उपांत्य फेरीत भारतासमोर आज इंग्लंडचे आव्हान
अॅडलेड (वृत्तसंस्था) : दोन्ही आघाड्यांवरील धडाकेबाज कामगिरीने उपांत्य फेरीचे दरवाजे सहज खोलणाऱ्या भारतासमोर अंतिम फेरीत पोहोचण्याआधी इंग्लंडचे आव्हान आहे. उपांत्य फेरीचा हा सामना उद्या गुरुवारी अॅडलेडच्या मैदानात रंगेल. विजेता संघ टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल. त्यामुळे दोन्ही संघ जीव ओतून मैदानात उतरतील यात शंकाच नाही. भारताने हा सामना जिंकल्यास पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भारत-पाक ही हायव्होल्टेज लढत चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.
सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली ही जोडी भारतासाठी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ताकद आहे. त्यात लोकेश राहुलचा फॉर्म परतला आहे. पंत आणि कार्तिक या यष्टीरक्षकांना फलंदाजीत प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार रोहित शर्मालाही धावा जमवण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक यांना शेवटच्या दोन सामन्यात तरी फलंदाजीत कमाल करावी लागेल. अष्टपैलू हार्दिक पंड्या फलंदाजी किंवा गोलंदाजीत आपली छाप सोडत आहे. त्याचा रोलही संघासाठी कायम महत्त्वाचा राहिला आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास अर्शदीप सिंग, मोहम्मद शमीसह भुवनेश्वर कुमारनेही या स्पर्धेत चमकदार गोलंदाजी केली आहे. अर्शदीपची निर्णायक षटकांतील गोलंदाजी भारतासाठी विजय मिळवून देणारी ठरली आहे. भारताला खरी चिंता आहे ती सलामीची जोडी, फिरकीपटूंची कामगिरी, आणि क्षेत्ररक्षण याची. स्पर्धेत आतापर्यंत अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीला बळी मिळवण्यात आणि धावा रोखण्यात अपयश आलेले आहे. त्यामुळे कदाचित उपांत्य फेरीच्या सामन्यात युजवेंद्र चहलला संधी मिळू शकते.
इंग्लंडचा मार्क वुड हा या विश्वचषकातील इंग्लंडचा सर्वात धोकादायक गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ४ सामने खेळले असून ९ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडच्या फिरकीपटूंनीही शानदार गोलंदाजी केली आहे. हे फिरकीपटू टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतात. लियाम लिव्हिंगस्टोनने टीम इंडियाविरुद्ध ५ सामने खेळले आहेत आणि ६ पेक्षा कमी इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. मोईन अलीने टीम इंडियाविरुद्ध सुमारे १०च्या इकॉनॉमीने धावा दिल्या, परंतु तो देखील संघाला संकटात टाकू शकतो. इंग्लंड संघाची सर्वात मजबूत बाजू म्हणजे त्यांची फलंदाजी. संघाकडे नवव्या क्रमांकापर्यंतचे फलंदाज आहेत.