Wednesday, May 7, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तमहत्वाची बातमी

हेडफोन, इअरफोनमुळे होतो कान आणि हृदयावरही परिणाम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या काळात हेडफोन्स आणि इअरफोन हे आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. काम, गाणी आणि प्रवासात ‘मल्टिमीडिया कंटेंट’ पाहण्यासाठीही हेडफोनचा वापर केला जातो. संगीत ऐकण्यासाठी काही वेळ हेडफोन वापरणे ठीक आहे; पण दीर्घकाळ वापरल्याने आपल्या कानांवर वाईट परिणाम होतो. तसाच तो हृदयावरही होतो, असे डॉक्टर सांगतात.


हेडफोन किंवा इअरफोनमधून येणारा आवाज कानाच्या पडद्याजवळ आदळतो. त्याच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याचे नुकसान होऊ शकते. गरजेपेक्षा जास्त वेळ हेडफोन किंवा इअरफोनचा वापर केल्यास आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. बराच काळ हेडफोन्स लावून गाणी ऐकल्यास कान सुन्न अथवा बधीर होऊ शकतात. यामुळे बहिरेपणाचाही धोका संभवतो. डॉक्टरांच्या मते, इअरफोनच्या अतिवापरामुळे कानात वेगवेगळे आवाज येणे, चक्कर येणे, झोप न येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात.


आपल्या कानांची श्रवण क्षमता केवळ ९० डेसिबल असते, जी हळूहळू ४०-५० डेसिबलपर्यंत कमी होत जाते. हेडफोन किंवा इअरफोन यांचा अतिवापर हा आपल्या कानांसाठी हानिकारक ठरतोच; पण हृदयावरही परिणाम करतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे कर्करोगाचाही धोका वाढतो. ऑफिसमध्ये किंवा घरी गाणी ऐकताना इअरफोन्स एकमेकांशी शेअर करणे टाळावे. इअरफोन शेअरिंग केल्याने कानात संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो. कानाला होणारा त्रास टाळायचा असेल, तर गरज असेल तेव्हाच इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करावा. दिवसभरात ६० मिनिटांपेक्षा अधिक काळ इअरफोनचा वापर करू नये. ते धोकादायक ठरू शकते, असे डॉक्टर सांगतात.

Comments
Add Comment