पुन्हा राजकीय उलथापालथ होणार?
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदारच नव्हे, तर खासदार आणि अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री-बेरात्री येऊन भेटतात, असा दावा शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. यामुळे जाधव यांच्या या दाव्याने खळबळ उडाली असून पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार, खासदार रात्री गुपचूप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. सह्याद्रीवर जाऊनही एकांतामध्ये त्यांच्या भेटी घेतात. मी स्वतः त्या ठिकाणी हे अनुभवलेले आहे. ही गोष्ट खरी आहे. आमदार-खासदार मुख्यमंत्र्यांना भेटतातच, असा दावा त्यांनी केला.
खासदार जाधव यांनी यापू्र्वीही असाच एक गौप्यस्फोट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. अनिल देशमुख आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत.
दरम्यान आता ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार नाराज असून ते कधीही शिंदे गटात किंवा भाजपमध्ये जातील असे अनेक नेते म्हणतात. त्यामुळे ठाकरे गट पून्हा फूटणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
प्रतापराव जाधवांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. पुढे ते म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नव्हे तर भाजपच्या मंत्र्यांनाही रात्री बेरात्री भेटत असतात. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.