Wednesday, May 21, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

दिव्यांगांसाठी राज्यात स्वतंत्र मंत्रालय

दिव्यांगांसाठी राज्यात स्वतंत्र मंत्रालय

मुंबई (प्रतिनिधी): राज्यात आता दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.


दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावे म्हणून आमदार बच्चू कडू हे अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. अखेर त्यांच्या लढ्याला आज यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यासंदर्भात मान्यता दिल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. त्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाडू वाटून निर्णयाचे स्वागत केले.


राज्य सरकारच्या या निर्णयावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, "या संबंधित बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. दिव्यांगांच्या हक्कांसाठी आम्ही गेली २५ ते २६ वर्षे लढा देत आहोत. त्याला आता यश आले आहे. जागतिक अपंग दिनादिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार आहे.


त्यामाध्यमातून दिव्यांगांसाठी स्वाधार योजना, गाडगेबाबा घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मुकबधिरांसाठी खासगी क्षेत्रात काम मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शासन येत्या १५ दिवसांत हे मंत्रालय स्थापन करणार असून दिव्यांग मंत्रालय हा देशपातळीवरील मोठा निर्णय आहे.

Comments
Add Comment