Friday, March 21, 2025
Homeमहामुंबईभांडुपमधील नाट्याविष्काराचा अजिंक्यतारा नाटकाने समारोप

भांडुपमधील नाट्याविष्काराचा अजिंक्यतारा नाटकाने समारोप

दशावतारी कलावंतांनी चलचित्राद्वारे नाट्य कला चौफेर वाढवली!

आकर्षक चलचित्र देखाव्यावर पब्लिक झाले फुल टू फिदा!

माध्यम प्रायोजक ‘दैनिक प्रहार’

किशोर गावडे

मुंबई : सह्याद्री विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ट्रिक्ससीन युक्त पौराणिक नाट्याविष्काराचा समारोप काल रात्री ‘अजिंक्यतारा’ या नाटकाने झाला.

लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर, संचालक सिद्धेश कलिंगण यांच्या मार्गदर्शनाखाली एका अजिंक्य योद्धाची अजिंक्य कथा ‘अजिंक्यतारा’ हा नाट्यप्रयोग प्रचंड हाऊसफुल झाला. यावेळी सह्याद्री विद्यामंदिरचे संपूर्ण पटांगण तुडुंब भरलेले होते.

ऐश्वर्या देवतेचे हत्तीवरून दर्शन, पृथ्वीगोलातून वनराज प्रकट, असुर मर्दन यज्ञ, महाकाय मगर, अधांतरी दोन दानव भक्ती दर्शन, कोष्टीरुपी विराट राक्षस, मगर मानव संग्राम, कलशावर देवी दर्शन, शस्त्राने महाकाय राक्षसाचे तीन तुकडे, अशा डोळ्याचे पारणे फिटेल अशी अदाकारी सादर करून चलचित्र देखाव्यासहित सादर करण्यात आली. नाट्य रसिकांनी “याची देही याची डोळा” अनुभवत टाळ्यांचा कडकडाट करून “अजिंक्यतारा” या नाटकाच्या सर्व कलाकारांचे कौतुक केले .

“न भूतो न भविष्यती” असा देलखेचक व सर्वांग सुंदर कार्यक्रम मुंबईमध्ये प्रथमच पाहायला मिळाला, अशी अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

कलेश्वर दशावतावर नाट्य मंडळाचे सर्व कलाकार त्या कौतुकाला पात्र ठरलेले आहेत. अनेकांनी कै. सुधीर कलिंगण यांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. या नाटकातील गंभीर भूमिकाही रसिकांनी मोठ्या मनाने स्वीकारत प्रत्येक कलाकाराची पाठ थोपटली. ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ ट्रस्ट मालक प्रवीण धुरी व उमेश धुरी यांचे अथक परिश्रम दिसून आले.

“अजिंक्यतारा” या नाटकातील दादा राणे कोळसकर, राधाकृष्ण नाईक, निळकंठ सावंत, काका कलिंगण, सुनील खोरजुवेकर, भाऊ मिस्त्री, चारुदत्त तेंडुलकर, पप्पू घाडीगावकर आणि सिद्धेश सुधीर कलिंगण यांच्या भूमिका अत्यंत प्रभावीव लक्षवेधी ठरल्या.

तर संगीताची साथ संदीप कोनस्कर मृदुंगमणी राजू कलिंगण, ताल रक्षक चंद्रकांत खोत यांनी रसिकांची मने जिंकली. या नाटकाला ध्वनिक्षेपणाची व्यवस्था गोपी सातोस्कर आणि परिवाराने सुरेख केली होती.

या नाट्यप्रयोगासाठी सह्याद्री विद्यामंदिरचे अध्यक्ष रामराव सुर्वे, आमदार रमेश कोरगावकर, माजी आमदार अशोक पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम, राजू चव्हाण, समाजसेविका राजोल संजय पाटील, भास्कर बर्वे काका, कोकण महोत्सवाचे प्रमुख सुजय धुरत, विवेक सावंत, रोहन केटरर्स मालक रवींद्र सावंत, राजश्री मांदविलकर, नेहा पाटकर, प्रकाश माने, संजय शिंदे, संदीप कुंभार, प्रकाश सकपाळ, सुप्रिया धुरत, सुरेश सावंत, दिलिप हिरनाईक चौघुले, प्रदीप भाबल, किशोर जाधव, प्रसाद येरम, तानाजी बागवे, उमेश धुरी, मयुरी गांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन पत्रकार किशोर गावडे यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -