सीएआयटी रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीचे सर्वेक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. कारण १४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरपर्यंतचा काळ हा लग्नाचा सीझन आहे. नुकत्याच सीएआयटी रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, या कालावधीत देशभरात सुमारे ३२ लाख विवाह होतील. ज्यामध्ये साधारण ३.७५ लाख कोटींची आर्थिक उलाढाल होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
सीएआयटीने सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, या हंगामात सुमारे ५ लाख विवाहांसाठी प्रत्येकी अंदाजे ३ लाख रुपये खर्च येईल. तर, सुमारे १० लाख विवाहांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये खर्च येईल. १० लाख लग्नांसाठी १० लाख रुपये, ५ लाख लग्नांसाठी २५ लाख रुपये, ५० हजार लग्नांसाठी ५० लाख रुपये आणि आणखी ५० हजार लग्नांसाठी १ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम खर्च करण्यात येईल. या एका महिन्यात लग्नाच्या खरेदीतून सुमारे ३.७५ लाख कोटी रुपये व्यापार क्षेत्रात येणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर, लग्नाच्या हंगामाचा पुढचा टप्पा १४ जानेवारी २०२३ पासून सुरू होऊन तो जुलैपर्यंत असेल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सीएआयटीने सांगितले की, फक्त दिल्लीत या आगामी हंगामात ३.५ लाखांहून अधिक विवाहसोहळे अपेक्षित आहेत. या विवाहातून सुमारे ७५,००० कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे २५ लाख विवाह झाले होते आणि त्यासाठी ३ लाख कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
सीएआयटीने म्हटले आहे की, लग्नाच्या हंगामातील चांगल्या व्यवसायाची शक्यता लक्षात घेऊन, देशभरातील व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. तसेच, ग्राहकांची मागणी लक्षात घेता व्यापारीदेखील आपल्या व्यवहारातील प्रत्येक वस्तूंकडे प्रकर्षाने लक्ष देत आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक लग्नाचा सुमारे २० टक्के खर्च वधू-वरांवर जातो. तर, ८० टक्के खर्च लग्नाच्या इतर आयोजनात जातो.
सीएआयटीने सांगितले की, लग्नाच्या हंगामाआधीच घरांच्या दुरुस्तीवर, सजावटीवर मोठा खर्च करण्यात आला आहे. याशिवाय दागिने, साड्या, लेहेंगा, फर्निचर, रेडिमेड कपडे, बूट, लग्न आणि लग्नपत्रिका, ड्रायफ्रूट्स, मिठाई, फळे, पूजा साहित्य, किराणा सामान, अन्नधान्य, सजावटीचे साहित्य, घर सजावटीचे साहित्य, इलेक्ट्रिक युटिलिटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि भेटवस्तू यांसारख्या वस्तूंना मागणी असते. तसेच दोन वर्षे कोरोना काळानंतर यावर्षी चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बँक्वेट हॉल, हॉटेल्स, खुली लॉन, कम्युनिटी सेंटर्स, सार्वजनिक उद्याने, फार्म हाऊस आणि इतर अनेक प्रकारची ठिकाणे देशभरातील विवाहसोहळ्यांसाठी सज्ज आहेत.