सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मणदुरे नावाचे खेडे आहे. येथील गणपतराव व विठाबाई या वारकरी दाम्पत्याच्या पोटी एक पुत्र झाला. त्याचे नाव ‘श्रीपाद’ होते. लहानपणापासून श्रीपादला साधुसंतांच्या संगतीची ओढ लागली. वयाच्या आठव्या वर्षी श्रीपादने घराचा त्याग करून हिमालयाची वाट धरली. तेथे तपस्या केली. चित्रकूट पर्वतावरील चित्रानंद स्वामींचे त्याने दर्शन घेतले. त्यांच्याच आश्रमात श्रीपाद राहू लागला. नंतर हिमालयातील क्षेत्रे, अरवली पर्वत, सातपुडा, निलगिरी, द्वारका, जगन्नाथपुरी, कन्याकुमारी इत्यादी स्थानांना भेट देऊन श्रीपादने कोल्हापूर जवळच्या राधानगरीजवळ एका जंगलात तपश्चर्या केली आणि शेवटी जवळच्याच गगनगडावर ते स्थिर झाले. वाढलेल्या दाढी-जटा यामुळे प्रथम लोकांचा त्यांना उपद्रव झाला. पण थोड्याच दिवसांत त्यांची तपस्या व ध्यानधारणा लोकांना समजली. पुढे ते गडावरील स्वामी गगनगिरी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी शरीराला कष्ट देऊन उग्र तपस्या केली. जे मिळेल ते खाल्ले. नित्य पाण्यात बसून त्यांनी तपस्या केली. आपल्या सामर्थ्याने त्यांनी हजारो लोकांना सन्मार्गास लाविले. आई-वडील, कुलदैवत, इष्टदेवता यांच्यावर श्रद्धा ठेवून चिंतनात मग्न असावे, अशी त्यांची शिकवण आहे.
अनेक भाविक त्यांचे दर्शन घेऊन तृप्त झाले आहेत. गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायातील हठयोगी होते. ते चालुक्यसम्राट पहिला पुलंकेशीच्या घराण्यातील होते. लहान वयात घर सोडल्यावर सुरुवातीलाच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. नाथ संप्रदायीबरोबर ते बत्तीस शिराळा येथे आले व तेथेच त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. चित्रकूट पर्वतावर त्यांना चित्रानंद स्वामींची भेट झाली. एकदा बद्रीनाथ जवळील व्यासगुंफेत महाराज दमून पहुडले होते. तेव्हा पर्वतावरून एक कफनधारी साधू आले. त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी श्रीपादांचे तोंडावर शिंपडले व कमंडलूतील हिरवेगार कोथिंबिरीसारखे गवत खाण्यास दिले व म्हणाले, ‘आजपासून तुला सिद्धवस्था प्राप्त होईल. तुझ्याकडून मानव जातीचे कल्याणाचे कार्य होईल. तू आता दक्षिणेकडे जा.’ तसेच ते ऋषिकेशला येऊन पोहोचले. थोड्याच दिवसांत लोक त्याना स्वामी किंवा महाराज म्हणू लागले. पुढे भोपाळपर्यंत गेले असता एका तलावाचे काठी स्नान करून बसले असता, कोल्हापूरचे राजे व काही सरदार येऊन बसले व मराठीत बोलू लागले. महाराजही त्यांच्याशी मराठीत बोलू लागले. कोल्हापूरचे महाराज या बाल योग्याला घेऊन कोल्हापूरला आले. त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्षे तपश्चर्या केली. सुरुवातीस महाराज एका धनगर वाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले. त्या अरण्यात कंदमुळे झाडपाला व वनस्पती भरपूर असल्याने ते तेथे रमले. झाडाच्या ढोलीत त्यांनी तप केले. भूत विद्या, जारण, मारण उच्चाटन विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचा शोध लागला. या तपात झोपण्यासाठी गवताची गादी केली होती. ती गादी झाडासारखी अंकुर फुटून वाढू लागली. त्यामुळे विद्या पूर्णत्वास जात असल्याची खात्री झाली व ते सिद्ध होऊ लागले.
पर्जन्य काळात अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुभ्याच्या सालीचा वाक व आपट्याच्या सालीचा वाक व पळसाच्या पानाचे इरले करून, पावसात हलते घरही बनवीत. पुढे गगनगडावर जलात उभे राहून तपश्चर्या केली व योगशास्त्रातील अनेक विद्या व अवघड सिद्धी प्राप्त करून घेतल्या. विमालज्ञान, शिवयोग उन्मनी अवस्था व विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या आत्मसात केल्या.
महाराजांनी योगशास्त्राचा संदेश सर्वत्र पोहोचविला. महाराजांनी हजारो भक्तांचे कल्याण करत त्यांना भक्ती मार्गाला लावले. महाराजांचे शिष्य महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्रामध्ये विखुरलेले आहेत. १९९५ साली मनुश्री बेटावर आश्रम उभारण्यात आला, त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम उभारण्यात आले. गगनगिरी महाराज यांचे आश्रम गगनगड, खोपोली, मनोरीबेट, आंबोळगड, दाजीपूर, नागार्जुन सागर इत्यादी ठिकाणी आहेत. येथे दत्तमूर्ती स्थापन करून त्यांनी लाखो लोकांना भक्तिमार्गाकडे वळविले आहे. गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्र इत्यादी प्रसंगी या आश्रमात भजनपूजन थाटाने होत असते. अन्नदानही मोठ्या प्रमाणावर होते. महाराजांचे भक्त सांगतात की, त्यांना योग शास्त्रातील विमलज्ञान, शिवयोग, उन्मातीविद्या, गोरक्षणाथी विद्या अशा विद्या आत्मसात होत्या, निसर्गाच्या सान्निध्यात त्यानी तप केलं होतं, १९३२ ते १९४० या साली दाजीपूरच्या पटाचा डंख भागात राहून त्यांनी अरण्यनिवासीत पूर्ण केलं होतं, हळूहळू महाराजांची कीर्ती पसरू लागली होती. १९४८ ते १९५० साली महाराज मुंबईतील वाळकेश्वरातील शिडीच्या मारुतीजवळ दादी हिरजी पारशी स्मशानात राहू लागले व तप करू लागले, नंतर ते ब्रीच कॅण्डी खडक, महालक्ष्मी खडक, बनगंगेचा खडक टापूत तप करू लागले, दादी हिरजी शेठच्या बंगल्याच्या समोर अय्यरीच्या समोर, कधी-कधी समशान बावडीजवळ खाट टाकून तप करू लागले. महाराजांची कीर्ती वाढू लागल्याने बरेच संस्थानिक महाराजांना भेटण्यासाठी येऊ लागले. या काळात खोपोली आज जिथे आश्रम आहे. तिथे निसर्गरम्य ठिकाणी महाराजांचं वास्तव होऊ लागलं. मात्र महाराजांची कीर्ती पसरली, ती १९६५ च्या कालखंडानंतर, दरम्यानच्या काळात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, राजारामबाबू पाटील, कापसे आदी सर्व मंत्री प्रतिष्ठित अधिकारी त्यांना मानसन्मान देऊ लागले. मुंबईच्या बिर्ला क्रीडा केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी होऊ लागली. १९६० च्या काळात तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांनी गगनगिरी महाराज मूळ पाटणकर असल्याची माहिती दिली.
सिद्ध योगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे योगाश्रमात पाताळगंगा तीर्थक्षेत्री पर्णकुटीत ४ फेब्रुवारी २००८ पहाटे ३.३० वाजता देह ठेवला. तेव्हा ते १०३ वर्षाचे होते. हे भक्तांचे केंद्र आहे. येथे गगनगिरी महाराजांचे वास्तव्य असून त्यांनी याच ठिकाणी समाधी घेतली. मठाचे बांधकाम हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, बाजूला असलेली माठ आणि त्यातून वाहणारी पातळ नदी चित्तथरारक दृश्य देते. मंदिराच्या सर्व भागांना लाल रंग दिला आहे. खोपोली हे आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनले आहे, कारण अनेक सद्गुरूंनी वास्तव्य केले आहे आणि त्यांचे आश्रम त्यांच्या अनुयायांनी उभारले आहेत. बारा ज्योतिर्लिंगाचे स्वयंभू देवस्थान, या ठिकाणी एका मोठ्या काळ्या दगडावर बारा ज्योतिर्लिंग कोरलेली आहेत.
स्वयंपूर्ण दगडाभोवती सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यांनी तळघरात ध्यान मंदिर – ध्यान मंदिर बनवले. हे ठिकाण इतके शांत आणि निर्मळ आहे की, तुम्ही सहज लक्ष केंद्रित करू शकता जे तुम्हाला ध्यानात मदत करते. तुम्ही भक्ती आणि आध्यात्मिक शक्तीच्या मार्गाच्या जवळ जाल. महाराजांचं खोपोलीत निधन झालं, गगनगिरी महाराजांची कीर्ती आजही महाराष्ट्रात पाहायला मिळते, कधी खोपोलीमध्ये जात असाल, तर नक्की एकदा त्या ठिकाणास भेट द्या.
-सतीश पाटणकर