
पणजी (वृत्तसंस्था) : गोवा हे देशातल्या सर्वोत्तम पर्यटनस्थळांपैकी एक आहे. इथे अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जी पाहण्यासाठी देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही लोक येतात. गोवा संपूर्ण देशात सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
मात्र आजकाल गोव्याची चर्चा आणखी एका कारणाने होत आहे. आणि ती म्हणजे मद्यचहा. मसाला चहा, बारबेक्यू चहा आणि अनेक प्रकारच्या चहाबद्दल आपण ऐकले असेल किंवा प्यायला असेल; पण ‘मद्यचहा’ कधी अनुभवलेला नाही. आजकाल गोव्यात असा चहा मिळत आहे. त्याला ‘ओल्ड मंक टी’ म्हटले जात आहे.
गोव्यातल्या सिंक्वेरिम बीचवर चहा आणि ओल्ड मंक रमचे विचित्र मिश्रण विकले जात आहे. त्याचा व्हीडिओही ‘सोशल मीडिया’वर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस गरम चुलीतून चिमट्याने एक लहान भांडे बाहेर काढतो आणि त्यात काही तरी ठेवतो. लगेच भांड्यात आग लावतो. यानंतर, तो भांड्यात थोडी रम ओततो. त्यामुळे आग आणखी वाढते. मग तो जळत्या भांड्यात चहा ओततो. त्यामुळे आग विझते. चहा आणि रम दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होतात. मग ती व्यक्ती आरामात ‘ओल्ड मंक टी’ सर्व्ह करते.