Tuesday, February 17, 2026

गरीबांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा - फडणवीस

गरीबांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा - फडणवीस

मुंबई : सुप्रीम कोर्टाने आर्थिक मागासांच्या आरक्षणाला (ईडब्ल्यूएस) वैध ठरवले आहे. याचे मी स्वागत करतो, कोर्टाचा हा निर्णय माईलस्टोन आहे. या संदर्भात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून आरक्षण दिल्याचा मुख्य मुद्दा होता त्याला आता सुप्रीम कोर्टाने वैध ठरवले आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाचे आभार. आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मराठा आणि अल्पसंख्याक समाजातील गरीबांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले, एकीकडे जातीय आधारावरील आरक्षण कायम आहे पण ज्या घटकांना आरक्षण मिळत नव्हते, ज्यांची स्थिती आर्थिकदृष्ट्या कुमकुवत आहे, त्यांना हे आरक्षण मिळायला लागले आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजातील गरीबांना, अल्पसंख्यांकातील गरिबांना हे आरक्षण लागू राहणार आहे. याद्वारे सुप्रीम कोर्टाने त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.

दरम्यान, आर्थिक निकषांवरील १० टक्के आरक्षणाची वैधता सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याने त्यावर काँग्रेस नेते उदीत राज यांनी प्रतिक्रिया देताना सुप्रीम कोर्टही जातीयवादी असल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, उदीत राज यांच्या विधानावर काँग्रेसची ही अधिकृत भूमिका आहे का? हे आधी स्पष्ट करावे मग आम्ही बोलू, असे पत्रकारांना सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >