जुन्नरला आठवडाभरासाठी ताईच्या गावी राहायला गेले होते. पावसाचे चार महिने संपले होते. ऑक्टोबरची १८ तारीख असूनही पाऊस काही माघार घ्यायला तयार नव्हता. धो धो कोसळणारा पाऊस पाहात दोन दिवस असेच गेले जणू काही कोणी कैदेत कोंडून ठेवले आहे. ताईचे घर शेतात. म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचे म्हणजे तिचे ‘फार्म हाऊस’ आहे. समोर मागे किंवा आजूबाजूला फक्त शेत आणि शेत. सकाळी उठले की ताई सांगायची, मी उपमा करायला घेते… जरा कढीपत्ता-कोथिंबीर घेऊन ये, मागच्या शेतातून. की निघायचे मी. नाश्ता करून झाला की म्हणायची, ‘कोणतीतरी पालेभाजी घेऊन ये, तुला आवडते ती!’ मग कधी शेपू, कधी मेथी, तर कधी अळूची पाने घेऊन मी परतायचे. समोरच्या शेतातून काकड्याही घेऊन यायचे. मग ती म्हणायची, ‘भाजीला काही आणले नाही का?’ मग मी परत बाहेर पडायचे आणि उजव्या बाजूच्या शेतातून कोबी नाहीतर डाव्या बाजूच्या शेतातून फ्लॉवर घेऊन यायचे. टवटवीत वांगी, भेंडी, गवार काढायचाही मोह व्हायचा. शेतात बांधावरून चालले तरी भाजी काढताना मात्र पूर्ण पावले मातीत खोल रुतायची. भाजीतली माती काढून झाली की मग चप्पलला चिकटलेली माती काढावी लागायची! पण या सगळ्या गोष्टीत आनंद होता. घरातल्यांना खाण्यापुरती केळीची बाग, पेरूची झाडे, पपईची झाडे आसपास होतीच. गावातली ही समृद्धी अजमावत शेतात बसून पेरू खाण्याचा आनंद उपभोगला.
शेतात घर असल्यामुळे कोणताच गाव जवळ नव्हता. त्यामुळे तिथे कामाला बाई मिळणे कठीण होते. मग सर्व प्रकारची कामे घरीच करावी लागायची. बदल म्हणून त्यातही आनंद मिळायचा; परंतु या घरकामामुळे इतर कोणत्याही कामासाठी वेळ उरत नाही, हे मात्र नक्कीच!
जुन्नर हे फुलांसाठी खूप प्रसिद्ध आहे. दोन-तीन शेतं ओलांडून मागे गेल्यावर फुलांनी लगडलेली शेती पाहायला मिळाली. झेंडू, गेंडा, अॅस्टर, वैविध्यपूर्ण रंगांचे गुलाब या फुलांबरोबर असंख्य रानफुलेही पाहायला मिळाली. फुलांचे कितीही व्हीडिओ काढले तरी मन भरत नव्हते. सिनेमातल्या नट्या अशा फुलांच्या शेतातून धावताना फक्त सिनेमात पाहिलेले… तसा धावायचा मोह मलाही झाला. पण पावसामुळे चालणेही मुश्कील होते तेथे धावणे कसे शक्य व्हावे बरे? असो!
शेतकऱ्यांचे जीवन फार जवळून पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. बाजूच्या घरातले ताईचे तरुण नातेवाईक शेतातून भाजी काढून आणायचे. त्यानंतर त्या घरातली वयस्कर माणसे दिवसभर भाजी निवडून पोत्यात भरून वजन करून बांधून ठेवायचे. मी काकड्या निवडताना त्यांना पाहिले तेव्हा लक्षात आले की २५% काकड्यांना एक प्रकारची कीड असते आणि ती आपल्याला दिसूनही येत नाही, फक्त त्यांनाच निवडताना लक्षात येते. अशी एक एक काकडी ते बाजूला काढून टाकतात. इतक्या मोठ्या प्रमाणात ताज्या टवटवीत काकड्या बाजूला टाकलेल्या पाहून फारच वाईट वाटले. एक-दोन तिकडून उचलून मी कीड असलेला भाग काढून उर्वरित काकडी खाल्ली. तेव्हा ते ओरडले म्हणाले, ‘इतक्या ताज्या काकडे असताना कशाला?’ पण काही असो आपल्याला सवय असते ना… मुंबईत लाल भोपळा, दुधी भोपळा, फ्लावर, काकडी इ. जशी भाजी आपल्या हातात येते त्यातला निवडून चांगला भाग काढून घ्यायचा… असो.
भाज्यांची फुलांची समृद्धी असली तरी एकंदरीतच त्यांचे जीवन खूप कष्टप्रद आहे हे लक्षात येते. पूर्वी शेत नांगरण्यासाठी, नको असलेले गवत काढण्यासाठी आणि अशा असंख्य कामासाठी मजूर मिळायचे पण आजकाल मजूर मिळणं कठीण झाले आहे.
जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची शेतीही आहे. त्या उसाच्या शेताच्या आसपासही त्या गावातल्याही लोकांना फिरायची भीती वाटते कारण तेथे जागोजागी ‘बिबट्यापासून सावधान’ अशा पाट्या लावलेल्या आहेत. मी सहजच एका वयस्कर गृहस्थांना म्हटले, ‘तुम्ही वनविभागाकडे तक्रार का करत नाही?’
तर त्यांनी सांगितले की, येथे असणारे जे दोन-तीन बिबटे आहेत ते तुम्हा सर्व लोकांना ओळखतात किंवा माणसाळलेले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही माणसाला इजा केलेली नाही. फक्त ते अधूनमधून प्राणी घेऊन जातात. त्यांची ही गोष्ट ऐकून मला नवल वाटले पण खरेही वाटले कारण माझ्या मित्राने एकदा त्याच्या मांजरीला दहा-पंधरा किलोमीटर दूर नेऊन सोडले होते पण दोन दिवसांत ती त्याच्या घरी परतली होती.
चार दिवस आनंदात गेले; परंतु पाचव्या दिवशी विजेचा कडकडाट झाला आणि ती वीज कोणत्यातरी विजेची उपकरणे असलेल्या जागी पडली. बस दोन दिवस घरात वीज बंद झाली. मग काय… टाकीत पाणी चढले नाही, मोबाइल चार्ज करता आला नाही, मिक्सर चालवता आला नाही आणि अजून कितीतरी गोष्टी. मुंबईत काही मिनिटांसाठी वीज गेलेली अनुभवली होती पण काही तासांसाठी गेल्याचे आठवत नव्हते. अनेक अभाव असूनही आनंदाने जीवन कंठणारे शेतकरी मी जवळून पाहत होते. अवेळी पडणारा पाऊस मात्र त्यांच्या कष्टावर पाणी फिरवून गेला होता. तरीही हसमुख चेहऱ्याने ते वावरताना दिसत होते. कितीतरी दिवसांनी आकाश निरभ्र झाले होते. चरण्यासाठी एका रांगेत जाणाऱ्या शेळ्या पाहत मी असंख्य रंगांची उधळण करत पर्वतरांगांमधून उगवलेल्या सूर्याकडे पाहिले आणि मनोमन हात जोडून म्हटले, ‘अरे त्या पावसाला परतवून लाव आणि माझ्यासाठी नाही पण या शेतकऱ्यांसाठी तू रोज उगवत जा ना!’
-प्रा. प्रतिभा सराफ