नवी मुंबई (प्रतिनिधी) : घणसोली गावाच्या असणाऱ्या झाडीवर वन विभागाचे लक्ष नसल्याने वनराईला विविध आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे ही वनराई पालिकेकडे हस्तांतरित केली तसेच तिचा विकास निसर्ग उद्यानासारखा केला, तर ती वनराई पुन्हा प्रथम अवस्थेकडे येऊ शकते. तसेच यामुळे पर्यावरणातील नैसर्गिक संतुलन राखू शकते. त्यामुळे पालिकेने ही वनराई आपल्याकडे विकासासाठी ताब्यात घ्यावी. अर्थात वनराई मागील उद्देश हा निसर्गाचा उद्धार व्हावा हा आहे. तोच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून त्यासाठी पालिकेने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घणसोली गावात ठाणे बेलापूर महामार्गा करून येतानाच बंद अवस्थेत असलेल्या सदगुरू रुग्णालयाच्या पाठीमागील व उजव्या बाजूला वनराईचे दर्शन घडते. या ठिकाणी विविध प्रकारची जुनाट वृक्षवल्ली पाहण्यास मिळत आहे. तसेच नवीन देखील वृक्षांची वाढ होताना दिसते; परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची देखभाल होत नाही. पावसाळ्यात व वादळात या वनराईमधील वृक्ष उन्मळून पाडतात. तसेच काही नागरिक वृक्ष तोडतात व जाळण्यासाठी वापर करत आहेत. तसेच या ठिकाणी डेब्रिज माफिया देखील राडारोडा डंपर भरून उलटे करत आहेत. तसेच ही वनराई नागरी वस्ती शेजारी आल्याने अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सजीवांना संजीवनी देणाऱ्या वनराईची अवस्था बिकट झाली आहे.
पलिकेकडून या अडीच ते तीन एकरवर पसरलेल्या वनराईला आपल्या ताब्यात घेतली, तर तिथे चांगल्या प्रकारच्या उद्यानाची बांधणी करता येऊ शकते. ज्याप्रमाणे उद्यानाना सेवा सुविधा पुरवल्या, तर येथे नागरिकांचा अधिवास, रेलचेल राहील. त्यामुळे वृक्षवल्लीचा विकास होऊ शकतो. त्यामुळे वृक्षांची हानी होऊ शकत नाही. तसेच कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानातील मीयावकी प्रकल्प येथे राबवला गेला, तर आतापेक्षा दुपटीने वृक्षांची वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
येथे मियावकीसारखा प्रकल्प राबवला गेला व त्याला निसर्ग उद्यानासारखी जोड दिली, तर ही वनराई सजेल. या वनराईने सजीवसृष्टीला पोषक असे वातावरण आणि ऑक्सिजन सारखा जीवनावश्यक प्राणवायू मिळेल. या वनराईबाबत पालिकेने मनापासून विचार करावा. – पुष्पक मढवी, सामाजिक कार्यकर्ते, घणसोली
ही एक चांगली संकल्पना आहे. मियावकी प्रकल्प राबविण्यासाठी खासगी सामाजिक संस्थादेखील पुढाकार घेत आहेत. त्यासाठी प्रयत्न करू; परंतु वन विभागाची जमीन असल्याने त्यासाठी त्यांची परवानगी घेतल्यावरच पुढील नियोजन होऊ शकते. – नितीन नार्वेकर,उपायुक्त, उद्यान, पालिका