पूर्वी दिवाळीच्या दिवशी सकाळी बरीच लोकं दारात फराळ, पोहे वगैरे मागायला येत. तेव्हा त्यांच्यासाठी डबाभर पोहे, थोडे फराळाचे पदार्थ मी बाहेरच काढून ठेवत असे. एका वेळी चार-पाचजण कदाचित एकाच घरातील किंवा एकाच वस्तीतली एकदम येत. बरोबर प्रत्येकाची एकेक पिशवी असायची. त्यात प्रत्येकाला मूठभर पोहे, एखादी चकली, करंजी असं एका कागदात गुंडाळून त्यांच्या पिशवीत टाकायचं.
पण आता शिक्षणाच्या प्रसारामुळे शहाणी झालेली ही माणसं किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना आता घरोघरी जाऊन, असं काही मागायची लाज वाटत असावी. त्यामुळे जवळपास कोणी येत नाही.
पण परवा ‘लाखणकाकू’ आली सकाळी. लांबूनच तिची “ओ वैनी” हाक ऐकू आली. बाहेर जाऊन पाहिलं, तर लाखणीन पायरीवर धापा टाकत बसली. तिची अवस्था बघून तिला पाणी हवं का? विचारलं. ती नको म्हणाली. मग आत जाऊन तिला फराळाचे काही पदार्थ पिशवीत बांधून दिले. पन्नास रुपये हातावर टेकवले. तेव्हा तिला भरून आलं. “याचीच मला गरज होती गो! खायला कोण नाय कोण देतं. पण हातात पैसा नाय. आता काम नाय गे करूक जमत!”
“तुका देव काय पण कमी पडूक देवचा नाय” असा तोंडभर आशीर्वाद देऊन ती पुढच्या घरी गेली. तिच्या त्या थकलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी पाहत राहिले.
खूप महिन्यांपूर्वी एकदा वाटेत भेटली होती. डोक्यावर कसलीतरी पिशवी होती. कशीबशी कमरेवर हात ठेवून हळूहळू चालत घरी चालली होती. तिला म्हटलं, “अगो, या वयात आता कशाला ही ओझी नेतेस डोक्यावरून?” “काय करू ग्ये? नशीबाचे भोग भोगावे लागतंत.!” मग सगळी कर्मकहाणी तिने थोडक्यात सांगितली.
पाच-सहा वर्षांपूर्वी तिचा नवरा गेला. मोलमजुरी करायचा. थोडी दारू प्यायचा. पण बाकी गरीब होता स्वभावानं. तीही चार घरी कामाला जायची. पोरगा तरणाताठा. शिक्षणात काय डोकं नव्हतंच. आठवी-नववीपर्यंतच शिकला नि शाळा सोडली. तोही मग कुणाच्या तरी हाताखाली गवंडीकाम वगैरे करून चार पैसे कमवू लागला. तोपर्यंत ठीक होतं. पण त्याचं लग्न झालं. दहावी शिकलेली बायको मिळाली. म्हणजे त्यांच्या घरात ती हुशारच! पोरगा तिच्या कलेने वागू लागला. सासऱ्याला सुनेच्या हुशारीचं कौतुक होतं. पण सासूचं एकही काम हलकं होत नव्हतं. सुनेने काहीतरी कामाला हातभार लावावा ही तिची अपेक्षा काही चुकीची नव्हती. पण सून बोलण्यात एकदमच ताडफाड होती. ती कोणाचं काही ऐकून घेत नसे. शेवटी व्हायचं तेच झालं. सासू-सुनेचे खटके उडायला लागले. तेव्हा सासूने मुलाला वेगळं राहायला सांगितलं. रोजच्या कटकटीपेक्षा स्वतंत्र संसार थाटलेला बरा. तुम्ही सुखी, आम्ही सुखी! मुलानेही पडत्या फळाची आज्ञा मानून एकाच घरात वेगळा संसार थाटला.
ही दोघं म्हातारी जमेल तसं कमवून आपलं पोट भरत होती. कष्टाची मीठ-भाकर खात होती. तिकडे मुलगा बायकोचा शब्द खाली पडू देत नव्हता. आपली बायको शिकलेली असल्याचं आधीच त्याला कौतुक.
त्यातच सुनेची दोन बाळंतपणं झाली. थोडे दिवस सून माहेरी गेली, तरी पोरांचं करायला तिला जमत नसे. आजी आपली नातवंडांच्या मायेने सगळं विसरून त्यांचं करायची. खाऊपिऊ घालायची. त्यांना आजी आजोबांचा लळा लागला होता. ती त्यांच्याकडेच झेपावत. पण सुनेला तेही बघवत नसे. ती जबरदस्तीने त्यांना आपल्याकडे ओढून आणी.
एक दिवस लाखण आजोबा आजारी पडले. महिनाभरात जग सोडून गेले. लाखणीन एकटी पडली. नवरा गेल्यावर ती महिनाभर तरी कुठे गेली नाही. पण शेवटी पोटाचा प्रश्न होता. खोताच्या घरीच ती दिवसभरासाठी काम करायची. दुपारचं जेवण तिथेच होई. रात्री थोडी पेज करून खाई नि पाणी पिऊन झोपे.
अलीकडे मात्र शरीर कुरकूर करीत होतं. जास्त कष्ट झेपत नव्हते. पूर्वीसारखा हात चालत नव्हता. खोतीणकाकूला तिच्या कामाची जाण होती. ती तिच्या पोटाला घाली. नवऱ्यानंतर देव लवकरच आपल्याला उचलून नेऊ दे, अशी आजी प्रार्थना करी. अजून देवाला तिची दया येत मात्र नव्हती. कधी कधी डोळ्यांतून पाणी यायचं तिच्या! पण तिचे अश्रू ना सुनेला दिसत होते, ना मुलाला! त्यांना तिचा भार आपल्यावर नकोच होता.
माझ्याकडून फराळाचं घेऊन गेलेल्या पाठमोऱ्या लाखणकाकूकडे बघताना तिची दया येत होती. मनात ठरवलं… परत कधी लाखणकाकू भेटली, तर तिला निदान महिनाभर पुरतील एवढे घसघशीत पैसे द्यायचे… या विचाराने मलाच आपल्या मनावरचा भार थोडा हलका झाल्यासारखा वाटला!!
-अनुराधा दीक्षित