Monday, March 24, 2025
Homeअध्यात्मस्वामीसुतांना अनुग्रह

स्वामीसुतांना अनुग्रह

आता हरिभाऊ तावड्यांचे श्री स्वामीसूत झाले होते. त्यांना श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह झाला होता. त्याच रात्री महाराजांनी आणखी एक विलक्षण लीला केली. गावाबाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली श्री स्वामी महाराज वास्तव्यास होते. हरिभाऊ, पंडित, गजानन यांच्यासह काही सेवेकरीही महाराजांसमवेत होते. मध्यरात्रीपर्यंत महाराज सोडून काहीजण झोपी गेले होते. आनंद विभोर अवस्थेत असलेले ते तिघे डोळे मिटून झोपेचे सोंग घेऊन पडले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास महाराज एकाएकी उठून बसले. हातात काठी घेऊन ती उगारत पिंपळाच्या झाडाकडे पाहात ते कडाडले, ‘तू वहां से निकल जा. नीचे हमारे बाल-गोपाल सोये है.’ हे उद्गार श्री स्वामी महाराजांची सर्वांच्या प्रती असलेली पितृवत्सलता दर्शवितात. त्या तिघांनीही त्या पिंपळाच्या झाडाची सळसळ ऐकली, त्यातून मशालीच्या उजेडासारखा एक प्रज्वलित आगीचा लोळ निघून गेल्याचे पाहिले. तसे ते तिघेही भयचकित झाले होते. थोड्याच वेळात हरिभाऊ भानावर आले. सद्गुरुप्रती त्यांची ओढ तीव्र होती. त्या दृश्यमय लीलेने ती अधिकच तीव्र झाली. त्या तीव्र ओढीने म्हणा अथवा श्री स्वामींच्या पूर्व नियोजनाने समजा, हरिभाऊ त्या मध्यरात्री श्री स्वामींपाशी जाऊन त्यांचे पाय गुरुभक्तीने संमोहित होऊन चेपू लागले. तेव्हा त्या दोघांच्याही काही गुह्य गोष्ट बराच वेळ चालल्या.

काय असतील? आपल्या सर्वांच्या आकलना पलीकडच्या त्या आहेत; परंतु श्री स्वामीसुतांनी दूरवर समुद्र किनारी जाऊन काय करावे, याबाबत श्री स्वामींनी निश्चितच मार्गदर्शन केले असावे, असा तर्क बांधण्यास वाव आहे. कारण श्री स्वामी, पुढे अनेकांना मार्गदर्शन घेण्यासाठी मुंबईस पाठवत. दूरवर अक्कलकोटी येण्याऐवजी श्री स्वामीसुतांकडे जाण्याचे सुचवित. त्याचा सबळ पुरावा म्हणजे श्री स्वामींनी उशाखाली असलेली छाटी आणि कफनी हरिभाऊंच्या अंगावर घालत ते म्हणाले,’आपला सर्व संसार लुटून टाक. म्हणजे आतापर्यंत स्वतःचा संसार-प्रपंच केला तो पुरे. येथून पुढे रंजल्या गांजल्यांचा, दुःखी-पीडितांचा संसार कर आणि आमची ध्वजा उभी कर.’ हेच हरिभाऊ तावडे पुढे स्वामीसूत म्हणून नावारूपास आले. त्यांनीच गिरगावचा स्वामींचा मठ स्थापन केला. स्वामी व स्मामीसूत अमर झाले.

-विलास खानोलकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -