अॅडलेड : भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर १२च्या अखेरच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताने ७१ धावांनी विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. ज्यात भारताने केएल राहुल आणि सूर्यकुमारच्या अर्धशतकांच्या जोरावर १८६ धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताने त्यांचा डाव ११५ धावात गुंडाळला.
या विजयासह भारताचे गुणतालिकेत ८ गुण झाले असून दोन्ही ग्रुपमधील संघामध्ये भारताचेच गुण सर्वाधिक आहेत. भारताने केवळ एक साखळी सामना (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) गमावला असून इतर सर्व सामने जिंकले आहेत.
भारताने सुपर १२ फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरूद्ध आक्रमक सुरूवात केली. मात्र मधल्या षटकात भारताच्या पाठोपाठ तीन विकेट पडल्याने भारत अडचणीत आला होता. मात्र सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिला. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ६१ धावा ठोकत भारताला १८६ धावांपर्यंत पोहचवले.