Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखसंमेलनाध्यक्ष पदाच्या न घडलेल्या वादाची गोष्ट

संमेलनाध्यक्ष पदाच्या न घडलेल्या वादाची गोष्ट

साहित्य संमेलन म्हटलं की वाद… असे समीकरण गेल्या काही वर्षांत झाले होते. मात्र आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची सर्वानुमते निवड झाली, ती साहित्य क्षेत्राच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणावी लागेल. ९६वे साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वावलंबी विद्यालयाचे प्रांगण, वर्धा येथे होईल. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था असल्याने यंदा यजमान पदाचा मान विदर्भाकडे गेला आहे. या संमेलनात मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली असली तरी माध्यमातून एक वादाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न झाला. तो असा की, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या नावाचीही अध्यक्षपदासाठी चर्चा होती.

द्वादशीवारांच्या नावाला महामंडळाच्या इतर घटक संस्थांचेही समर्थन असल्याचे बोलले जात होते. विदर्भात संमेलन असल्याने विदर्भातील साहित्यिक हे अध्यक्षपदावर असायला हवे होते, असे बोलले जात होते. ‘द्वादशीवार अध्यक्ष नको म्हणून मंत्रालयातून फोन आला, अन् त्यांचे नाव मागे पडले,’ अशी चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेत किती तथ्य आहे, हे अधिकृत सांगू शकले नाही; परंतु न घडलेल्या वादाची गोष्ट माध्यमासमोर आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विदर्भ साहित्य संघाने सहमतीने चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगून या विषयावर पडदा टाकला. याआधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं आणि वाद यांचे नातं अतिशय घट्ट असे. अशी अनेक जुनी उदाहरणे समोर येतात. नाशिकमध्ये झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात अनेक वादांची चर्चा झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत हे साहित्य संमेलन होत असताना आयोजकांना त्यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा विसर पडल्याची टीका सावरकरवादी मंडळींनी केली होती. संमेलनात राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीवरून होणारे वाद नवे नाहीत. या संमेलनानिमित्ताने त्यावरही चर्चा झाली होती. तसेच यासोबतच या साहित्य संमेलनाचे जे गीत तयार करण्यात आले होते, त्या गीतातल्या दृश्यांवरून नव्या वादाला तोंड फुटले होते. गीतात चोरून इतर कलाकार आणि निर्मात्यांची व्हीडिओ क्लिप वापरणे हा कलाकारांचा अनादर असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त झाली आणि त्याचे पडसाद थेट साहित्य संमेलनाच्या फेसबुक पेजवर उमटले होते.

या संमेलनातील ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून दिलेलं निमंत्रणही वादाचा विषय ठरला. सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या पाटील यांची काही प्रकरणात चौकशी सुरू असल्याने त्यांना दिलेल्या निमंत्रणावर काहींनी आक्षेप घेतला. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात महाबळेश्वरचे ८२ वे साहित्य संमेलन वादामुळे प्रचंड गाजले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंद यादव होते. आनंद यादव यांनी त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत तुकारामांचे विपर्यास्त चित्रण केले असल्याचा वाद त्या काळात निर्माण झाला होता. यामुळे यादव यांनी संमेलनाआधीच राजीनामा दिला होता. अध्यक्षांविना पार पडलेले एकमेव संमेलन अशी या संमेलनाची नोंद झाली होती. यवतमाळला २०१९ मध्ये झालेले ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अलीकडच्या काळात वादांनी सर्वाधिक गाजलेले साहित्य संमेलन मानले जाते. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निमंत्रण ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना देण्यात आले होते. मात्र त्यांच्या भाषणातील मुद्द्यांवर वाद होऊ शकतो, असे म्हणत आयोजकांकडून त्यांचे निमंत्रण परत घेतले होते. त्यातून संमेलन बाजूला राहिले होते आणि वाद, टीका, आरोप-प्रत्यारोप, राजीनामानाट्य सुरू झाले होते. यातूनच अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांना राजीनामा द्यावा लागला होता.

ऐनवेळी संमेलनाचे उद्घाटन वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवेच्या हाताने करण्यात आले होते. असे अनेक साहित्य संमेलनातील किस्से सांगता येतील; परंतु साहित्य हा राजकारणाचा फड नसल्याने निवडणुका न घेता, सर्वसंमतीने संमेलनाध्यक्षांची निवड करण्याची चांगली प्रथा सध्या अवलंबिण्यात आली आहे. तरीही चपळगावकर यांच्या निवडीत वादाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला असला तरी, तो वाद नसल्याचे साहित्य वर्तुळात सांगण्यात आले आहे, ही चांगली बाब आहे. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती यांचे जतन होण्यासाठी एक चांगली परंपरा यापुढे जोपासली जावी. यंदाचे मराठी साहित्य संमेलन निर्विवाद पार पडेल, अशी तमाम मराठी जनांची आशा पूर्ण होवो, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -