मनोरंजन विश्वातील काही कलाकार केवळ मालिकांमध्ये नाव कमावतात, काही फक्त चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवतात, तर काही केवळ रंगभूमीवरच आपली कारकीर्द घडवतात. पण प्रशांत दामलेंसारखा एखादा अवलिया रंगकर्मी मालिका आणि चित्रपटांमध्ये यशस्वी झाल्यानंतरही रंगभूमीवरच अधिक रमतो. एका मागोमाग एक विक्रम करत प्रशांत दामले यांनी केवळ आपलं फॉलोइंग वाढवलं नसून, रंगभूमी हीच कर्मभूमी मानत एकापेक्षा एक सरस आणि गाजलेली नाटकं मराठी रसिकांना दिली आहेत. ३७,५०० तास रंगभूमीवर वावरत रसिकराजाला हसवण्याचं आपलं कर्तव्य चोख बजावणारा हा ‘साखर खाल्लेला माणूस’ म्हणजेच प्रशांत दामले आता १२,५०० प्रयोग करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
ठरावीक अंतराने काही ना काही विक्रम करत मराठी रंगभूमीकडे रसिकांचे लक्ष वेधून घेणारे प्रशांत दामले ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाद्वारे आपला १२,५००वा प्रयोग सादर करणार आहेत. मुंबईतील सर्वात मोठं सभागृह अशी ख्याती असणाऱ्या किंग्ज सर्कल येथील चंद्रशेखरेंद्र षण्मुखानंद सभागृहात मनोरंजन विश्वातील जवळपास २५० ते ३०० कलाकारांच्या साक्षीनं प्रशांत आपला १२,५००वा प्रयोग सादर करणार आहेत. मराठी रंगभूमीसाठी एखादा अनुपम्य सोहळा ठरावा, असा हा प्रयोग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहून ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवणार आहेत. एखादा खेळाडू जसा आपल्या खेळात प्रावीण्य मिळवत जगज्जेता बनतो, तसे ३७,५०० तास रंगभूमीची सेवा करून प्रशांत दामले रसिकांच्या मनाचे जेते बनले आहेत. रंगभूमीवर वावरणारा सडपातळ देहयष्टीचा नवखा तरुण ते वैयक्तिक जीवनात आजोबा बनल्यानंतरही त्याच स्फूर्तीनं विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा विक्रमवीर हा प्रवास प्रशांत यांनी लीलया पूर्ण केला असला तरी सोपा मात्र मुळीच नव्हता. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या एकांकिका स्पर्धेतील प्रशांतची भूमिका आजही काही जुन्या-जाणत्या लोकांच्या स्मरणात आहे. १९८३ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘टुरटुर’ या नाटकापासून सुरू झालेला प्रशांत यांचा प्रवास आज गौरी थिएटर्स आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून वर्तमानकाळातील आजच्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. या प्रवासात प्रशांत यांनी पत्नी गौरी यांच्या साथीनं बरीच दर्जेदार नाटकं रसिकांच्या दरबारी सादर केली. प्रेक्षकांनीही प्रशांत यांच्या प्रत्येक नाटकावर मनापासून प्रेम केलं. विशेष म्हणजे नवीन पिढीला नाटकांची गोडी लावत तरुणाईच्या मनात मराठी रंगभूमीबद्दल ओढ निर्माण केली. ‘बुक माय शो’वर मराठी नाटक ‘हाऊसफुल्ल’ करण्याचा बहुमानही प्रशांत दामलेंच्या नाटकांनी मिळवला.
