आणि नारायण राणे साहेब: तुमच्या हयातीत अफझलखानाची कंबर कशी काय राहू शकते? मराठी रक्ताच्या आणि हिंदुत्वाच्या आपण फक्त गप्पच मारायच्या का?

Add Comment