बिजींग (वृत्तसंस्था) : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चीनला व्यावसायिक फटका बसत आहे. अनेक शहरांमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ॲपल कंपनीच्या प्रोडक्शनवर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे चीनमधील ॲपल कंपनीचा सर्वात मोठ्या कारखान्यात नवीन उत्पादने बनवण्यावर तात्पुरती मर्यादा घातली आहे. त्यामुळे आयफोन तयार करण्यावर याचा परिणाम झाला आहे. आयफोन प्रोडक्शन थांबल्यामुळे कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
चीनमध्ये नव्याने लागू झालेल्या कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. आयफोन बनवणारी कंपनी ॲपलही या टाळेबंदीच्या कचाट्यात सापडली आहे. रविवारी जारी केलेल्या निवेदनात ॲपल कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी चीनमधील त्यांच्या असेंब्ली प्लांटमध्ये आयफोन १४ चे उत्पादन तात्पुरते कमी केले आहे. यामुळे ग्राहकांना नवीन आयफोनची वाट पाहावी लागणार आहे. याचा परिणाम नाताळपूर्वीच्या आयफोन शिपमेंटवर होऊ शकतो. या निर्णयाचा ॲपलच्या तिमाही विक्रीवर देखील लक्षणीय परिणाम होणार असून ग्राहकांच्या ॲपलच्या हाय-एंड मॉडेल्सच्या वापरावरही ब्रेक बसेल.
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहता सरकारने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. चीनमध्ये ॲपलची सर्वात मोठी मॅन्यूफॅक्चरिंग युनिट म्हणजे सर्वात मोठा कारखाना आहे. चीनने झेंग्झू येथील जगातील सर्वात मोठ्या आयफोन प्लांटमध्ये हजारो कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी कंपनीने नियमांमध्ये बदल केला असून येथील प्रोडक्शनही कमी केले आहे. त्यामुळे आता फॉक्सकॉन प्लांटमधील आयफोन तयार करण्यावर तात्पुरते निर्बंध घालत प्रोडक्शनचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. यामुळे आयफोनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चीनमधील ॲपलच्या याच फॅक्ट्रीमधील कामगारांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये ॲपल फॅक्टरीतील फॉक्सकॉनचे कर्मचारी चक्क पळ काढताना दिसत होते.