Tuesday, April 29, 2025

विशेष लेख

शोभेच्या वस्तूंनी घर सजविणारी ‘हेमांगी’

शोभेच्या वस्तूंनी घर सजविणारी ‘हेमांगी’

आजचा ग्राहक हा कमालीचा चोखंदळ झाला आहे. ग्राहकाचा चोखंदळपणा हा गृहसजावटीमध्येही दिसू लागला आहे. आपल्या घराची सजावट ही चारचौघांपेक्षा वेगळी हटके असली पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला वेळ काढून तसं करणं जमतंच असं नाही. पण ‘आराध्य क्रिएशन वेडिंग होम डेकॉर’च्या हेमांगी सावंत-हटकर हिने घर सजविण्याचं आव्हान उत्तम प्रकारे पेललं आहे. ती फक्त मंगलकार्याप्रसंगी ग्राहकांची घरं सजवत नाही, तर ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर शोभेच्या वस्तूंनी हुबेहूब सजवून प्रत्यक्षात उतरवते. ‘आराध्य क्रिएशन वेडिंग होम डेकॉर’मध्ये घरं सजवण्यासाठी वापरल्या गेलेल्या शोभेच्या वस्तू हेमांगी स्वतः तयार करते. ‘आराध्य क्रिएशन वेडिंग होम डेकॉर’चा प्रवास हा रंजक आहे.

हेमांगीचा जन्म गुजरातमधील बडोदरा येथे झाला. काही काळानंतर सावंत कुटुंब मुंबईतील अंधेरीमध्ये स्थायिक झाले. हेमांगी जॉइंट फॅमिलीमध्ये लहानाची मोठी झाली आहे. तिची आई सुरेखा ही व्यावसायिका आहे. तिचा ‘साई सुरेख’ नावाने घरगुती पदार्थ बनवून विकण्याचा छोटासा व्यवसाय आहे. “आई, वडील आणि बहीण नीलम असे आमचे तिघांचे सावंत कुटुंब. वडील जगदिश आत्माराम सावंत, सरकारी नोकरी करत असल्याने त्यांची सतत बदली होत असायची. त्यामुळे सातवीपर्यंतचे शिक्षण विलेपार्लेच्या पार्ले टिळकमध्ये झाले. वडिलांच्या निवृत्तीनंतर आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. त्यामुळे इयत्ता सातवीनंतरचं माझं शालेय शिक्षण पुण्यात चोपडा हायस्कूलमध्ये घेतले. वाणिज्य क्षेत्रामध्ये पदवीनंतर चिंचवड आयबीएमआर या नामांकित कॉलेजमधून एमबीएचा कोर्स पूर्ण केला. यावेळी डॉ. आशा पाचपांडे यांनी मार्गदर्शन खूप चांगले दिले. त्यांच्या धडाडीच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात एका स्त्रीने आपलं स्वतःचं आयुष्य कसं घडवावं, हे मला समजलं”, हेमांगी बोलत होती.

एमबीए पूर्ण केल्यांनंतर बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. याच अनुभावच्या जोरावर हेमांगीने मुंबईतील टीएनटी युरोपियन कंपनीमध्ये दहा वर्षे नोकरी केली. हेमांगीचा नवरा अजित हटकर हे एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा भारताबाहेर जावं लागतं. हेमांगी जेव्हा भारतात परत आली, तेव्हा नोकरी करायची नव्हती. हेमांगी सांगते, “बऱ्याच महिला ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून प्रोडक्ट रिसेल करून व्यवसाय करत असल्याचं लक्षात आलं. परिणामी आपणही प्रॉडक्ट रिसेल करावं असं वाटत होतं, तेही स्वतः तयार करून. माझा कल हा आर्ट आणि कल्चरकडे जास्त असल्यामुळे एखादी डेकोरेटिव्ह वस्तू तयार केल्यावर घरातून प्रोत्साहनही मिळत होते. त्यामुळे सगळ्या वस्तू स्वतः बनवाव्यात, असा विचार केला. आर्टिस्टिक वस्तू, तोरण बनविण्याचा प्रयत्न सुरू केला.

एका मैत्रिणीच्या सुप्रिया पांचाळच्या वास्तुशांतीला मी बनविलेलं पहिलं तोरण तिला गिफ्ट केलं. सुप्रियाला ते खूप आवडलं, तर अशा प्रकारच्या डेकोरेटिव्ह वस्तू तयार करण्यासाठी तिचा खूप सपोर्ट मिळाला. कारण, तिनं तिच्याकडे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना कौतुकाने माझे प्रोडक्ट दाखविण्यास सुरुवात केली.” अशातच एक मोठी पहिली ऑर्डर हेमांगीला मिळाली आणि तेव्हाच ‘आराध्य वेडिंग होम डेकॉर’चा जन्म झाला.

आराध्यविषयी हेमांगी सांगते, “आराध्य क्रिएशन्समध्ये एक नवी संकल्पना आहे. ज्यामध्ये लग्नघराचं डेकोरेशन केलं जातं. घरात जे सांस्कृतिक कार्यक्रम, सणासुदीला किंवा घरात छोटे-मोठे कार्यक्रम आहेत, त्यासाठी लागणारे डेकोरेशन स्वतः मी करते. तसेच डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य भाड्याने देते. मुंबईतील घरं ही फार छोटी आहेत आणि डेकोरेशनवर सर्वसामान्य माणसं पैसे नाही खर्च करू शकत नाहीत.

त्यावेळेस आम्ही तोरणांची एक अनोखी कॉन्सेप्ट घेऊन आलो. सर्वसाधारणपणे मंगलप्रसंगी घरात चार फुटांची तोरणं लावली जातात. आम्ही ती दहा ते बारा फुटांवर घेऊन गेलो. याच तोरणांच्या मदतीने घर डेकोरेशन करू लागलो. काही डेकोरेटिव्ह पिस त्यांच्या घरी लावू लागलो. या उपायांनी ग्राहकांचं घर सणासुदीला, लग्नाच्या कार्यक्रमात उत्तम प्रकारे दिसेल, याची काळजी घेतली गेली. असं करत करत ‘आराध्य क्रिएशन वेडिंग होम डेकॉर’ची सुरुवात झाली.”

हेमांगी रिसायकलिंगच्या घटकांचा उपयोग करून घरी वेगवेगळ्या वस्तू जसे की, तोरणे, आर्ट पिस बनवू लागली. या वस्तूंच्या विक्रीतून जो नफा झाला, त्याचा उपयोग ती ‘आराध्य क्रिएशन वेडिंग होम डेकॉर’साठी कच्चा माल विकत घेण्यासाठी करू लागली. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी हेमांगीला भांडवलाकरिता कोणाकडेही हात पसरावे लागले नाहीत.

आतापर्यंत तिने ज्या-ज्या कंपन्यासोबत काम केले, त्यावेळेस तिला आलेल्या अनुभवातून ती शिकत गेली. ‘आराध्य वेडिंग होम डेकोर’ला उभे करताना सुरुवातीची चार वर्षे तिला वेगवेगळ्या अडचणी आल्या. पण हळूहळू कामं वाढत गेली. त्यामुळे आराध्या स्थिरावत गेलं.

कोविड काळात जोमाने चालू केलेला व्यवसाय बंद पडला. लोकांच्या घरी जाऊन डेकोरेशन करणे शक्य नव्हते. पण यावेळी हेमांगीच्या नवऱ्याने तिच्या एक्सपर्टिज वापरल्या. त्याविषयी हेमांगी सांगते, ‘माझे सगळे प्रोडक्ट अमेझॉन ॲपवर टाकले आणि तिकडून ऑडर्स येऊ लागल्या. व्यवसायचं नवीन तंत्र या कोविड काळात अवगत झालं. व्यवसाय पुन्हा डिजिटली सुरू झाला आणि नावारूपाला आला. याच दरम्यान ऑनलाइन ‘घे भरारी’ या ग्रुपची साथ मिळाली. सोशल मीडियावर काम करत असताना ‘घे भरारी’चे काम मला दिसत होते. त्यांचे महिला उद्योजकांसाठी जे कार्य चालू होते, ते अगदी वाखाणण्यासारखं होतं. त्यातच हेमांगीची ओळख नीलम उमराणी आणि राहुल कुलकर्णी यांच्याशी झाली. या दोघांनी व्यवसायासाठी खूप साथ दिली. अगदी ऑनलाइन व्यवसाय कसा करावा, इथपासून त्यांनी शिकविले. कोविड काळ संपल्यानंतर ‘घे भरारी’ने मुंबईतील एक्झिबिशनचं व्यवस्थापन करण्याचं काम माझ्यावर सोपविलं. त्यामुळे आता ‘घे भरारी’च्या माध्यमातून स्वतःच्या व्यवसायासोबत इतरांच्या व्यवसायवृद्धीसाठी आपला हातभार लागतो आहे, याचा आनंद आहे.

हेमांगीच्या ‘आराध्य क्रिएशन वेडिंग होम डेकॉर’मध्ये सध्या साडेतीनशेहून अधिक डेकोरेटिव्ह प्रोडक्ट आहेत. कस्टमाइझ सुद्धा केले जातात. हे सगळं बनवून घेताना मी महिला सक्षमीकरणाचा देखील विचार करते.

बहुतेक प्रोडक्ट हे महिलांकडून बनवून घेते. ज्याद्वारे त्यांना घरात बसून कमविता येईल. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं, हीच हेमांगीची भावना आहे.

एखादी व्यक्ती लेडी बॉस तेव्हाच बनू शकते, जेव्हा तिच्या हाती नेतृत्व असतं. ज्याच्यामुळे तिने महिला सक्षमीकरणामध्ये स्वतःसोबत बाकी महिलांच्या व्यवसायवृद्धीसाठी तिचा पाठिंबा असावा किंवा त्याच्यामध्ये सहभाग असावा. एखादं नेतृत्व, उत्पादन हे केव्हा खऱ्या अर्थाने नवारूपाला येतं? जेव्हा ग्राहकवर्गाची त्या उत्पादनांना पसंती असते. एखाद्या प्रोडक्टला आलेली पसंती, हाच खरा विजय असतो. आराध्या क्रिएशनच्या सात वर्षांच्या वाटचालीमध्ये ग्राहकांनी उत्पादनाला दिलेली पसंती व वाढती उत्पादनाची संख्या, हेच खरं गमक आहे, हेमांगीच्या ‘लेडी बॉस’ बनण्याचं. त्यामुळेच, तर ती ‘लेडी बॉस’ ठरली आहे.

-अर्चना सोंडे

Comments
Add Comment