नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दारूचे सेवन करण्यात देशाची राजधानी दिल्ली सर्वात पुढे आहे. दिवाळीपूर्वी तीन दिवसांत दिल्लीत १०० कोटींची दारू विकली गेली. आताही एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे ज्यामध्ये दिल्लीतील महिलाही दारू पिण्यात पुढे असल्याचे दिसून आले याहे. एकावर एक मोफत मिळणारी दारू हे यामागील कारण असल्याचे समोर आले आहे. अनेक रेस्टॉरंट्स, बार मध्ये ड्रिंक्सवर ऑफर दिली जाते. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी महिलाही काही मागे नाहीत हे सर्वेक्षणातून दिसते.
वेगवेगळ्या वयोगटानुसार ५ हजार महिला या सर्वेक्षणात सहभागी झाल्या होत्या. १८ ते ३० वयोगतातील १४५३ महिलांनी दारूचे सेवन केले. ३१ ते ४५ वयोगटातील २०२१, ४६ ते ६० वयोगटातील १२०६ आणि ६०वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ३२ महिलांनी दारू प्यायल्याचे निदर्शनास आले.
ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान हे सर्वेक्षण केले गेले. या ५ हजार महिलांमध्ये ८९ टक्के म्हणजे ४४८० महिला स्वत: कमावतात. विशेष म्हणजे यापैकी ३७ टक्के महिलांनी हे मान्य केले की त्यांची दारू पिण्याची सवय वाढली आहे. या महिलांमध्ये एक गट असा होता ज्यांचा पगार चांगला आहे, अनेकांची मुले लहान आहेत. तर काही महिला या नैराश्यामुळेही दारू पिताना दिसल्या.
३४ टक्के महिला सांगतात की, कोरोनानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी दारूची मदत घेतली. कंटाळा आला म्हणून दारू घेतली अशीही काही महिलांची कारणे आहेत. अनेक महिलांनी हे मान्य केले की समाजात आपण मागे राहू नये म्हणून दारू प्यायला सुरुवात केली. दिल्लीमध्ये ६२ टक्के महिलांचा दारूवरील खर्च वाढला आहे. वाईनच्या विक्रीत ८७ टक्के, व्हिस्की मध्ये ५९.५ टक्के आणि बीयर च्या विक्रीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे