Friday, May 9, 2025

कोलाज

छंद

छंद

''थकू नका, खचू नका, भिऊ नका, टाकू नका, ज्या गोष्टीतून आनंद मिळतो तो मिळावा.” प्रकाश आमटे यांचे हे विधान समाजकार्याशी/त्यांनी घेतलेल्या कार्याशी निगडित आहे. स्वीकारलेले काम आणि कामासोबत असलेला छंद हा सोडू नका, टाकू नका. मुलांचे जीवन सुंदर आणि प्रगतिशील होण्यासाठी अभ्यासासोबत एखादा छंद असावाच. मुले आनंदी राहतात, त्याहीपेक्षा वातावरण आनंदी राहते अर्थात पालकांची साथ हवी.


रवींद्रनाथ टागोर यांना लहानपणी वेगवेगळ्या प्रकारचे दगड गोळा करण्याचा छंद होता. त्यांनी गोळा केलेले दगड हातात घेऊन न्याहाळताना त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर त्याला कौतुकाने म्हणायचे, “कसे रे तुला इतके चांगले दगड मिळतात?”; परंतु बऱ्याच घरात “कशाला हा बाहेरचा कचरा घरात आणलाय? अडगळ नुसती! तुझ्या डोक्यात काय कमी दगड आहेत?” अशा वाक्याने त्यांचा आनंदी मूड खच्ची केला जातो.


आयुष्याला आनंद देणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपले छंद. फावल्या वेळात एखादी गोष्ट जोपासतो. त्यामुळे वेळ सार्थकी लागतो, बुद्धीला चालना मिळते तो छंद. छंद म्हणजे नाद! मला कंटाळा आलाय, मला खेळायला मैत्रिणीचं नाहीत, असे जेव्हा नामवंत लेखिका, निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण लहानपणी वडिलांना म्हणायची, त्यावेळी वडील मला म्हणायचे, “तुझा आनंद दुसऱ्यावर का अवलंबून आहे?” तेव्हा मी फारच लहान होते. मी त्यांना म्हणाले, “स्वतःच आनंद निर्माण करायचा म्हणजे काय? त्यावर माझे वडील म्हणाले, “तू कुठला तरी छंद लावून घे. गाणं शिक, चित्र काढ, मूर्ती बनव, शिवणकाम कर, एखादे पुस्तक वाच, स्वयंपाक करायला शिक, सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेव.” वडिलांनी दिलेल्या या कानमंत्रामुळे मी कधीच एकटी नसते. गाडगेमहाराज झाडू मारायचा असला तरी उत्कृष्टपणाचा ध्यास घेऊन मारायचे. छोटे-छोटे छंद सुद्धा जगण्याचे बळ देतात. उदा. झाडांना पाणी घालणे, झाड मोठं होताना निरीक्षण करणे.

लहानवयात मुलांची कागद - कात्री - पेन - रंगीत - पेन्सिल, चिकण माती, खडू, टिकल्या, स्टिकर, घरातील भांडी इत्यादी वस्तूशी मैत्री होते. मूल लहान असताना अनेकजण घराला रंग लावत नाहीत किंवा एखादी भिंत रेघोट्या मारायला ठेवतात. जसजसे मूल मोठे होते, तसा छंदाच्या व्याख्येतही बदल होत जातो. घरातील टाकाऊ वस्तूतून अनेक मुले कल्पक वस्तू तयार करतात. शेजारचा सुदीप नेहमीच प्रयोग, वैज्ञानिक मॉडेल्स, घरी करीत होता. अभियांत्रिकी, चित्रकला, हस्तकला, या दालनाची दारे येथेच उघडली जातात. मुलांजवळ बसावे, कौतुक करावे, संबंधित विषयाची पुस्तके, काही सामान आणून द्यावे. सृजनात्मक कौशल्य वाढीस लागते. छंद मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला नवनवीन पैलू देतात. आजची मुले मोबाइलवर, संगणकावर आपले छंद जोपासतात. छंद म्हणजे स्वतःची आवड जोपासणे.


छंद जनसामान्यात स्वतःची एक वेगळी ओळख तयार करतो.