पुरुषोत्तम बेर्डेंच्या ‘टुरटुर’ नाटकानं प्रशांतमधील कलाकाराला व्यावसायिक पातळीवर मोठा ब्रेक देण्याचं काम केलं. १९८५ मध्ये मराठी रंगभूमीवर आल्यानंतर माईलस्टोन ठरलेल्या ‘मोरुची मावशी’ या नाटकानं प्रशांत यांचं नवं रूप रसिकांसमोर सादर केलं आणि त्यांच्या फॅन फॅालोईंगचा ग्राफला जणू बूस्टर मिळाला. मावशीच्या भूमिकेत विजय चव्हाण यांनी अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवूनही प्रदीप पटवर्धन यांच्या साथीनं प्रशांत यांनी केलेली धमाल अद्यापही कोणी विसरलेलं नाही. १९८६ मध्ये रंगभूमीवर अवतरलेल्या ‘लग्नाची बेडी’मध्ये रसिकांना प्रशांतमधील एक वेगळं रूप पाहायला मिळालं, ज्यावर आजही प्रेक्षक भाळले आहेत. मराठी रंगभूमीवरील रत्नपारखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्माते सुधीर भटांच्या नाटकांनी प्रशांतच्या अभिनयाला पैलू पाडण्याचं काम केलं. ‘ब्रह्मचारी’ या नाटकात भटांनी प्रशांतची जोडी वर्षा उसगावकरसोबत जुळवत जणू रसिकांना त्यांच्या आवडीची पेअर दिली. या नाटकानं प्रशांत यांच्या आत दडलेल्या गायकालाही मोठा ब्रेक दिला. या नाटकातील प्रशांत यांची गाणी इतकी गाजली की पुढे भटांचं नाटक, प्रशांतची मुख्य भूमिका आणि त्यांचं गोड गाणं असं एक हिट समीकरणच बनलं. या समीकरणामुळे ‘प्रियतमा’ आणि ‘लेकुरे उदंड जाहली’ या नाटकांमधील गाणीही लोकप्रिय झाली. विनोदी नाटकांच्या जत्रेत हास्याची कारंजी फुलवणाऱ्या प्रशांत यांची ‘पाहुणा’ या नाटकातील गंभीर भूमिकाही रसिकांनी मोठ्या मनानं स्वीकारत कौतुकाची थाप दिली.
मोहन तोंडवळकरांच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाने प्रशांत दामले आणि विनय येडेकर या वास्तव जीवनातील दोन मित्रांना एकाच रंगमंचावर उभं केलं. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांतचा ‘आहे काय नाय काय’ हा डायलाॅग आजही चांगलाच पाॅप्युलर आहे. या नाटकानं आपला एक वेगळाच विक्रम केला आहे. याखेरीज ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘बे दुणे तीन’, ‘चल काहीतरीच काय’, ‘सासू माझी ढासू’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘जादू तेरी नजर’, ‘बहुरूपी’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकांनी रसिकांना एकच गोष्ट भरभरून दिली ती म्हणजे मनमुराद आनंद… अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कलाकार निधीसाठी प्रशांत यांनी सेलिब्रिटींसोबत ‘लग्नाची बेडी’ आणि ‘सुंदर मी होणार’ या नाटकांचे केलेले मोजकेच प्रयोग पुन्हा व्हावेत, अशी मागणी आजही अनेकदा केली जाते. यातच या दोन नाटकांची आणि प्रशांतची लोकप्रियता समजते.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सलग सहा प्रयोग करत प्रशांत यांनी वर्ल्ड रेकाॅर्ड केला. ५ जानेवारी २०१३ या दिवशी ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा प्रशांत यांनी १०,७००वा प्रयोग सादर केला. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डनेही घेतली. २४ डिसेंबर १९९५ रोजी तीन नाटकांचे वेगवेगळे प्रयोग एकाच दिवशी सादर करत प्रशांत यांनी एक नवा पायंडा रचला. १ जानेवारी १९९५ ते ३१ डिसेंबर १९९५ या एका वर्षामध्ये ४५२ प्रयोग करण्याचा विक्रमही प्रशांत यांच्याच नावावर आहे. पुढल्या वर्षी आणखी मोठी झेप घेत १ जानेवारी १९९६ ते ३१ डिसेंबर १९९६ या वर्षभरामध्ये प्रशांत यांनी ४६९ प्रयोग करत स्वत:चाच विक्रम मोडीत काढून नवीन आकडेवारी रचली. १८ जानेवारी २००१ या एका दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे पाच प्रयोग सादर करत त्यांनी खऱ्या अर्थाने विक्रमादित्य या पदवीला आपण योग्य असल्याचं सिद्ध करून दाखवलं. ‘मोरुची मावशी’ नाटकाचे नाबाद १००० प्रयोग, ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचे १७४५ प्रयोग, ‘चार दिवस प्रेमाचे’ नाटकाचे नाबाद १००० प्रयोग, ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटकाचे १५०० पेक्षाही अधिक प्रयोग म्हणजे प्रशांत दामलेंच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. महाराष्ट्रातील रसिकांसोबतच अमेरिका-कॅनडासह इतर देशांमध्ये वास्तव्य करणारे मराठी रसिक प्रशांत यांच्या नाटकांची आतुरतेनं वाट पाहत असतात. प्रशांत मात्र कोणालाही नाराज न करता आपली आणि टीमची योग्य काळजी घेऊन सर्व गोष्टी अचूकपणे जुळवून आणतात. यासाठी ते कायम परदेशातील महाराष्ट्रीय रसिकांच्या टचमध्ये असतात.
