Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमीनाशकात फकीरवाडी झोपडपट्टीमध्ये आगीचा भडका

नाशकात फकीरवाडी झोपडपट्टीमध्ये आगीचा भडका

नाशिक (वार्ताहर) : येथील अमरधाम रस्त्यालगत असलेल्या दरबार रोडवरील फकीरवाडी झोपडपट्टीमध्ये अचानकपणे सोमवारी (दि.७) एका घरात शॉर्ट सर्किट होऊन दुपारी बारा वाजता आगीचा भडका उडाला. सुदैवाने हे घर बंद होते. तसेच घरातील सिलिंडरने पेट घेतला नसल्याने मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दल शिंगाडा तलाव येथील जवान घटनास्थळी वेळेत दाखल झाले. तातडीने आग विझविण्याची आपत्कालीन कार्य सुरू करण्यात आले, मात्र अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळ असा हा परिसर असल्याने हा आग विझवण्यात अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाचा बंब दरबार रोडने चढावरती नेऊन थांबविण्यात आला. तेथून घटनास्थळापर्यंत अग्निशमन दलाच्या लोकांनी पाईप लावून पाण्याचा मारा करत घराला लागलेली आग विझवली.

यावेळी सर्व परिसर धुरामध्ये हरवलेला होता. घरातील फ्रिज, लाकडी कपाटसह संसारपयोगी अन्य वस्तूंची राख झाली. यामध्ये सलीम खान लतीफ खान आणि आतिक खान अशा तिघांच्या कुटुंबीयांचा संसार बेचिराख झाला हे कुटुंबीय आज सकाळीच साडेसहा वाजता घर कुलूप बंद करून लग्नासाठी पाचोराच्या दिशेने रवाना झाले होते. त्यामुळे आग लागली, तेव्हा घरात कोणीही नव्हते. कुटुंबीय पिंपळगाव बसवंतपर्यंत पोहोचलेले असताना त्यांना रहिवाशांनी घटनेची माहिती कळविली असता त्यांनी पुढचा प्रवास थांबून पुन्हा घराकडे परतीचा प्रवास सुरू केला.

अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी आले. पाण्याचा मारा करून संपूर्ण आग विझविण्यात आली. भद्रकाली पोलिसांनी दरबार रोड परिसराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता तसेच बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले. यामुळे आपत्कालीन कार्य सुरळीतपणे पार पडले. अत्यंत लोकवस्तीचा हा परिसर असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र अग्निशमन दलाने वेळीच दाखल होऊन पुढचा धोका टाळला त्यामुळे नागरिकांनी व रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -