
कल्याणी येथील सागर हॉटेलमध्ये सुमित आणि अमित हे सख्खे चुलत भाऊ ठरल्याप्रमाणे हॉटेलमध्ये हजर झालेले होते व पोलीस अधिकारी सुरेश यांची ते वाट बघत होते. काही वेळातच पोलीस अधिकारी सुरेश दोन अनोळखी व्यक्तींसह सागर हॉटेलमध्ये आले आणि सुमित आणि आम्ही बोलणी झाल्यानंतर याच्या पुढील तुमचं काम हे दोघेजण करतील, असं सुरेश याने सुमित आणि अमितला सांगितलं व ठरल्याप्रमाणे कामाची अर्धी रक्कम तुम्ही आणलीत का? अशी त्यांनी विचारणा केली. त्यावेळी दोघांनी ‘हो आणली आहे’ असं सांगून ती देण्यासाठी त्यांनी चार लाख रुपये असलेली पैशाची बॅग सुरेशला देण्यासाठी पुढे केली. त्याचवेळी दबा धरून बसलेले लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचे अधिकारी यांनी रंगेहाथ पोलीस अधिकारी सुरेश यांना पैशासकट पकडले.
अमित आणि सुमित हे सुशिक्षित बेरोजगार होते. कुठेही त्यांना नोकरी लागत नव्हती आणि त्यातच त्यांची ओळख भिवंडी येथील पोलीस अधिकारी सुरेश यांच्याशी झाली. सुरेश यांनी दोघांना ‘मी तुम्हाला पोलीस सेवेमध्ये भरती करून घेतो, माझी ओळख मंत्रालयात सुद्धा आहे व गृह खात्यामध्येही आहे’ असं त्यांना सांगितलं व बोलणी करण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी भिवंडी येथील हॉटेलमध्ये त्यांना बोलावलं होतं. सुरेशने दोघांची कागदपत्र बघितल्यानंतर शंभर टक्के मी तुम्हाला नोकरीला लावतो, असं त्यांना आश्वासन दिलं आणि त्यासाठी प्रत्येकी पाच पाच लाख रुपये खर्च येईल, असं त्यांनी सांगितलं. दोघांनी विचार केला की, आपल्याला काही खटपट न करता कोणताही त्रास सहन करता जर सरकारी सेवेमध्ये नोकरी मिळत असेल, तर रिक्स घेण्यात कोणती अडचण नाही, तेही तयार झाले आणि घरी आल्यानंतर वडीलधाऱ्या माणसांना त्यांनी झालेल्या सर्व गोष्ट सांगितली. ‘आम्हाला सरकारी नोकरी मिळत आहे, त्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. त्याकरिता आम्हा दोघांना पाच पाच लाख रुपये द्यावे, असं त्याने आपल्या घरच्या लोकांना विनंती केली. पण, घरातील ज्येष्ठ मंडळींना ही गोष्ट कुठे तरी खटकली. सुरेश फक्त जुजबी ओळखीचा माणूस होता. त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? या मुलांना समजावून त्यांनी बघितलं, पण मुलं काही समजण्यास तयार नव्हती. उलट आपल्याच घरातील ज्येष्ठांवर ते भडकू लागले. ‘आम्हाला नोकरी मिळते, तर तुम्ही आम्हाला मदत करत नाही. मग घरातील लोक शेजारीच असलेले समाजसेवक धीरज यांच्याकडे या मुलांना घेऊन गेले आणि त्यांनी सुरेशची चौकशी करतो, असं वचन दिलं.
धीरज यांनी अमित आणि सुमितच्या कुटुंबाला घेऊन लाच प्रतिबंधक कायद्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आणि या अधिकाऱ्यांनी सुमित आणि अमितच्या घरात या लोकांना मदत करतो, असं सांगून एक सापळा रचला. त्या सापळ्याप्रमाणे दोघांनाही दोन दोन असे चार लाख रुपये देण्यात आले. त्या नोटांचे नंबरही नोंद करण्यात आले होते आणि पोलीस अधिकारी सुरेश याला त्यांनी फोन केला की, आमच्याकडे पैशांचा बंदोबस्त झालेला आहे. तर सुरेश यांनीच कल्याणच्या सागर हॉटेलमध्ये भेटायला त्यांना बोलावलं होतं. त्याचवेळी लाच घेताना पोलीस अधिकारी सुरेश याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. लाच प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या सापळ्यात पोलीस अधिकारी सुरेश सहजरीत्या फसला गेला. रंगेहाथ पकडल्या गेल्यामुळे लाच प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्याच्यावर कल्याण न्यायालयात खटला सुरू असून खटला प्रलंबित आहे.
आजकालची तरुण पिढी कोणतेही कष्ट, मेहनत घेत नाही. आपल्याला सहजासहजी सर्व गोष्टी उपलब्ध व्हाव्यात असा त्यांचा मनसुबा असतो. पैसे फेकले की काम झालं पाहिजे, अशी त्यांची मनोवृत्ती झालेली आहे आणि याच मनोवृत्तीचा फायदा समाजातील अशी विकृत माणसं उचलत आहेत. जास्त करून सुशिक्षित बेरोजगारांना हेरून सरकारी सेवेतील लोक पैशाच्या लालसेपोटी अशा तरुणांना फसवत आहेत. पण, आजकालच्या पिढीला ते लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपण फसवले गेलेलो आहोत याची जाणीव होते.
समाजसेवकांच्या हुशारीमुळे अमित आणि सुमित याचे कुटुंब मोठ्या संकटापासून खरोखर बचावले.
(सत्य घटनेवर आधारित)
-अॅड. रिया करंजकर