प्रशांतच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं…’ या गाण्यानं रंगभूमीवर इतिहास घडवला आहे. खरं तर ‘लग्नाची गोष्ट’ हे नाटक सुपरहिट झाल्यावर अद्वैत दादरकरनं लिहिलेलं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक मागील काही वर्षांपासून मराठी रसिकांचं निखळ मनोरंजन करण्याचं काम अवितरपणे करत आहे. कोरोनाच्या काळात यात बाधा आली, पण पहिल्या लाटेनंतर रसिकांच्या भेटीला येणाऱ्या पहिल्या नाटकाचा बहुमानही ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’नेच पटकावला. कोरोनाच्या निर्बंधांच्या काळात ५० टक्के आसनक्षमतेमध्येही प्रेक्षकांनी हे नाटक हाऊसफुल्ल केलं, यातच प्रशांत दामले या नावाची ताकद लक्षात येते. प्रशांत यांचा आपला एक वेगळा चाहता वर्ग आहे, जो कायम एखाद्या चातकासारखी त्यांच्या नाटकांची प्रतीक्षा करत असतो. नवीन नाटक येईपर्यंत पुन्हा पुन: त्यांच्या जुन्या नाटकांचे प्रयोग नाट्यगृहांमध्ये जाऊन बघतो आणि मुक्त कंठानं त्यांची स्तुती करतो. हेच प्रशांत यांनी कमावलेलं पुण्य आहे. आज प्रशांत १२५०० वा प्रयोग सादर करण्यासाठी सज्ज असताना वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्यावर भरभरून लिहिले जात आहे. प्रशांत दामले नावाच्या अवलियावर स्तुतिसुमने उधळण करणारे रकानेच्या रकाने भरून वाहत आहेत. सोशल मीडियासह यूट्यूबवरही दामलेंच्या कामाचे कौतुक होत आहे. ही सर्व माणसे प्रशांत यांनी आपल्या मधुर वाणीने जोडून ठेवलेली आहेत. प्रशांत यांनी कमावलेली माणसे आज त्यांना त्यांच्या महत्त्वाच्या प्रयोगापूर्वी शब्दरत्नरूपी परतफेड करत आहेत. आजवर बऱ्याच मराठी नाटकांचे महोत्सवी प्रयोग पाहणाऱ्या षण्मुखानंदने यापूर्वी प्रशांत यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकांचे प्रयोग पाहिले आहेत. दसरा मेळाव्यात त्यांनी आघाडीच्या कलाकारांसोबत केलेली धमालही अनुभवली आहे. वयाच्या एकसष्टाव्या वर्षीही तरुणाला लाजवेल अशा प्रचंड ऊर्जेने ३७,५०० तास रंगभूमीवर परफाॅर्म करणारा महानट आता १२,५०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने चेहऱ्याला रंग लावून पुन्हा नव्या जोषात रसिकांसमोर उभा राहिल्याचं षण्मुखानंदला पाहायला मिळणार आहे.
-प्रिया परब