Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमहापालिकेचा फेरीवाल्यांवर अंकुश आहे?

महापालिकेचा फेरीवाल्यांवर अंकुश आहे?

मुंबई, स्वप्ननगरी, मायानगरी. या मुंबईत अनेक जण स्वप्न घेऊन येतात आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. काही तर मुंबईत जागोजागी रस्त्यांवर आपले व्यवसाय उभे करतात आणि यातूनच मुंबईच्या सौंदर्यीकरणाला ग्रहण लागते.आजच्या परिस्थितीत मुंबईचा असा एक भाग नाही की जिथे फेरीवाले दिसत नाहीत. मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर, गल्ल्यागल्ल्यांमध्ये फेरीवाल्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. बरं या फेरीवाल्यांवर पालिकेचा अंकुश तरी आहे का? काही ठिकाणी तर असे फेरीवाले वागतात जणू ज्या जागेवर व्यवसाय थाटलाय ती आपल्या मालकीचीच आहे.

मुंबईत दादर पश्चिमेला असलेले फेरीवाल्यांचे साम्राज्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. बरं केवळ दादरच नाही तर सीएसटी, चर्चगेट, बांद्रा, बोरिवली, मालाड अशा अनेक ठिकाणी फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरले आहे. बरं हे साम्राज्य केवळ पालिकेच्या जागेवरच नाही तर रेल्वेच्या ही जागांवर पाहायला मिळते. रेल्वेच्या पुलावर, तर रेल्वेच्या बाजूच्या परिसरात, रेल्वेच्या हद्दीत १०० मीटर अंतरावरील फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली होती. मात्र ही कारवाई काही दिवसच केवळ देखावा म्हणून करण्यात आलेली आहे की काय? असं वाटत आहे. कारण पुन्हा स्टेशन परिसरात फेरीवाले बसल्याचे पाहायला मिळत आहे. बरं पालिकेने जरी फेरीवाल्यांबाबत कारवाई केली तर तीही तात्पुरती असते. पालिकेची कारवाई होऊन गेल्यानंतर पुन्हा त्याच जागी फेरीवाले बसल्याचे पाहायला मिळते, काही ठिकाणी तर स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा स्वयंघोषित भाई समजल्या जाणाऱ्या लोकांना फेरीवाल्यांकडून काही चिरी मिरी देण्यात येते.

त्यामुळे महापालिकेची कितीही कारवाई झाली तरी ते फेरीवाले कायम तिथेच बसल्याचे पाहायला मिळतात. एवढंच काय तर सीएसटी परिसरात असलेल्या क्रॉफेर्ड मार्केट अगदी मुंबई पोलीस कमिशनरच्या कार्यालयाच्या समोर आणि बाजूला असलेल्याचं पदपथावर फेरीवाल्यांची जणू जत्राच भरलेली असते. मुंबईच्या इतर ठिकाणांपेक्षा ज्या ठिकाणी पोलीस कमिशनर कार्यालय असून देखील कारवाई होत नसेल, तर मुंबईच्या इतर ठिकाणचा प्रश्नच वेगळा आहेत. बरं फेरीवाले केवळ ठेला लावून बसत नाहीत तर ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीही ठेला न लावता आपलं समान प्लास्टिकमध्ये गुंडाळून त्याच जागी बांधून ठेवतात. त्यामुळे ही जागा नक्की कोणाची असा प्रश्न पडतो. मुंबई महापालिकेने २०१४ मध्ये फेरीवाला सर्वेक्षण केले होते. मात्र त्याची पुरेपूर अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा मुंबईत फेरीवाल्यांची संख्या वाढून मुंबईचे सौंदर्यीकरणं खराब होताना पाहायला मिळते.

शनिवारी घडलेली फॅशन स्ट्रीट येथील घटना ही केवळ एक उदाहरण आहे. जर पालिकेने आताच फेरीवाल्यांवर अंकुश लावला नाही तर अशा घटना पुन्हा घडण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. चर्चगेटच्या फॅशन स्ट्रीट परिसरात १० ते १५ दुकानं जाळून खाक झाली. ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली म्हणून सुदैवाने कोणतीही मानवी हानी झाली नाही. मात्र फॅशन स्ट्रीटसारखा परिसर केवळ एक नाही तर मुंबईत अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. बांद्रा येथे हिल रोड, लिंकिंग रोड येथे तर संपूर्ण रस्त्यापर्यंत फेरीवाले बसलेले असतात. वाहनांना जाण्यासाठी जागाच राहिलेली नसते, सेम दादर पश्चिम येथे प्रसिद्ध असलेल्या कृष्णा वडा हॉटेलची गल्ली. नक्षत्र मॉलची गल्ली आणि दादर कबुतरखानाची गल्ली अशा अरुंद असलेल्या ठिकणी फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. बरं येथे वाहन जायला काय तर लोकांना चालायलाही जागा नाही. परिणामी स्टेशनवरून कामावर जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना, जवळच राहण्याऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असतो. या गर्दीतून रस्ता काढत त्यांना जावे लागते. बरं याचा बाजारात राहणाऱ्या स्थानिकांना होणारा त्रास वेगळा. रोज मोठ्याने होणाऱ्या आवाजाचा, वादावादीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात सणासुदीच्या काळात असलेल्या गर्दीची समस्या काही वेगळीच आहे.

मुंबईत अनेकदा सोमवारी फेरीवाले आपली दुकाने बंद ठेवतात. मात्र यावेळी देखील आपले समान त्याच ठिकाणी बांधून ठेवतात. त्यामुळे हा त्रास सुट्टीच्या दिवशीही कमी नाही. मुळात काही फेरीवाले काही ठिकाणी ठेला लावतात तेथेच कचरा करतात. त्यामुळे मुंबईच्या बकालपणात अजूनच भर पडते. एकीकडे मुंबई महापालिका मुंबईला आकर्षक शहर करण्यासाठी मुंबईतील सौंदर्यीकरणावर भर देत आहे, यासाठी कोट्यवधी खर्च करून, मुंबईतील रस्ते, पदपथ, समुद्र किनारे, चौपाट्या, सुस्थितीत करणार आहेत व येथे मात्र फेरीवाल्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत काही तोडगा काढताना दिसत नाही आणि जरी तोडगा काढला तरी तो तात्पूरता असतो. कायमस्वरूपी फेरीवाल्यांवर पर्याय काढणं गरजेचे आहे. फॅशन स्ट्रीटसारखी घटना आता घडली यात कोणालाही इजा झाली नाही मात्र वित्तहानी झाली. पण जर पालिका असेच दुर्लक्ष करत राहिली तर या घटना वारंवार होताना दिसतील.

-सीमा दाते

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -