आपल्या सिनेसृष्टीने खूप आधीपासून प्रबोधनाचे काम करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात जेव्हा या व्यवसायात पैशाला टोकाचे महत्त्व आलेले नव्हते, तेव्हाच्या या गोष्टी! किशोरकुमारने ‘आंसू और मुस्कान’मध्ये गायलेल्या एका गाण्याप्रमाणे “जगत नारायणको छोडके संतो, नगद-नारायणके सब हैं यारम” असे बॉलिवूडचे स्वरूप झालेले नव्हते त्या काळच्या या गोष्टी! जुन्या दिग्दर्शकांना मजुरांचे शोषण, जमीनदारी, कुटुंबाचे महत्त्व, त्यातही होणारे स्त्रियांचे शोषण, विवाहसंस्थेचे पावित्र्य, संस्कार, भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, देशप्रेम असे विषय कोणत्याही मसाल्याशिवाय, चालत असत ते दिवस!
असाच एक विषय अंधश्रद्धा! सोहनलाल ग्रोव्हर यांनी निर्माण केलेला १९६४चा ‘शगून’ ज्योतिष्यावरील अतिरेकी विश्वासाच्या दुष्परिणामावर बेतलेला होता. प्रमुख भूमिका होत्या वहिदा रहमान, कंवलजीत, नाझीर हुसैन, अचला सचदेव, निवेदिता, प्रतिमा देवी, चांद उस्मानी आणि नाना पळशीकर यांच्या.
गीता (वहिदा रहमान) मैत्रिणीबरोबर सहलीला म्हणून नैनितालला जाते. तिथे तिची भेट मदन (कंवलजीत)शी होते. आधी झालेल्या नोकझोकीमधून त्या काळाच्या सिनेमातील रितीरिवाजाप्रमाणे त्यांचे प्रेम जुळते! मात्र कोट्यधीश असलेल्या मदनच्या वडिलांच्या संपत्तीवर त्यांचा दिवाण गिरिधारीलाल (नाना पळशीकर) याचा डोळा आहे. त्याला आपली पुतणी रेखा (निवेदिता ऊर्फ लिबी राणा) हिचे लग्न मदनशी करवून रायसाहेबांची संपत्ती हडपायची आहे. त्यासाठी तो ज्योतिषाला पैसे देऊन गीताच्या पत्रिकेत मंगळदोष असल्याचे सांगायला लावतो. मदन आणि गीताचे लग्न होऊ नये, असा गिरिधारीलालचा प्रयत्न असतो. गीताची आई टोकाची अंधश्रद्धाळू असल्याने तिला गीता आवडली असूनही, ती गीता आणि मदनच्या लग्नाला पत्रिकेतील दोषामुळे नकार देते. त्यातून राय कुटुंबाला आणि गीताला भोगावे लागणारे दु:ख म्हणजे या सिनेमाची कथा!
‘शगून’मध्ये गिरिधारीलालच्या पुतणीची भूमिका केली होती लिबी राणा ऊर्फ निवेदिता हिने. या कमालीच्या सुंदर अभिनेत्रीला नेहमी दुय्यम भूमिकाच मिळाल्या. तरीही तिने तिचा ठसा उमटवला होता. निवडक ७/८ सिनेमाच मिळालेली लिबी राणा ६० आणि ७०च्या दशकात खूप लोकप्रिय होती. नंतर मात्र ती लगेच गायब झाली. ती पुन्हा प्रकटली थेट १९९६मध्ये ‘जान’मध्ये एक सहाय्यक अभिनेत्री म्हणून. आज ती हयात आहे की नाही हेही कुणाला माहीत नाही.
शगूनमध्ये एकूण ८ गाणी होती त्यातली २ खूपच लोकप्रिय झाली. ‘परबतोके पेडोपर शामका बसेरा हैं, सुरमयी उजाला हैं, चंपई अंधेरा हैं, हे महम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले गाणे पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे आहे. दुसरे ‘तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो.’ तर आजही अनेकांच्या ओठावर आहे. ते गायले होते संगीतकार खैयाम यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी!
गीतकार साहिर लुधियानवी म्हटल्यावर ते अर्थपूर्ण आणि अगदी हळुवार मनस्वी भावनांना अभिव्यक्ती देणारे असणार हे गृहीत धरता येते! जरी मदनचे लग्न गीताशी ठरत असले तरी रेखाचेही मदनवर प्रेम बसले आहे. मदनचे लग्न गीताशीच होते आणि नंतर त्याच्या जीवनात अनेक अडचणी उद्भवतात. त्यावेळी मदनला सहानुभूती दाखवण्यासाठी हे गाणे रेखावर (लिबी राणा) चित्रित झाले आहे. यावेळी ती इतकी सुंदर दिसत होती की, सौंदर्याबाबत तिची तुलना फक्त मधुबालाशीच होऊ शकली असती.
प्रेमात आकंठ बुडालेली प्रेमिका गांजलेल्या प्रियकराला आपल्या प्रेमाची, आयुष्यभराच्या साथीचे आश्वासन देते आहे. ती त्याला त्याच्या दु:खात दिलासा देऊ इच्छिते. तुझी सर्व दु:खे मला देऊन टाक, अशी तिची प्रेमाची मागणी आहे. तुझ्या मनाला जी उदासी आली आहे, आतले भावविश्व उजाड झाले आहे, ते सगळे मला देऊन टाक, असे ती विनवते –
तुम अपना रंजो-गम,
अपनी परेशानी मुझे दे दो.
तुम्हे गमकी कसम,
इस दिलकी वीरानी मुझे दे दो…
मला हे मान्य आहे की, तुझ्यासाठी मी अजिबात महत्त्वाची नाही. तुझे प्रेम मला मिळणारही नाही, पण तुझे दु:ख, काळज्या, चिंता देऊ टाकण्यास तरी पात्र असेन ना रे?
ये माना मैं किसी काबिल
नहीं हूँ इन निगाहोंमें.
बुरा क्या है अगर ये दुःख,
ये हैरानी, मुझे दे दो…
जर तू मला सगळ्या चिंता देऊन टाकल्यास, तर मग मी बघेन जे जग तुला कसे सतावते ते. तुझी सर्व प्रकारे काळजी घेण्याची जबाबदारी मग माझी! मी तुला कोणतीच वेदना होऊ देणार नाही. तू तुझी सगळी जबाबदारी मला देऊन तर खरी!
मैं देखूं तो सही,
दुनिया तुम्हे कैसे सताती है!
कोई दिनके लिए,
अपनी निगहबानी मुझे दे दो…
मी माझे हृदय तुला देऊन तुझे मला मिळावे, अशी इच्छा केली होती. मात्र आता तुझे हृदय तू दुसऱ्या व्यक्तीला दिले आहे, हेही मला मान्य आहे. पण त्या हृदयाला जर काही पश्चाताप होत असेल, लज्जा किंवा संकोच वाटत असेल, तर तोही मला देऊन टाक. बाकी काही मिळाले नाही तरी त्यानेही मी धन्य होईन रे जीवलगा.
वो दिल जो मैने माँगा था,
मगर गैरोने पाया था…
बड़ी इनायत हैं अगर उसकी,
पशेमानी मुझे दे दो…
कसल्या या मागण्या, कसले हे प्रेम आणि कसली ही आयुष्यभराची नाती! सगळेच अकल्पित. जुना काळ आठवला की, असली गाणी हुरहूर लावून जातात. दिवसभर मनाला घेरून टाकतात. एका वेगळ्याच गूढ प्रदेशात घेऊन जातात आणि मनाला चिंतनशील करून शांत आणि प्रसन्न करून टाकतात. म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!
-श्रीनिवास बेलसरे