Tuesday, November 11, 2025

दनुष्का गुणतिलका सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित

दनुष्का गुणतिलका सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित

बलात्कार प्रकरणात अटकेनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे पाऊल

कोलंबो (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियन महिलेवरील बलात्कार प्रकरणामुळे श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुणतिलका याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला फुलस्टॉप लागला आहे.

दनुष्कावर एका ऑस्ट्रेलियन महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी पोलिसांनी त्याला ६ नोव्हेंबरला अटक केली. त्याच्या अटकेनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, राष्ट्रीय क्रिकेट संघातील त्याच्या निवडीचा यापुढे विचार केला जाणार नाही.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान खेळाडूवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. बोर्ड या प्रकरणात निष्पक्षपणे तपास करण्यासाठी ऑस्ट्रेलियन पोलिसांना पूर्ण सहकार्य करेल.

ऑस्ट्रेलियन कोर्टात खटल्याचा निकाल आल्यानंतर खेळाडू दोषी आढळल्यास त्याच्यावर दंड ठोठावण्याचीही पावले उचलली जातील. श्रीलंकन बोर्डाने सांगितले की, खेळाडूवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये, मंडळ चुकीच्या गोष्टींना पाठिंबा न देण्याचे धोरण स्वीकारते.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ५ नोव्हेंबर रोजी इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सुपर-१२ सामना खेळला गेला. सिडनीतील सामना संपल्यानंतर ६ नोव्हेंबरला सकाळी पोलिसांनी दनुष्काला टीमच्या मुक्कामी हॉटेलमधून अटक केली. पोलिसांनी सांगितले की, २९ वर्षीय महिलेने त्याच्यावर संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. त्याच्या विरोधात ४ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला ६ नोव्हेंबर रोजीच ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला नाही.

Comments
Add Comment