खेड (प्रतिनिधी) : कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या खेड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील सर्वात मोठा घाट ठरलेल्या कशेडी घाटातील बोगद्यांचे काम पूर्णत्वास जात आहे. बोगद्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून, केवळ काँक्रिट रस्त्याचे काम बाकी आहे. एकूण ९ किलोमीटरच्या लांबीत २ किलोमीटरचे समांतर दोन बोगदे आहेत. सध्या या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्णत्वास गेले असून मार्च अखेरपर्यंत एक बोगदा वाहतुकीस सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात ‘ब्लॅक स्पॉट’ ठरलेल्या वळणावर वर्षातून सात ते आठ अपघात होतात.
पावसाळ्यात दरडी कोसळून महामार्ग बंद राहतो. घाटाच्या चढ आणि उतारात कार चालकांचा तासाभराचा कालावधी जातो. यावर उपाय म्हणून कशेडीत बोगदा करण्याचे ठरले. त्यानुसार ऑक्टोबर २०१९ मध्ये बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना परिस्थितीमुळे मनुष्यबळ न मिळाल्याने कामाला गती मिळाली नाही.दरम्यान कशेडी बोगद्याचे आतील बहुतांशी काम झाले असून केवळ रस्त्याचे काम बाकी आहे. त्यामुळे मार्च अखेरीस कशेडीतील एक बोगदा खुला करण्यावर भर देण्यात आले आहे. पुढील चार महिन्यात उर्वरित काम पूर्ण करून वाहतुकीस खुला केला जाणार आहे.
मलेशियन तंत्रज्ञानाने २ पूल कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या जोड रस्त्यांमध्ये दोन पूल हे मलेशियन तंत्रज्ञानाने उभारले जात आहेत. या पुलाच्या गर्डरसाठी यु. एच. पी. एफ. आर. सी. हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे गर्डर तयार करून ते पिलरवर बसविले जाणार आहेत. हे दोन्ही पूल अवघ्या एक महिन्यात तयार होऊ शकतात. मलेशिया येथील तंत्रज्ञान पुणे येथे एका पुलासाठी वापरण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी पुढाकार घेतला. आता चौपदरीकरणाच्या कामात दोन पूल मलेशियन तंत्रज्ञानाने उभारले जाणार आहेत.
बोगद्याचे दोन्ही बाजूने पूर्ण झाले असून केवळ अंतर्गत काही कामे शिल्लक आहेत तर बोगद्याला जोड रस्ते आणि अंतर्गत रस्ते झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. दोन्ही बोगदे मनुष्यबळाचा वापर न करता बूमर मशिनने खोदण्यात आले आहेत. बोगद्याच्या अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित कामे मार्गी लागणार आहेत.