Wednesday, March 19, 2025
Homeमहत्वाची बातमीविचारांचे बाळकडू मागे राहिले...

विचारांचे बाळकडू मागे राहिले…

आज बहुसंख्य परदेशस्थ मुलांना आई-वडील आपल्याजवळ राहायला हवे आहेत; त्यांना भारतात येणं शक्य नाही. अनेक पालकांनी आपल्या मुलांना भावनात्मक, संवेदनात्मक जगाची ओळख करून दिलेली नाही. त्यांनी मुलांना क्लासेस लावले, वाढदिवस नव्हे, तर ‘बर्थ डे सेलिब्रेट’ केले. त्यांच्यात मॉलसंस्कृती रुजवली. पण भावनांचं, अश्रूंचं, झुरण्याचं, तगमगीचं, लग्न हा संस्कार आहे; करार नाही या विचारांचं बाळकडू देण्यात ते कमी पडले.

पुढे जाण्याची आस, इच्छा बाळगणं आणि त्याचवेळी मागे वळून पाहणं ही उच्च मधमवर्गीय मानसिकता आहे. कारण सामान्य मध्यमवर्ग त्याच्या धावपळीच्या जीवनमानामध्ये, जगण्याच्या क्लिष्टतेमध्ये गुंतला आहे. नव्या-जुन्याचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. अजूनही तो सकाळी नऊ ते रात्री नऊच्या पोटार्थी चक्रातच गुंतला आहे. दुसरीकडे अगदी गरीब वर्गापर्यंत ही वैचारिकताच पोहोचलेली नाही. या विचारांपर्यंत येण्यास पुढची काही वर्षं जावी लागतील. त्यामुळेच आपण पुढे वाटचाल करतोय की भूतकाळात गुंततोय, या मुद्द्याचा विचार करताना उच्च मध्यमवर्गच गृहीत धरू शकतो. साहजिकच सगळी मांडणी त्या आनुषंगानेच होते. आज उच्च मध्यमवर्गात मोडतात ते कधी काळी मध्यमवर्गीय होते. त्यातल्या बहुतेकांचं बालपण संघर्षात गेलं आहे. अनेकांना अनेक प्रकारची तडजोड करत मार्ग काढावा लागला आहे. या मातीत राहिल्यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागला ही त्यातल्या अनेकांची मानसिकता आहे. हा चाळीत राहणारा, आई-वडिलांची कर्ज फेडणारा वर्ग आहे, बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडणारा आहे, काही वर्षांनी तो स्थिर झाला आणि त्यांना मुलं झाली तेव्हा मी सोसलं ते मुलांना सोसावं लागू नये, अशी त्याची स्वाभाविक भावना होती. म्हणूनच पाकात गुलाबजाम ठेवावा त्या पद्धतीने त्यांनी आपल्या मुलांना या सगळ्यांपासून दूर ठेवलं. त्यांच्या नावे विमा पॉलिसी, बचत ठेवी, उच्च शिक्षणाच्या खर्चाची तरतूद आदी करून ठेवण्यास प्राधान्य दिलं. या वर्गाने आपल्या मुलांना कटाक्षाने इंग्रजी माध्यमात शिकवलं. आपली परदेशी जाण्याची स्वप्नं त्यांच्या रूपाने पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या वर्गानं अशी सगळी पूर्वतयारी केली आणि मुलांना परदेशी पाठवलं. तिथे उच्च शिक्षण घेतलेली मुलं आता तिथेच स्थिरावली असून नोकरीधंदा, व्यवसायात व्यग्र आहेत.

परदेशात शिकलेल्या, तिथेच स्थायिक झालेल्या अनेक मुलांचे पालक आता सत्तरीपार पोहोचले आहेत. त्यांना परदेशात मुलांसवे नव्हे तर आपल्या देशात राहावंसं वाटतं. पण आता ते आपल्या देशाचा गोडवा गात असतील, मुलांकडे न राहता आपला वृद्धापकाळ भारतात घालवू इच्छित असतील, तर त्यात उदात्त विचार वा देशाप्रती प्रेमभावना असेलच असं म्हणता येणार नाही. मुलं परदेशी गेली तेव्हा त्यांना वार्धक्य आलेलं नव्हतं. पण आता या वयात त्यांना पुढे गेलेल्या मुलांनी आपल्यासाठी परत यावं, असं वाटत आहे. परदेशी वातावरणात ही जुनी खोडं रुजत नाहीत. ते वातावरण त्यांना परिचित नाही. कदाचित काहीजणांना परालंबित्व नकोसं वाटू शकतं. काहींना मुला-मुलींचे पाश्चात्य विचार, ते राहणीमान अथवा ती जीवनशैली रुचत नसावी. आता मुलांच्या आयुष्यात आपलं स्थान नसलेलं बघून काहींचा अहंभाव दुखावतो आणि ते मायदेशीच राहणं पसंत करतात.

