राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यांना संस्थापिका, समितीच्या प्रथम प्रमुख संचालिका लक्ष्मीबाई केळकर तसेच समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका ताई आपटे या अतिशय वंदनीय आणि पूज्य आहेत. त्या दोघींनीही आपापल्या परीने महिलांचे समाजातले प्रश्न पाहून १९३५ च्या सुमाराला जमेल तसं कार्य सुरू केलं होतं. मावशी केळकर यांनी विदर्भात तर ताई आपटे पुण्यात कार्यरत होत्या. १९७८ च्या नोव्हेंबरमध्ये मावशी केळकरांनी समितीच्या प्रमुख संचालिका पदाचे दायित्व ताईकडे सोपवून या जगाचा निरोप घेतला. ताई आपटेंच्या वयाच्या ६८ व्या वर्षी प्रमुख संचालिका हे दायित्व त्यांच्याकडे आले. पुढे १६ वर्षे त्यांचा सतत प्रवास, कार्यक्रम अशीच दिनचर्या झाली होती. त्यांनी वयाच्या ८३ चा उंबरठा ओलांडला होता, विसावा घ्यावा असं मन म्हणत होतं. शरीरानेही साथ देण्याचे नाकारले होतं आणि ९ मार्चला ताई आपटे अनंतात विलीन झाल्या; परंतु कार्य आणि वैयक्तिक संबंधामुळे अनेकांच्या मनात स्मृती रूपानं कायम होत्या.
प. पू. डॉ. हेडगेवारांच्या संपर्कामुळे ताईंचे पती विनायकराव आपटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी जोडले गेले होते. त्यामुळे घरातच संघाचं कार्य त्या पाहत असतं. अर्थात माहेरी कोकणात, घरात तसंच वातावरण त्यांनी पाहिलं होतं. असं सांगतात की एकदा लोकमान्य टिळकांच्या सभेला गेली असताना त्यांच्या भाषणात ताई आपटे नि ‘स्वयंसेवक’ हा शब्द ऐकला. रात्री घरी आल्यावर त्यांनी वडिलांना विचारले की, ‘स्वयंसेवक’ म्हणजे हो काय नाना? ‘आपल्या देशाची सेवा करण्याकरिता जी व्यक्ती स्वतः होऊन पुढे सरसावते ना त्या व्यक्तीला म्हणतात ‘स्वयंसेवक.’ हे उत्तर ऐकून त्याचे मन त्या शब्दाभोवती घोटाळत राहिले आणि तो शब्द पुढे त्यांच्या जीवनाचा एक अभिन्न अंग बनला.
स्त्रियांना सामर्थ्यशाली, आत्मनिर्भर, सन्मान मिळवून देणारी महिलांची एखादी संघटना कोणीतरी बांधावी हा विचार ताईना लग्न झाल्यावर पुण्यात आल्यावर स्वस्थ बसू देत नव्हता. कुणीतरी कशाला मीच करायला हवे? असा विचार मनात घेऊन विनायकरावांच्या सहकार्याने महिला संघटनेच्या कार्याची त्यांनी सुरुवात केली पुण्यात! त्याच दरम्यान विदर्भातील वर्धा येथे वंदनीय मावशी केळकर यांनी प. पु. डॉ. हेडगेवारांशी चर्चा करून १९३६ साली महिलांसाठी ‘राष्ट्र सेविका समिती’ची स्थापना करून कार्याला प्रारंभ केला होता. १९३८ च्या मे महिन्यात वं. मावशी केळकर यांचे पुण्यात ताईंच्या घरी आगमन झाले. जणू ‘पुण्यात सरस्वतीकडे वर्ध्याची लक्ष्मी’ आली होती. दोन राष्ट्रहितासाठी समर्पित महिलांची भेट झाली. पहिल्याच भेटीत औपचारिकता गळून पडली आणि पुण्यातील महिला संघटन ‘राष्ट्र सेविका समितीत’ विलीन झाले. कालांतराने संपूर्ण देशच नव्हे तर समुद्रापार समितीच कार्य वाढले. ताई आपटे सतत प्रवास करीत. देशात वेळोवेळी येणाऱ्या आपदामध्ये समाज हिताची कार्य व्यवस्था त्या स्वतः बघत असत. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे याच वंदनीय ताई आपटे यांच्या स्मृती जागत्या राहाव्या आणि त्यांना अपेक्षित असलेलं काम पुढे सुरू ठेवावं या उद्देशाने पुण्यातील सुप्रसिद्ध खडीवाले वैद्य यांनी तळेगाव येथे एक जागा घेऊन त्याला वंदनीय ताई आपटे यांचं नाव दिलं. तेच हे वं. ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान.
‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ या समर्थांच्या वचनाप्रमाणे ताईची स्मृती जागती राहावी म्हणून ॲड. माधवराव पटवर्धन, ज्योत्स्नाताई व शरदराव भिडे, शैलाताई जोशी, उज्ज्वलाताई दातार, दादा खडीवाले, यशगौरी व अनंतराव गोखले यांनी वं. ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठानची स्थापना केली आणि दादा खडीवाले(वैद्य) यांनी तळेगाव दाभाडे येथे एक भवन उभारून दिलं. त्याचा १९९६ साली शुभारंभ ‘भारतरत्न श्रद्धेय नानाजी देशमुख’ आणि राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या हस्ते झाला. प्रारंभी काही वर्षे कुंटे दाम्पत्याने निरलस भावनेनं कार्यभार सांभाळला. या ठिकाणी निराधार, निराश्रित महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालवाडी, विद्यार्थिनींसाठी वसतिगृह, मेहंदी कला वर्ग, कीर्तन प्रशिक्षण वर्ग, योगासन वर्ग, भरतनाट्यमचे प्रशिक्षण वर्ग, संघटनेसाठी उपयुक्त प्रशिक्षण असे अनेक उपक्रम सुरू झाले. तळेगाव जवळपासच्या विविध गावांमध्ये जाऊन आरोग्य शिबिरं घेतली. लहान वयात मुलांना संस्कारक्षम शिक्षण द्यायचं असेल तर बालवाडीच्या शिक्षिका चांगल्या प्रशिक्षित असणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन या महिलांसाठी काही वर्षं बालवाडी प्रशिक्षण वर्ग ही आयोजित करण्यात आले होते. वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे संस्थेमध्ये कीर्तन प्रशिक्षण आणि कीर्तन करणे हे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झाले. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी संपूर्ण चातुर्मासात दर एकादशीला संस्थेमध्ये कीर्तन चालतात, त्यानिमित्ताने महिला एकत्र येतात. स्नेहलता साठे या सेविकेनी पुण्याला जाऊन कीर्तनाचा प्रशिक्षण घेतलं व आता त्या कीर्तनाचे वर्ग चालवत आहेत. दास नवमी, नऊ दिवस नवरात्रीत कीर्तनाचे कार्यक्रम चालतात. कीर्तनाची सेविकांना इतकी आवड निर्माण झाली आहे की, कीर्तनाची आवड असलेल्या सेविका आता इतक्या पारंगत झाल्या आहेत की, त्यापैकी एक डॉक्टर मीनल जोशी-कुलकर्णीला वाखाणावं लागेल. तुझा आवाज, समज, अभ्यास चांगला आहे, असं कीर्तन शिकवणाऱ्या कुंटे आजींनी सांगितलं आणि तिने सलग तेरा वर्षं कीर्तन केले. तेरा वर्षांनी सलग तेरा दिवस दररोज कीर्तन करून तिने समारोपही केला आहे. शकुंतला कुंटे, अनुराधा तापीकर, संध्या नाखरे, सुनंदा जोशी, ऊर्मिला महाजन, उषा ढवळे अशा अनेक समितीच्या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या उपक्रमात वेळोवेळी मोलाची कामगिरी बजावली आहे.
२०२०-२०२१ या कोरोना काळात हे सर्व उपक्रम मात्र बंद ठेवावे लागले होते. आता पुनश्च: नव्या कार्याला प्रारंभ झाला आहे. कोरोनानंतर नवी कार्यकारी समिती झाली आहे. सर्व प्रकल्प सुरू होत आहेत. संस्थेत गृह उद्योगही चालतात. यात समितीची हळद, तिखट विक्रीला ठेवली जाते. तसेच दळण चक्की घेतली आहे, त्यातून वेगवेगळी पिठं दळून दिली जातात. दळलेली पिठं विक्रीलाही ठेवली जातात. बाळंत विडाची विक्री केली जाते. त्याशिवाय वर्षातून दोनदा संस्थेमध्ये प्रदर्शन व विक्री आयोजित केली जाते. यामध्ये आजूबाजूला राहणाऱ्या गृहउद्योग करणाऱ्या महिलांना स्टॉल्स विनामूल्य दिले जातात आणि या महिला आपापल्या उत्पादनांची विक्री येथे करतात. या प्रदर्शन व विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो. याशिवाय राष्ट्रसेविका समितीची शाखा भरते. त्या निमित्ताने दर मंगळवारी समितीच्या कार्यकर्त्या एकत्र येतात. समितीच्या विविध प्रांत बैठका, जिल्हा बैठका, प्रारंभिक शिबीर आयोजित होतात.
लहान मुलांसाठी छंद कला वर्ग अर्थात ‘बालजगत’ यामध्ये हस्तकला, चित्रकला, संगीत. सुंदर हस्ताक्षर, ज्युडो-कराटे, बुद्धिबळ अशा विविध कलांचे प्रशिक्षण, ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी व्यक्तिमत्व विकास वर्ग, शिशुवाटिका अर्थात मराठी माध्यमाची बालवाडी, महिलांसाठी विविध कला आणि उद्योग प्रशिक्षण शिवणकाम, विणकाम, भरतकाम, क्रोशिया, पेन्टींगचे विविध प्रकार, मेंदीकला, महिला व बालकांसाठी आरोग्य शिबीर तसेच समुपदेशन केंद्र, कुमार वयातील मुला मुलींसाठी समुपदेशन,१ ते ७ वर्षे वयापर्यंत मुलांसाठी पाळणाघर, बचत गटांसाठी आठवडी बाजार, तळेगावातील सेवा वस्त्यांमध्ये महिलांसाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रकल्प आखणे या सर्व संस्थेन डोळ्यासमोर ठेवलेल्या आगामी योजना आहेत. कोरोना काळानंतर संस्थेचं काम पुन्हा एकदा वेगाने सुरू झालं आहे.
अशा अनेक प्रकारच्या उपक्रमातून समाजाला स्वावलंबनातून समृद्धीकडे व आत्मसन्मानाकडून सामाजिक जाणीव, कुटुंबात राष्ट्रभाव, समाजभाव, समरसता, एकता या विषयीचे विचार देऊन कुटुंब समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न आणि भारतीय परंपरा व इतिहासाशी नाळ जोडणे, अशी कामे वं. ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान करीत आहे. आणि…
‘हम अपने लिये नही, अपनों के लिए है
अपने वो है, जो पीडित और उपेक्षित है’
या संस्थेच्या संकल्पानुसार मार्गक्रमण करत आहे.
-शिबानी जोशी
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…
दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…