उदा.


१. लहानपणी घराच्या आजूबाजूला फिरणारे साप माझा पुतण्या विनीतने खूप पहिले होते. तो सर्पमित्र आहेच. पदव्युत्तर होताना सापावर विशेष अभ्यास करून त्यावर संशोधन केले.


२. माझ्या मैत्रिणीचा मुलगा राहुल येल्लापूरकर, संरक्षण दलाचे अभ्यासक आणि संग्राहक. लहानपणापासून सर्व क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या आणि सैन्यदलातील पदाधिकारांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा त्यांना छंद होता. स्वाक्षऱ्यांच्या प्रदर्शनात सोबत राहुल त्याचे अनुभव सांगत असे. पुढे स्लाइड शोची जोड देत आज “जेथे शौर्यही झुकविते माथा” या त्याच्या प्रदर्शनातून देशासाठी अहोरात्र लढणाऱ्या तिन्ही सैन्य दलातील सैनिकांच्या शौर्य गाथा (पराक्रम) जनसामन्यांपर्यंत पोहोचवितात.


३. आपले छंद आपल्याला व्यक्त होण्याइतपत, मत मांडण्याइतपत लायक बनवितात. लेखक, वक्ते वाचनाच्या छंदामुळे विविध विषयांवर बोलू शकतात, लिहू शकतात.


पालकांनी आपला मुलगा मोकळा असताना त्याची हालचाल न्याहाळा, मुलगा मनाने मुक्त असताना तो काय करतो? काय वाचतो? काय पाहतो? बोलताना त्याच्या प्रतिक्रियेतून मते, आवड, कशात गती आहे, कोणत्या विषयाचे आकर्षण आहे, हे सारे समजून घ्या. शोध घेताना वेगवेगळ्या कार्यक्रमाला, व्याख्यानाला, प्रदर्शनाला, आर्ट गॅलरीत, निसर्गाच्या सहलीत पर्यावरणाची, कलेची ओळख होईल. त्यातून त्याला स्वतःच्या छंदाचा शोध लागेल. छंदाला शिक्षणाची जोड द्या, त्याने कल्पनाशक्तीला चालना मिळेल. छंदामुळेही मुलांची एकाग्रता वाढते, अभ्यासाचा ताण कमी होतो. छंदाची कृती करताना त्याला स्वातंत्र द्या. भविष्यात तो स्वतःचे काहीतरी करू शकतो. छंद उत्पन्नाचे स्रोतही होऊ शकते. निदान उत्तम जाणकार म्हणून आस्वाद घेऊ शकतो. बोलू शकतो, लिहू शकतो.


एका छंदाच्या पोटात हजारो शक्यता दडलेल्या असतात. सुरुवातीला लहान दिसणारा छंद अडचणीच्या वेळी, तणावाच्या वेळी आपले आयुष्य बदलवतो. एकटे असाल, आजारी असाल तेव्हा तुम्ही तुमचा छंद एनकॅश करा. फ्लॅशबॅकमध्ये जाताना कितीतरी आठवणी जाग्या होतील नि निराशा नाहीशी होईल. आज सेवानिवृत्तीनंतर नवनवीन छंद जोपासणारे जवळून खूप पहिलेत. गड चढणे, गाणं शिकणे - शेअर मार्केट शिकणे थोडक्यात बाल्यावस्थेत राहून गेलेल्या छंदाचा खेद न करता प्रौढावस्थेत व्यस्त राहतात. हरवून जातात. छंद व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करते.

व. पु. नी म्हटल्याप्रमाणे “हरवणं आणि सापडणं हे छंदात घडते.” छंद जोपासताना आपण हरवून जातो, हरवताना नव्याने काहीतरी सापडते. स्वतःचे आयुष्य आणि आपले भवताल सुंदर/आनंदी करायचे असेल, तर प्रत्येकाला एक तरी छंद हवाच. हे छंदच आपल्याला काहीतरी शिकायला, जगायला, जिंकायला, उंच भरारी घ्यायला शिकवितात. तेव्हा उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका.


-मृणालिनी कुलकर्णी

Comments
Add Comment