अलीकडेच मला एका स्त्रीच्या अंत्यविधीला उपस्थित राहावं लागलं. ती महिला एकटीच राहायची. तिच्या निधनाची वार्ता समजल्यावर मुलांनी परदेशातून फोन केला आणि अत्यंविधीची भाडोत्री सोय करणाऱ्या एका संस्थेकडे पुढची सगळी जबाबदारी सोपवली. ती मंडळी सगळं काम व्यावहारिक पद्धतीने करत होती. त्यांनीच हार विकत आणले, मडकं धरणारा माणूसही त्याच संस्थेचा होता. त्या महिलेची मुलं व्हीडिओवर हे सगळं पाहत होती आणि इकडे मी अत्यंत अलिप्तपणे हे सगळं अनुभवत होतो. तेव्हा विचार आला की, मरतेवेळी त्या महिलेच्या मनात किती आणि कोणत्या विचारांचं काहूर माजलं असेल. आपण मुलांना परदेशी जाण्यापासून अडवलं असतं, मुला-सुनांशी जुळवून घेतलं असतं, नातवडांमध्ये रमलो असतो, त्यांची जीवनशैली आत्मसात केली असती तर कदाचित आज घरातलं कोणी तरी आपल्याला पाणी पाजायला असू शकलं असतं.

थोडक्यात, ती बाई अट्टहासानं मागे राहिली, आपल्याच अटी-शर्तींवर जगली तरी तिला अखेर काय मिळालं, हा प्रश्न उरतोच. कारण मध्यमवयातला एकटेपणा सहन करण्याजोगा असतो. त्यावेळी पैशांची ऊब असते. प्रौढपणात तारुण्याची मग्रुरी असते. अशा वेळी तिचा हात धरण्यासाठी कोणी हात पुढे केला तरी ती तो हात झटकते. तिला कोणाचाही आधार नको वाटतो. पण सासूने पन्नास वेळा सुनेचा हात झटकला तर गरज भासेल तेव्हा ती का हात धरेल, हा प्रश्न उरतो. थोडक्यात, उच्च मध्यमवर्गामधली वृद्ध पिढी आज गरजेपोटी मागे जाऊ इच्छित आहे. त्यांनी मुलांना परदेशी पाठवलं. पण हे करतानाच मुलांना मातीची ओढ लावली असती, मुळं धरून ठेवण्याची शिकवण दिली असती तर इतकी विदारक स्थिती उद्भवली नसती. कारण ही शिकवण, हे संस्कार कितीही योजणे पुढे गेलेल्या नव्या पिढीलाही मागे आणू शकतात.

आणखी एका उदाहरण. ऐंशी वर्षं पार केलेल्या एक आजी ओळखीच्या आहेत. त्यांचा गतिमंद मुलगा मरण पावला, तर मुलगी परदेशात स्थायिक आहे. जावई उत्तम आहेत, नातवंडं संस्कारक्षम वयात आहेत. या आजीबाईंना मुलीकडे राहायला जाण्यात काहीही रस नाही. ती मुलगी परदेशातून मला फोन करते आणि आईला तिकडे येण्यासाठी तयार करावं, अशी विनंती करते. मी तिला कायम सांभाळण्यास तयार आहे, असं सांगून ती या वयात आईला एकटं राहावं लागत असल्याबद्दल दु:ख आणि काळजी व्यक्त करते. पण त्या हट्टी आजीबाई माझ्याही विनंतीला भीक घालत नाहीत. दुसरीकडे परदेशातली नोकरी, मुलांची शिक्षणं सोडून भारतात येऊ शकत नसल्यामुळे मुलीची घुसमट होत राहते. आईवरची अपार माया तिला स्वस्थ बसू देत नाही. थोडक्यात, ती इकडे येऊ शकत नाही आणि आई ठरवून तिकडे जात नाही. मग हे पाहून विचार येतो की हे पुढे मागे राहणं, पुढे जाणाऱ्यांच्या पायात खोडा घालणं, त्यांना भावनिक गुंत्यात अडकवणं नेमकं काय आहे? खरं तर त्या आजीबाई मुलीकडे राहायला गेल्या, नातवंडांवर संस्कार केले, त्यांना संस्कृत शिकवलं, श्लोक-कहाण्यांची जाण दिली, तर नव्या-जुन्याचा संगम साधणं सहजशक्य होतं. पण आईच्या हट्टी स्वभावापुढे तिने हात टेकले. थोडक्यात, सध्या आपल्याला हवं तेव्हा पुढे जायचं आणि हवं तेव्हा मागे वळायचं, असं अनेकांचं धोरण दिसून येतं. अशाच मानसिक आंदोलनात जगणारी पिढी आहे असं वाटतं.

-प्रा. प्रवीण दवणे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -